অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

हतगड किल्ला

छत्रपती शिवरायांनी अनेक गडकिल्यांच्या निर्मितीतून स्वराज्याचे तोरण बांधले होते. शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेले व आजही बऱ्यापैकी भक्‍कम स्थितीत असलेले अनेक गडकिल्ले शिवशाहीची साक्ष देतात. त्यापैकी महाराष्ट्र व गुजरात सीमेवर असलेल्या गडाच्या टोकावर दिमाखात उभा असलेला हतगड हा किल्ला शिवरायांच्या ऐतिहासिक कारकीर्दीचा साक्षीदार म्हणून आजही उभा आहे. महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या सह्याद्रीच्या रांगांमधील सातमाळा रांगेचा प्रारंभ म्हणजे हतगड हा किल्ला होय. सुरगाणा तालुक्यातल्या वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या ह्या किल्ल्याच्या पायथ्याशी हतगड हे गाव वसलेले असून पलीकडे गुजरात राज्याची हद्द जेथून सुरू होते ते सापुतारा हे थंड हवेचे ठिकाण अगदी जवळ आहे. शिवरायांनी हा किल्लाबांधला असून काही काळ येथे वास्तव्य केले होते. त्यांनी सुरतची ऐतिहासिक धाडसी लूट ह्याच किल्यावरून केली होती. शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या व अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार असलेला हतगड हा किल्ला नाशिक जिल्ह्याचा एक महत्त्वपूर्ण केंद्रबिंदू आहे.

हतगड हे आदिवासी वस्ती असलेले गाव असून या गावातून हतगड किल्यावर पूर्वी एक कातरवाट होती. या वाटेवरून किल्याचे दर्शन घेण्यासाठी जात असताना वाटेवर मारूती व गणेशाची शिल्पे आपल्याला दिसतात. पुढे चालत गेल्यावर तटबंदीची नजाकत नक्षीदार बुरूज, अस्ताव्यस्त दगडांची वाट, खांबावर कोरलेले शिलालेख, ठिकठिकाणी लपलेल्या गुहा आपल्याला खुणावतात व रोमहर्षक इतिहासाची आठवण करून देतात.

सह्याद्रीच्या पूर्व भागातील एका रांगेची सुरूवात याच तालुक्यापासून होते. यालाच सातमाळ रांग असे म्हणतात. या सातमाळ रांगेची किल्ला म्हणजे जणू काय एक तटबंदीच. याच रांगेच्या उपशाखेवर एक छोटासा किल्ला आहे. त्याचे नाव हतगड. या भागातील जनजीवन तसे सामान्यच आहे. फार थोड्या आधुनिक सुविधा येथपर्यंत पोहोचल्या आहेत.
हा किल्लामुघलांच्या वर्चस्वाखाली दीर्घकाळ असल्यामुळे एकूण बांधकामाची रचना बघता मुघलशाहीचे वर्चस्व जाणवते.

गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे


गडावर प्रवेश करण्यापूर्वी चार दरवाजे लागतात. पहिल्या दरवाजाच्या अगोदरच उजवीकडे कातळात वरच्या भागात कोरलेले पाण्याची टाकी लागते. येथेच कातळात कोरलेली हनुमानाची मुर्ती आहे. गडाच्या पहिल्याच दरवाजाचे फक्‍त खांब शिल्लक आहे. या दरवाज्या जवळच दोन शिलालेख कोरलेले आहेत. थोडे वर चढल्यावर आपण दुसऱ्या संपूर्ण कातळातून खोदलेल्या बोगीसार ‘या दरवाजातून आत शिरतो. या दरवाजाला पाहून हरीहर किल्ल्याची आठवण होते. बाजुला एक गुहासुद्धा कोरलेली आहे. यात पाण्याच्या तीन टाक्या आहेत. या दरवाजातून थोडे वर गेल्यावर गडाचा तिसरा आणि चौथा दरवाजा लागतो. गडमाथा खूप विस्तीर्ण आहे. संपूर्ण गडमाथा फिरण्यासाठी एक तास लागतो. दरवाजातून वर आल्यानंतर पायऱ्यांची एक वाट डावीकडे खाली उतरते. येथे मोठ्या प्रमाणावर तटबंदी आहे. जी आजही बऱ्यापैकी शाबूत आहे. समोरच एक पीर आहे.

उजव्या बाजूच्या तटात एक कमान कोरलेली आहे व पाण्याची एक टाकी आहे. हे सर्व बघून झाल्यानंतर आल्या वाटेने परतायचे. आता दरवाजाच्या उजवीकडील वाट धरावी. येथे थोडे वर गेल्यावर पाण्याची टाकी लागते. थोडे अजून वर गेल्यावर पडक्या इमारतींचे अवशेष दिसतात. येथे एक बुरूज वजा इमारतही आहे. थोडे खाली उतरल्यावर पाण्याचा एक तलावसुद्धा आहे. या तलावातील पाणी पिण्यायोग्य नाही. तलावाच्या समोरच किल्याचे मोठे पठार आहे. किल्याच्या या भागाची तटबंदी अजूनही बऱ्यापैकी भक्‍कम आहे. तलावाच्या वरच्या बाजूस एक ध्वजस्तंभ आहे. ध्वजस्तंभाच्या पुढे एक वाट गडाच्या दुसऱ्या टोकाला जाते. वाटेत पाण्याच्या अनेक टाक्या पहावयास मिळतात. गडाच्या दुसऱ्या टोकाला एक बुरूज आहे. संपूर्ण गड फेरीस एक तास पुरतो. असा हा हतगड नाशिकपासून 80 किमी अंतरावर आहे. नाशिकवरून एका दिवसांत सहज जाऊन पाहता येते.

गडावर जाण्याच्या वाटा

हातगडला जाण्यासाठी नाशिक गाठावे. नाशिक सापुतारा मार्गावर बोरगांव नावाचा फाटा आहे. येथून एक रस्ता सुरगाणा येथे जातो व दुसरा सापुताऱ्याला. सापुताऱ्याला जाणाऱ्या रस्त्यावर बोरगांवपासून चार कि.मी. अंतरावर हतगड नावाचे गाव आहे. तेच गडाच्या पायथ्याचे गाव आहे. गावातून एक डांबरी रस्ता कळवणला जातो. या रस्त्यावरून पुढे जायचे. हातगड गाव डाव्या हाताला ठेवायचे.

धारेवरच्या पायवाटेने किल्ल्याकडे कुच करायचे. पूर्वी हा कच्चा रस्ता होता पण आता तेथे पक्‍का रस्ता व पायऱ्या तयार केल्याने ट्रॅकर्स व हौशी पर्यटकांना किल्ल्यावर सहज जाता येते. ज्यांना पायवाटेने जाणे अशक्य आहे किंवा वाहन घेऊन जावयाचे आहे. त्यांच्यासाठी हतगड गावाच्या पुढे सापुताऱ्याच्या बाजूला थोडेसे पुढे गेल्यानंतर हतगड किल्ल्याच्या डोंगरापाशी उजव्या बाजूने एक पक्‍का रस्ता महाराष्ट्र शासनाने बांधला असून या रस्त्याने चारचाकी वाहनाद्वारे किल्याच्या प्रवेशद्वारापर्यंत सहजपणे जाता येते. त्यामुळे हतगड किल्याला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. हतगड किल्ल्यापासून फक्‍त 4 कि.मी. वर सापूतारा हे थंड हवेचे ठिकाण वसलेले आहे. हेही एक रमणीय पर्यटनस्थळ असल्याने व तेथे अनेक पर्यटन स्थळे असल्याने हतगड किल्याबरोबरच सापुताऱ्याची सहल करता येते.

सापुतारा येथील रोप-वे प्रसिद्ध असून सनराईज पॉईंट, सनसेंट पॉईंट, टेबललँड पॉईंट, जैन मंदिर, ऋतंबरा विश्‍वविद्यापीठ म्युझियम, स्टेप गार्डन, गुलाबबाग आदी प्रेक्षणीय स्थळे सापुताऱ्यात आहेत. याशिवाय बोटींग क्लब, वेगवेगळी राईड्स, घोडेसवारी, उंटसवारी आदी.

सापुतारा येथे निवासाची उत्तम व्यवस्था उपलब्ध असून पर्यटन विभागासह विविध हॉटेल्स आपल्या बजेटनुसार तेथे उपलब्ध आहेत. सहकुटुंब जाणाऱ्यांसाठी स्टार हॉलीडे होम हे एक वाजवी दरात निवास व्यवस्था उपलब्ध असलेले हॉटेल आहे.
हतगड किल्याच्या आसपासच्या परिसरात अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत.
यामध्ये सप्तश्रृंग गडावरील शक्‍तीपिठ, ओझरखेड, चणकापूर डॅम, केमचा डोंगर भिवतास धबधबा आदी स्थळांनाही भेट देता येते. शिवशाहीच्या इतिहासाची साक्ष देणाऱ्या या हतगड किल्ल्यास प्रत्येकाने एकदातरी भेट द्यायलाच हवी.
5 मिनीटांच्या अंतरावर डांबरी रस्ता सोडायचा आणि डावीकडील डोंगर धारेवरची पाय पाटेने सरळ जावे. या वाटेने 15 मिनिटांत आपण एका आंब्याच्या झाडाखाली पोहोचतो. या झाडापासून डोंगराच्या माथ्यापर्यंत एक तिरकी रेघ मारावी. ही तिरकी रेघ म्हणजे गडावर जाणारी वाट होय. पायथ्यापासून गडमाथा गाठण्यास पाऊणतास लागतो.

जवळची प्रेक्षणीय स्थळे


सापूतारा, ओझरखेड डॅम, चणकापूर डॅम, सप्तश्रृंगी गड, दिंडोरीचे स्वामी समर्थ केंद्र, केमचे डोंगर, भिवतास धबधबा. सापूतारा येथे स्टार हॉलीडे होम येथे राहण्याची व जेवणाची उत्तम व्यवस्था आहे. त्यासाठी संपर्क : 9422772021, 9850981210

लेखक - महेंद्र देशपांडे,
नाशिक

स्त्रोत - महान्युज

अंतिम सुधारित : 7/12/2023



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate