मरणोत्तर 'पद्मश्री' पुरस्काराने कार्याचा गौरव अस्वच्छता हेच आजारांचे व रोगांचे मूळ कारण असून यावर मात करण्यासाठी केवळ शासनाने निधी देऊन किंवा विविध उपाययोजनांची घोषणा करुन उपयोग नाही तर त्याची योग्य पद्धतीने अंमलबजावणी करणे व त्यामध्ये लोकसहभागसुद्धा तेवढाच महत्वाचा आहे. या अनुषंगाने ग्रामीण भागातील लोकांची मानसिकता बदलणाऱ्या, पुणे जिल्ह्यातील देहूगाव येथील दिवंगत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. सुहास विठ्ठल मापूसकर यांना केंद्र शासनाने प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला 'पद्मश्री' पुरस्कार जाहीर करुन सन्मानित केले. या निमित्ताने त्यांच्या कार्याचा हा थोडक्यात आढावा...
शासनाने हा पुरस्कार जाहीर करुन दिवंगत डॉ. मापूसकर यांच्या बायोगॅस व सार्वजनिक स्वच्छताविषयक केलेल्या सामाजिक कार्याचा गौरव केला आहे. केंद्र सरकारने डॉ. मापूसकर यांना यापूर्वी राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानीत केले होते. डॉ. मापूसकर यांचा जन्म 22 जानेवारी, 1935 रोजी कोकणातील वाकेड गावामध्ये झाला. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर दहा वर्षे पूर्ण झाले, त्यावेळी डॉ. मापूसकरांनी वैद्यकीय शिक्षण पूर्ण करुन कामाला सुरुवात केली. भारत सरकारपुढे नवनवीन आव्हाने असतानाच देशभरामध्ये 75 टक्के जनता ही दारिद्र्यासह आजारांनी पछाडलेली होती. अशा परिस्थितीत श्रीक्षेत्र देहूगाव येथे डॉ.मापूसकरांनी वैद्यकीय सेवेला सुरुवात केली. देहू हे खेडेगाव होते.
मुंबई-पुण्यामध्ये ते वाढल्याने व येथेच शिक्षण पूर्ण केल्यामुळे गावातील परिस्थिती पाहून त्यांना खूप वाईट वाटले. 1959 साली देहूत प्राथमिक आरोग्य केंद्र नव्हते व गावात एकही शौचालय नव्हते. यात दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत होती. या रुग्णांचे विश्लेषण केल्यानंतर बहुतेक आजार हे पाण्यापासून व अस्वच्छतेमुळे होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. गावातील स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने व मदतीने स्वच्छता मोहीम राबविण्यास त्यांनी सुरुवात केली. तसेच या स्वच्छता मोहिमेला गती दिली.
समाजसेवेचा वसा घेतलेल्या डॉ. मापूसकर यांनी मलप्रभा बायोगॅस प्रकल्प विकसित केला. त्यांना 2006 मध्ये तत्कालीन राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या हस्ते “निर्मल ग्राम” पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. स्वच्छता दूत म्हणून प्रसिद्ध असलेल्या डॉ.मापूसकर यांना मरणोत्तर पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल देहूतील ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला. डॉ. मापूसकर हे केंद्र सरकारच्या व राज्य सरकारच्या विविध समित्यांचे सदस्य होते.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना साने गुरूजींच्या विचारांचा पगडा त्यांच्या मनावर होता. त्यातच प्रा. डॉ. आद्रनवाला यांनी स्वच्छतेबद्दल मनात जागृती निर्माण केली. यातून स्फूर्ती घेऊन गावच्या कारभाऱ्यांच्या मदतीने स्वच्छता मोहिमेला गती देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी ग्रामस्थांना एकत्र केले. गाव पातळीवर शौचालय बांधकाम समितीची स्थापना करून पारदर्शक कारभाराची सुरूवात केली. त्यांना शौचालयाचे महत्त्व पटवून देऊन प्रत्येकी 400 रुपये स्वखर्चाने शौचालये बांधण्याचा निर्णय घेतला. यातून गावात पहिल्यांदा 10 शौचालये बांधली. पण ती परदेशी वातावरणाशी योग्य अशा डिझाईनची होती. ती एक वर्षातच पडली त्याच्या कारणांचा शोध घेतला असता त्यातूनच त्यांच्या संशोधनाला सुरुवात झाली.
दरम्यानच्या काळात परिचारिकांना घराघरात जाऊन स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यास सांगितले, यासाठी त्यांना स्थानिक पातळीवर प्रशिक्षणही दिले. कणकवली येथे अप्पासाहेब पटवर्धन यांनी शौचालयावर बरेच संशोधन करून सोपा संडास म्हणजेच सुलभ शौचालयांचा मॉडेल म्हणून वापर सुरू केल्याचे समजताच तेथे जाऊन डॉ. मापूसकर यांनी पाहणी केली. तोपर्यंत देहूत शासनाच्या कोणत्याही मदतीशिवाय 70 टक्के शौचालये बांधून वापर सुरू करण्यात यश आले होते.
भरपूर शेण व मूत्र यावर अप्पासाहेब पटवर्धनांनी संशोधन करून वॉटर जॅकेट पद्धतीचा बायोगॅस प्रकल्प उभारून कार्यान्वीत केला. या तंत्रज्ञानात आणखी संशोधन करून डॉ. मापूसकर यांनी मलप्रभा बायोगॅस प्रकल्पाचे डिझाईन विकसित केले व वापरास योग्य असल्याचे निदर्शनास आणून दिले. मानवी विष्ठेचा वापर करून गॅसची निर्मिती करणे शक्य असून त्याचा वापर करता येईल, हे पटवून देताना डॉ. मापूसकरांची खूप दमछाक झाली, मात्र 1990 मध्ये त्यांना या उपक्रमाला यश आले.
यातून पुढे शासनाच्या अनेक समित्यांवर त्यांनी विशेषज्ञ म्हणून काम केले. या प्रकल्पावर काम करताना देहूतील प्राथमिक आरोग्य केंद्र हे आदर्श प्राथमिक आरोग्य केंद्र होते. याची दखल देशपातळीवरही घेण्यात आली होती. शासनाने 1981 ते 1990 “स्वच्छता दशक” पाळले व त्यातून जनजागृतीवर भर दिला.
यादरम्यान महाराष्ट्र शासनाच्यावतीने सन 2000 मध्ये तत्कालीन ग्रामविकास मंत्री आर. आर. पाटील यांच्या हस्ते “स्वच्छता दूत” हा पुरस्कार त्यांना दिला. केंद्र सरकारच्यावतीने राष्ट्रपती ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या हस्ते त्यांना “निर्मलग्राम पुरस्कार” देण्यात आला.
डॉ.मापूसकर यांच्या मते, सध्याच्या परिस्थितीत शासनाने जे लोक दारिद्र्यरेषेखाली आहेत अशा लोकांनाच अनुदान द्यावे. सरसकट विशिष्ट हेतूने रक्कम देऊ नये, यासाठी नागरिकांना स्वखर्चाने संडास बांधून घेण्यास प्रवृत्त करावे, त्यांच्यात जागृती करावी, यासाठी शासनाने विविध उपक्रम राबवून लोक परिवर्तन करणे गरजेचे आहे. ज्यावेळी नागरिकांचे मत परिवर्तन होईल त्यावेळी लोकांना स्वच्छता म्हणजे काय, ती का राखावी हे सांगावे लागणार नाही. हा उपक्रम आहे, लगेच यश येणार नाही. मात्र प्रयत्नात सातत्य ठेवले तर निश्चितच यश येईल हे स्वानुभवातून डॉ. मापूसकरांनी सांगितले.
याव्यतिरिक्त गावागावात स्वच्छता समिती अधिक बळकट करावी, आरोग्याचे महत्व पटवून देण्यासाठी त्यांना प्रोत्साहन द्यावे. संडास बांधकाम समित्यांची निर्मिती करावी, लोकसहभागातून संडास बांधून त्यांचा वापर करणे शक्य आहे. यासाठी कितीही अनुदान दिले तर ते वापरले जाईलच याची खात्री नाही. मोफतची सवय मोडून काढावी व लोकसहभाग वाढवण्यावर, प्रबोधनावर अधिक खर्च करून देशातील आरोग्य सुकर करण्याचा प्रयत्न करावा, असे मत त्यांनी व्यक्त केले होते.
केंद्र शासनाने डॉ.मापूसकर यांना मरणोत्तर “पद्मश्री” पुरस्काराने सन्मानित करुन त्यांच्या कार्याचा यथोचित गौरव केला आहे. गरज आहे आता आपण सर्वांनी त्यांचे कार्य प्रयत्नपूर्वक पुढे नेण्याची...
लेखक - जयंत कर्पे,
माहिती सहायक, जिल्हा माहिती कार्यालय, पुणे.
स्त्रोत - महान्युज
अंतिम सुधारित : 1/13/2020
महाराष्ट्राचे भारतातले आर्थिक स्थान अव्वल असले तरी...