অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

केशवदास

केशवदास

(सु. १५५५–सु. १६१७). भक्तियुगातील एक प्रख्यात हिंदी कवी आणि रीतिकाव्याचा प्रवर्तक. त्याच्या जन्म - मृत्युतिथींबाबत विद्वानांत बरेच मतभेद आहेत. त्याचा जन्म ओर्च्छा (मध्य प्रदेश) येथे एका नावाजलेल्या विद्वान कुटुंबात झाला. त्याच्या पूर्वजांना राजाश्रय होता. केशवदासही ओर्च्छाधिपती इंद्रजीत सिंह याचा आश्रित होता. अकबर, बिरबल, तोडरमल, उदयपूरचा राणा अमरसिंह यांसारख्या मातबर माणसांशी त्याचा चांगला परिचय होता. तो रसिक, पंडित व व्यवहारकुशल होता. साहित्य, संगीत, धर्मशास्त्र, राजनीती, वैद्यक, ज्योतिष इ. विषयांत त्याची चांगली गती होती. त्याच्या रसिकप्रिया (१५९१), कविप्रिया (१६०१) आणि छंदमाला  ह्या काव्यशास्त्रीय ग्रंथांचा रीतिकालीन हिंदी साहित्यावर खूपच प्रभाव पडला. संपूर्ण संस्कृत काव्यशास्त्र हिंदीत आणण्याचे श्रेय केशवदासाला दिले जाते. त्याने रामकथेवर लिहिलेले रामचंद्रिका (१६०१) हे काव्य प्रख्यात असले, तरी त्यातील त्याच्या पांडित्यप्रदर्शनाच्या हव्यासामुळे, काव्यगुणद्दष्ट्या ते तितकेसे सरस ठरत नाही.

आज केशवदासाचे नाव उत्तम कवी म्हणून जरी घेतले जात नसले, तरी हिंदी साहित्यातील मध्ययुगात त्याला ‘आचार्यकवी’ म्हणून विशेष मानाचे स्थान होते. त्याचा प्रभाव  बिहारी,  देव यांसारख्या मोठ्या कवींवरही पडलेला दिसतो. त्याने लिहिलेले इतर प्रमुख काव्यग्रंथ म्हणजे वीरचरित्र  (१६०६), विज्ञानगीता  (संस्कृतमधील प्रबोधचंद्रोदयवर आधारित, १६१०), जहांगीरजसचंद्रिका (जहांगीरच्या दरबाराचे वर्णन, १६१२), रतनबावनी (रत्नसेनाच्या पराक्रमाचे वर्णन) व नखशीख  हे होत. त्याची रचना मुख्यत्वे ब्रज भाषेत असली, तरी तिच्यातील संस्कृतप्राचुर्य आणि अलंकारांचा सोस यांमुळे ती दुर्बोध बनली आहे.

संदर्भ: १. शर्मा, किरणचंद, केशवदास : जीवनी, कुल और कृतित्व, दिल्ली, १९६१.

२. सिंह, विजयपाल, केशव और उनकी साहित्य, दिल्ली, १९६१.

लेखक : चंद्रकांत बांदिवडेकर

स्त्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 4/23/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate