অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

कोवलम माधव पणिक्कर

कोवलम माधव पणिक्कर

कोवलम माधव पणिक्कर : (३ जून १८९५-११ डिसेंबर १९६३). भारतातील एक राजकीय मुत्सद्दी व इतिहासाचे अभ्यासक. सरदार पणिक्कर या नावाने ते प्रसिद्ध आहेत. त्यांचा जन्म केरळ राज्यातील कोवलम (त्रावणकोर) या ठिकाणी सधन कुटुंबात झाला. पदवीपर्यंतचे शिक्षण मद्रास येथे घेऊन ते पुढील शिक्षणासाठी इंग्लंडला गेले आणि एम्.ए. व बार अ‍ॅट लॉ झाले व भारतात परत आले (१९१९). प्रथम काही वर्षे ते अलीगढ मुस्लिम विद्यापीठ (१९१९-२२) व नंतर कलकत्ता विद्यापीठ (१९२२-२५) यांत व्याख्याते होते. ते पुढे हिंदुस्थान टाइम्स या वृत्तपत्राचे संपादक झाले (१९२५). तत्पुर्वी गुरुद्वारा प्रबंधक समितीतील संघर्ष मिटविण्यासाठी त्यांनी म. गांधींना साहाय्य केले. पुढे नरेंद्र मंडळाचे ते सचिव झाले (१९३३) व त्यानंतर ते संस्थानिकांच्या खाजगी नोकरीत शिरले. काही दिवस पतियाळा संस्थानचे परराष्ट्रमंत्री तर नंतर बिकानेर संस्थानचे ते मुख्यमंत्री होते. १९३० मध्ये ते संस्थानिकांच्या शिष्टमंडळातून गोलमेज परिषदेस हजर राहिले. स्वातंत्र्योत्तरकाळात त्यांची संविधान समितीचा सभासद व पुढे संयुक्त राष्ट्रे येथे सभासद म्हणून निवड झाली (१९४८). भारतीय राजदूत म्हणून त्यांनी चीन (१९४८), ईजिप्त (१९५२), फ्रान्स (१९५६) वगैरे देशांत महत्त्वाची कामगिरी बजावली. ते काही दिवस राज्यसभेचे सभासद होते. उर्वरित आयुष्य त्यांनी राजकारणापासून अलिप्त राहून लेखन-वाचन व अध्ययन यांत व्यतीत केले. काही वर्षे काश्मीर विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून त्यांनी काम केले. त्यानंतर ते म्हैसूर विद्यापीठाचे कुलगुरू झाले व  अखेरपर्यंत ते तेथेच होते.

पणिक्करांनी परदेशांत वा भारतात खूप प्रावस केला. त्यांचे स्फूट व ग्रंथलेखन विपुल असून मलयाळम् या मातृभाषेतून कथा, कादंबऱ्या, काव्य इ. प्रकारचे लेखन त्यांनी केले. त्यांपैकी तत्वनिरूपणम् (१९३४), चिंता तरंगिणी (१९३५), मंदोदरी (१९४०), केरळ सिंहम् (१९४२) आणि आत्मकथा (१९५२) हे ग्रंथ प्रसिद्ध असून त्यांचे काही इंग्रजी ग्रंथही लोकप्रिय झाले. त्यांतील सर्व्हे ऑफ इंडियन हिस्टरी (१९४७), हिंदू सोसायटी अ‍ॅट द क्रॉस-रोड्स (१९५५), इन  द टू चायनाज (१९५५), द स्टेट अँड द सिटिझन (१९५६), एशिया अँड वेस्टर्न डॉमिनन्स (१९५९), द अ‍ॅफ्रो-एशियन स्टेट्स अँड देअर प्रॉब्लेम्स (१९५९), द फाऊंडेशन ऑफ न्यू इंडिया (१९६३) इ. ग्रंथ महत्त्वाचे व अभ्यासपूर्ण आहेत.

आपल्या इतिहासांवरील ग्रंथांत त्यांनी इतिहासाच्या अभ्यासाची एक विशिष्ट दिशा दर्शविली आहे. त्यांचे मत, इतिहासाची संकल्पना एकात्म असून तो एकांगी रीतीने अभ्यासला जाऊ नये, असे होते. इतिहास म्हणचे विशाल व सखोल आवाहन! त्यांनी ऐतिहासिक थोर पुरुष व राष्ट्रे यांचे मनन एका विशिष्ट दृष्टिकोनातून केले आणि भविष्यकाळात या अभ्यासाचा कसा उपयोग होईल, ते सांगितले. त्यांनी पारंपरिक इतिहासलेखनपद्धती डावलून स्वतंत्र लेखनपद्धती अनुसरली. त्यांच्या व्यासंगाचा उचित सत्कार त्यांना केरळ साहित्य अकादेमीचे अध्यक्षपद देऊन करण्यात आला. याशिवाय यूनेस्कोतर्फे प्रसिद्ध होत असलेल्या हिस्टरी ऑफ मनकाइंड (सहावा खंड) या ग्रंथमालेत सहलेखक व सहसंपादक होण्याचा मान त्यांना मिळाला. त्यांचे आत्मचरित्र मलयाळम् भाषेत लिहिले असून त्याचे इंग्रजी भाषांतर के. कृष्णमूर्ती यांनी केले आहे (१९७७).

लेखक - त्र्यं. र. देवगिरीकर

स्त्रोत - मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate