অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

काशीप्रसाद जयस्वाल

काशीप्रसाद जयस्वाल

काशीप्रसाद जयस्वाल

(२७ नोव्हेंबर १८८१ – ४ ऑगस्ट १९३७). प्रसिद्ध भारतीय प्राच्यविद्यापंडित व कायदेपटू. झालडा(मानभूम जिल्हा) येथे एका श्रीमंत व्यापारी कुटुंबात जन्म. शालेय शिक्षण मिर्झापूर येथे. ऑक्सफर्ड विद्यापीठातून एम्. ए. व टेम्पल इन् मधून बॅरिस्टर होऊन १९१० मध्ये ते भारतात परतले. प्रथमपासून त्यांचा कल क्रांतिकारी चळवळीकडे होता आणि हरदयाळ व सावरकर यांच्याशी त्यांचे घनिष्ठ संबंधही होते. त्यामुळे कलकत्ता विद्यापीठातील नोकरी त्यांना सोडावी लागली. म्हणून त्यांनी प्रथम कलकत्त्यास व पुढे पाटणा येथील उच्च न्यायालयात वकिलीस सुरुवात केली व पाटण्यातच ते स्थायिक झाले (१९१४). या वेळी त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राजेंद्रप्रसाद, मझरूल हक, सय्यद हसन इमाम वगैरे बिहारी पुढाऱ्यांशी त्यांचा निकटचा संबंध आला.तथापि उर्वरित आयुष्य त्यांनी वकिली आणि इतिहास संशोधन यांतच व्यतीत केले.

प्राचीन भारतीय गणराज्याची जगाला ओळख व्हावी, म्हणून त्यांनी प्रथम काही स्फुटलेख लिहिले व नंतर हिंदू पॉलिटी हा अत्यंत अभ्यासपूर्ण ग्रंथ लिहिला (१९२४).

यानंतर त्यांनी हिस्टरी ऑफ इंडिया १५० ए. डी. टू ३५० ए. डी. हा ग्रंथ लिहिला (१९३३). बौद्ध धर्म तसेच बौद्ध काळ यांचा सर्वांगीण व सखोल अभ्यास करून यासंबंधी जर्नल ऑफ द बिहार अँड ओरिसा रिसर्च सोसायटीतून लेख लिहिले. याच सुमारास त्यांनी राजनीतिरत्नाकर आर्यमंजुश्री मूलकल्प हे मूळ ग्रंथ राहुल सांस्कृत्यायन या विद्वान संशोधक इतिहासकाराच्या मदतीने सटीप संपादित केले. अधिक अभ्यासाकरिता त्यांनी उत्तर भारत, नेपाळ वगैरे प्रदेशांचे दौरे केले व बौद्ध साधनांचा पूर्णतः उपयोग करून इंपीरियल हिस्टरी ऑफ इंडिया (१९३४) हा अत्यंत चिकित्सक व मौलिक ग्रंथ लिहिला. ‘हिंदू लॉ’चा त्यांचा व्यासंग फार मोठा होता. टागोर विधिव्याख्यानमालेत मनुस्मृति याज्ञवल्क्यस्मृति यांवर त्यांनी दिलेली बारा व्याख्याने त्याची साक्ष देतात. ती पुढे १९३४ मध्ये पुस्तक रूपाने प्रसिद्ध झाली. खारवेलाचा हाथीगुंफा लेख उजेडात आणण्याचे बहुतेक श्रेय जयस्वालांनाच द्यावे लागेल. इतिहास संशोधनासाठी पाटणा वस्तुसंग्रहालय आणि बिहार व ओरिसा संशोधनसंस्था स्थापण्यात त्यांचा फार मोठा वाटा होता. जवळजवळ अखेरपर्यंत ते या संस्थांच्या जर्नलचे संपादक होते. याशिवाय पाटलिपुत्र या हिंदी साप्ताहिकाचेही ते संपादन करीत.

त्यांचे अनेक स्फुटलेख भारत व भारताबाहेरील इंग्रजी नियतकालिकांतून प्रसिद्ध झाले. नेपाळच्या भेटीनंतर त्यांनी क्रॉनॉलॉजी अँड हिस्टरी ऑफ नेपाळ फ्रॉम ६०० बी. सी. टू ८०० ए. डी. हे पुस्तक लिहिले. त्यांच्या कार्याचा गौरव पाटणा विद्यापीठाने त्यांना डॉक्टरेट ही पदवी देऊन केला (१९३६). भारतीय नाणकशास्त्र संस्था व इंडियन ओरिएंटल कॉन्फरन्स यांची अध्यक्ष्यपदेही त्यांना लाभली(१९३३). एवढेच नव्हे, तर नाणकशास्त्र संस्थेने त्यांना एक विशेष पारितोषिक दिले.

जयस्वाल एक कट्टर हिंदू व राष्ट्रवादी होते. हिंदूविधीसंबंधी ते अधिकारी गणले जात. त्यांनी भारताच्या प्राचीन इतिहासाचे संशोधन करून प्राचीन इतिहास व संस्कृती यांची खरी ओळख भारतीयांना व जगाला करून दिली. त्यांची अनुमाने आणि मते यांबाबत नंतरच्या इतिहासकारांत मतभेद आहेत. तथापि त्यामुळे जयस्वालांच्या कार्याची महती यत्किंचितही कमी होत नाही. दीर्घ आजारानंतर पाटणा येथे त्यांचे निधन झाले. त्यांच्या स्मरणार्थ के. पी. जयस्वाल संस्था काढण्यात आली. तीत भारतविद्याविषयक संशोधन चालते.

 

लेखक - सु. र. देशपांडे

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 5/1/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate