অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

दुर्गाप्रसाद धर

दुर्गाप्रसाद धर

दुर्गाप्रसाद धर : (२४ एप्रिल १९१८—१२ जून १९७५). स्वातंत्र्योत्तर काळातील एक मुत्सद्दी व नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष. श्रीनगर (काश्मीर) येथे सधन कुटुंबात जन्म. पंजाब व लखनौ विद्यापीठांत शिक्षण घेऊन बी. ए.; एल्‌एल्‌. बी. झाले. प्रथम त्यांनी काश्मीरमध्येच काही वर्षे वकिली केली व पुढे उच्च न्यायालयात वकिलीसाठी आले. १९३५ पासून राष्ट्रीय चळवळीशी त्यांचा संबंध आला. शेख अब्दुल्ला यांच्या नेतृत्वाखाली १९४६ मध्ये महाराजांविरुद्ध झालेल्या काश्मीर छोडो आंदोलनात त्यांनी भाग घेतला. १९४७ साली पाकिस्तानी घुसखोरांनी काश्मीरवर हल्ला केला. तेव्हा एका तुकडीचे त्यांनी नेतृत्व करून हल्लेखोरांचा प्रतिकार केला. १९४९ व नंतर १९५२ मध्ये संयुक्त राष्ट्रातील भारतीय प्रतिनिधिमंडळाचे ते सदस्य होते. यावेळी १९५१—५७ पर्यंत ते काश्मीरच्या संविधान परिषदेचे सदस्य होते. १९६१—६८ या दरम्यान काश्मीरच्या मंत्रिमंडळातील निरनिराळी मंत्रिपदे त्यांनी सांभाळली. त्यानंतर भारताचे रशियातील राजदूत म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली (१९६८—७१) ते राजदूत असताना भारत सोव्हिएट सहकार्य आणि मैत्रिचा ऐतिहासिक करार झाला (१९७१). हा करार घडवून आणण्यात त्यांचा मोठा वाटा होता.

१९७१ मध्ये भारतात परत आल्यावर परराष्ट्र मंत्रालयाच्या धोरण समितीचे ते अध्यक्ष झाले. बांगला देशामधील मुक्तिसंग्राम आणि भारत—पाकिस्तान यु्द्ध आणीबाणीच्या काळात भारताचे परराष्ट्रीय धोरण ठरविण्यात त्यांचा वाटा मोठा होता. १९७१—७२ मध्ये ते पुन्हा संयुक्त राष्ट्राच्या आमसभेला भारतीय प्रतिनिधिमंडळाचे सदस्य म्हणून गेले. भारत—पाकिस्तान शिखर परिषद होण्यापूर्वी मरी येथे पाकिस्तानी प्रतिनिधींशी वाटाघाटी करण्यासाठी गेलेल्या भारतीय प्रतिनिधिमंडळाचे त्यांनी नेतृत्व केले. १९७२ मध्ये त्यांची नियोजन मंत्री म्हणून केंद्रीय मंत्रीमंडळात नेमणूक झाली. ते नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष झाले. पाचव्या पंचवार्षिक योजनेवर त्यांच्या विचारांचा ठसा उमटलेला आहे. १९७४ मध्ये त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. १९७५ च्या फेब्रुवारीत त्यांची पुन्हा मॉस्को येथे राजदूत म्हणून नेमणूक झाली. त्याच वर्षी विश्रांतीसाठी ते भारतात आले असता दिल्ली येथे त्यांना हृदयविकाराचा झटका आला व त्यात त्यांचे निधन झाले. त्यांच्या पत्नीचे नाव विजयालक्ष्मी. त्यांना विजय नावाचा एक मुलगा. एक अत्यंत कार्यक्षम प्रशासक आणि विचारवंत मुत्सद्दी म्हणून त्यांची ख्याती होती.

 

लेखक - दिनकर साक्रीकर

स्त्रोत - मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/20/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate