অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

ब्रह्मबांधव उपाध्याय

ब्रह्मबांधव उपाध्याय

(१८६१ – १९१०). बंगाली वृत्तपत्रकार, जहाल राष्ट्रवादी व अध्यात्मवादी. मूळ नाव भवानीचरण बंदोपाध्याय. ‘नवविधान’ पंथाचे प्रवर्तक केशवचंद्र सेन यांचे ते अनुयायी. अनेक वेळा त्यांनी धर्मांतर केले. प्रथम ब्राह्मोसमाजाचा त्याग करून त्यांनी ख्रिस्ती धर्माची (प्रॉटेस्टंट पंथाची) दीक्षा घेतली. याचवेळी त्यांनी आपले नाव बदलून ते ब्रह्मबांधव उपाध्याय असे केले. काही दिवसांनी ते रोमन कॅथलिक बनले व स्वतःस ख्रिश्चन वेदान्ती संन्यासी म्हणवू लागले. काही काळ त्यांनी‘शांतिनिकेतन’ मध्ये अध्यापकाचे काम केले व रवींद्रनाथांना वंगदर्शन हे बंकिमबाबूंचे बंद पडलेले मासिक चालविण्यास मदत केली. तेथे ते एकच वर्ष होते. पुढे स्वामी विवेकानंदांच्या कार्याचा त्याच्यावर प्रभाव पडून वेदान्तप्रचाराच्या कार्यासाठी ते इंग्लंडला गेले (१९०३). ऑक्सफर्ड व केंब्रिज विद्यापीठांत तसेच इतर ठिकाणी हिंदुसंस्कृती, हिंदुधर्म व वेदान्त यांवर त्यांनी व्याख्याने दिली. इंग्लंडमधून परतल्यानंतर त्यांचे स्नेही इंद्रनाथ बंदोपाध्याय व पंचान तर्करत्न ह्यांच्या उपदेशानुसार त्यांनी पुन्हा हिंदुधर्म स्वीकारला.

याच सुमारास बंगालमध्ये हिंदू धर्म व संस्कृती ह्यांच्या पुनरुज्जीवनाची व जहाल राष्ट्रधर्माच्या प्रसाराची चळवळ सुरू झाली होती. ह्या चळवळीला वंगभंगाच्या घटनेमुळे (१९०५) अधिकच जोर चढला. ते ह्या चळवळीत पडले आणि जहाल राष्ट्रवाद्यांचे एक पुढारी बनले. संध्या ह्या जहाल राष्ट्रवाद्यांच्या साप्ताहिकाचे संपादकत्व स्वीकारून त्यांनी ते पत्र चार वर्षे मोठ्या धडाडीने व बाणेदारपणे चालविले. अत्यंत ओजस्वी भाषाशैली व प्रक्षोभक विचारसरणी ह्या दोन वैशिष्ट्यांमुळे संध्या साप्ताहिकाला अरविंद घोष यांच्या वंदेमातरम् पत्राइतकीच लोकप्रियता लाभली होती. बंगाली गद्याला ओजोगुणाची जोड देणारा लेखक म्हणून ब्रह्मबांधवांची प्रसिद्धी आजही टिकून आहे.

लेखक :गं.दे.खानोलकर

स्त्रोत :मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/26/2023



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate