অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

माधव जूलियन्

माधव जूलियन्

माधव जूलियन्

माधवजूलियन् : (२१ जानेवारी १८९४–२९ नोव्हेंबर १९३९). श्रेष्ठ मराठी कवी, कोशकार, छंद:शास्त्राचे व्यासंगी, साहित्यविमर्शक आणि मराठी भाषाशुद्धीचे तत्त्वनिष्ठ पुरस्कृतें, प्रचारक, मूळ नाव माधव त्र्यंबक पटवर्धन. काव्यरचनेसाठी त्यांनी घेतलेल्या ‘माधव जूलियन्’ ह्या टोपण नावातील ‘जूलियन्’ हे नाव, सुप्रसिद्ध इंग्रज कादंबरीकर्त्री मारी कोरले हिच्या गॉड्स गुड मॅन ह्या कादंबरीतील ‘जूलियन् ॲडर्ली’ ह्या उत्कट मनोवृत्तीच्या, सौंदर्यपूजक आणि स्वच्छंद कवीच्या व्यक्तिरेखेवरून त्यांनी घेतले आणि आपल्या ‘माधव’ या नावाला जोडले. माधवरावांचा जन्म गुजरातमध्ये, बडोदे शहरी, त्यांच्या आजोळी झाला. पुणे जिल्ह्यातील आवळस या गावी त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. माध्यमिक इंग्रजी शिक्षण त्यांनी बडोदे, अहमदाबाद आणि मुंबई येथे पूर्ण केले (१९०९). बडोदे कॉलेजातून १९१६ मध्ये बी. ए. झाल्यानंतर बडोद्याच्या महारा णी चिमणाबाई हायस्कूलमध्ये सु. वर्षभर त्यानी अध्यापन केले.१९१८ मध्ये मुंबईच्या एल्‌फिन्स्टन महाविद्यालयातून फार्सी आणि इंग्रजी हे विषय घेऊन ते एम्. ए. झाले. जून १९१८ ते ऑक्टोबर १९२५ ह्या कालखंडात पुण्याच्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या ‘न्यू इंग्लिश स्कूल’ आणि ‘फर्ग्युसन कॉलेज’ ह्या शिक्षणसंस्थांतून त्यांनी अध्यापन केले.‘न्यू इंग्लिश स्कूलचे ते काही काळ उपप्रमुखही होते. १९१९ मध्ये ह्या संस्थेचे ते आजीव सदस्यही झाले. १९२१ मध्ये कवी श्री. बा. रानडे ह्यांच्याशी त्यांचा निकटचा परिचय झाला. श्री. बा. रानडे, गिरीश, यशवंत इ.कवींबरोबर, माधवरावही ⇨ रविकिरण मंडळ ह्या कविमंडळाचे संस्थापक सदस्य होते. डेक्कन एज्युकेशन सोसायटीशी तीव्र मतभेद झाल्यामुळे त्या संस्थेचा त्यांनी राजीनामा दिला. त्यानंतरचा काही काळ मनस्ताप आणि खडतर परिस्थिती ह्यांना तोंड देत त्यांनी काढला; अनिकेत, व्यवसायहीन अवस्थेतही त्यांना राहावे लागले . पुढे पुण्याच्या भावे स्कूलमध्ये काही काळ शिक्षक म्हणून राहिल्यानंतर, १९२८ मध्ये कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजात फासींचे प्राध्यापक म्हणून त्यांना नेमणूक मिळाली. ह्याच वर्षी त्यांचा विवाह झाला. साहित्यक्षेत्रातील अनेक बहुमान त्यांना त्यानंतरच्या काळात मिळाले. पुणे येथे ते निधन पावले. माधवरावांच्या काव्यलेखनाला पूर्ववयात त्यांच्या बडोदे येथील वास्तव्यातच आरंभ झाला. बडोदे येथील त्यांच्या पूर्ववयातील वास्तव्यात काव्यप्रेमी मित्रांचा, तसेच कवी चंद्रशेखरांचा सहवास त्यांना लाभला. कविमन हे कसे रसिक आणि संस्कारक्षम असते, ह्याचा अनुभव चंद्रशेखरांच्या सहवासात त्यांना मिळाला. निर्दोष व अर्थानुकूल काव्यरचनेचे भान, माधवरावांना चंद्रशेखरांकडून मिळाले. पुण्यास आल्यानंतर त्यांच्या काव्यलेखनाला गती आली. रविकिरण मंडळाच्या किरण (१९२३),मधु-माधव (१९२४) आदी सामूहिक प्रकाशनांतून त्यांच्या काही कविता प्रसिद्ध झाल्या. ख्यातनाम फार्सी कवी उमरखय्याम ह्याच्या रुबायांचा माधवरावांनी केलेला मराठी अनुवाद १९२९ मध्ये प्रसिद्ध झाला (उमरखय्यामकृत रुबाया ). उमरखय्यामच्या रुबाया त्यांनी तीन वेळा अनुवादिल्या. उमरखय्यामकृत रुबाया त्यांनी मूळ फार्सी रुबायांवरुनच अनुवादिल्या (एकूण ५२४).त्यानंतर एडवर्ड फिट्सलेरल्डने उमरखय्यामच्या रुबायांचे केलेले इंग्रजी रुपांतर द्राक्षकन्या (१९३१) ह्या नावाने त्यांनी अनुवादिले.‘मधुलहरी’ हे रुबायांचे, त्यांनी केलेले तिसरे भाषांतर. रुबायांच्या फिट्सजेहल्डकृत भाषांतराच्या चौथ्या आवृत्तीवरून हे भाषांतर माधवरावांनी केले होते. विरहतरंग (१९२६) आणि सुधारक (१९२८) ही त्यांची सामाजिक खंडकाव्ये त्यांनी रुबायाच्या केलेल्या पहिल्या अनुवादापूर्वीच प्रकाशित झालेली होती. नकुलालंकार (१९३९) हे त्यांनी लिहिलेले आणखी एक खंडकाव्य. त्यांनी लिहिलेल्या गझल त्यांच्या गज्जलांजलीतून (१९३३) आणि सुनीते तुटलेले दुवे (१९३८) ह्या त्यांच्या संग्रहातून संगृहीत आहेत. तुटलेले दुवे ह्या संग्रहातील सुनीतांतून एक कथासूत्र गुंफण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे.स्वप्नरंजन (१९३४) हा त्यांच्या स्फुट कवितांचा संग्रह. उपर्युक्त ‘मधुलहरी’ व माधरावांच्या अन्य काही कविता मधुलहरी व इतर कविता ह्या नावाने १९४० मध्ये पुस्तकरू पाने प्रकाशित झाल्या. माधवराव हे मूलतः कवी होते. काव्य हाच त्यांच्या समग्र वाङ्‍मयनिर्मितीचा केंद्रबिंदू होता; तसेच प्रयोगशीलता हा त्यांच्या काव्यात्म व्यक्तिमत्त्वा चा महत्त्वा चा घटक होता. काव्याच्या संदर्भात त्यांनी अनेक प्रयोग केले. प्रयोगशीलतेच्या दृष्टीनेकेशवसुत आणि मर्ढेकर ह्या दोन युगप्रवर्तक कवींच्या मधील एकमेव दुवा म्हणून माधवरावांचे नाव गौरवाने घेतले जाते.केशवसुती काव्यकल्पनेचे विस्तरण करू न मराठी काव्यकल्पनेवर एक नवे अंतर्बाह्य संस्करण करण्याचे श्रेयही त्यांना दिलेजाते. त्यांच्या काही कवितांतून मर्ढेकर प्रतिमासृष्टीची चाहूल लागते. गझल हा काव्यप्रकार मराठीत रुजवण्याचे पहिले श्रेयहीत्यांचेच. स्वातंत्र, प्रेम आणि शांती ही मूल्ये त्यांनी आयुष्यभर जोपासली आणि त्यांच्या काव्यातही त्यांचे प्रत्यंतर येते. प्रीती हात्यांच्या कवितेचा महत्त्वा चा विषय असून प्रेमभावनेच्या अनेक तरल छटा तीत व्यक्त झाल्या आहेत. फार्सी प्रेमकाव्याचा प्रभावहीतीवर आहे. काव्यनिर्मितीप्रमाणेच माधवरावांनी काव्यसमीक्षा आणि काव्यविचारही केला. आधुनिक मराठी कवी आणि कविता ह्यांच्यासंदर्भात त्यांनी आपले समीक्षात्मक लेखन मुख्यतः केले; तिच्यातील न्यूनाधिक्य त्यांच्या दृष्टिकोणातून दाखवून दिले.आधुनिक मराठी कविता बरीचशी परपुष्ट आणि अनुकरणशील आहे, असे त्यांचे मत होते. आधुनिक मराठी कवितेवर त्यांनीइंग्रजीतूनही लेखन केले. चिकित्सकपणा आणि रसग्राही वृत्ती ह्यांचा समतोल समीक्षकाने सांभाळला पाहिजे, अशी त्यांचीभूमिका होती. त्यासाठी त्यांनी ‘काव्यचिकित्सा’ ही लेखमालाही लिहिली. रसव्यवस्था आणि वाङ्‍मयानंदमीमांसा ह्याविषयांवरही त्यांनी लेखन केले. काव्यविहार (१९४७) व काव्यचिकित्सा (१९६४) हे त्यांचे कविकाव्यविषयक लेखसंग्रहआहेत. माधवरावांचा फार्सी –मराठी कोश १९२५ मध्ये प्रसिद्ध झाला. तो करताना तौलनिक आणि ऐतिहासिक दृष्टीचा अवलंब त्यांनीकेला होता. त्यांची परिश्रमशीलता, सावधानता व सूक्ष्म अभ्यास ह्यांचा प्रत्यय ह्या कोशातून येतो. ऐतिहासिक कागदपत्रांच्याअभ्यासासाठी एक महत्त्वा चे साधन ह्या कोशामुळे उपलब्ध झाले. त्यानंतर दोनच वर्षांनी पद्यरचनाशास्त्रावरील छंदोरचना हात्याचा ग्रंथ प्रसिद्ध झाला (१९२७). छंद:प्रकार कसे परिणत होत आले, ह्याचे विवेचन करावे आणि छंद:शास्त्राची पुनर्घटनाकरावी अशा हेतूने हा ग्रंथ त्यांनी लिहिला. पद्य म्हणजे लयबद्ध अक्षररचना होय, हा सिद्धांत त्यांनी ह्या ग्रंथात मांडला. तसेचपद्यरचना ही वृत्तजातिछंद:स्वरूप अशी त्रिविध आहे, हे त्यांनी संशोधनपूर्वक दाखवून दिले. ह्या ग्रंथाची दुसरी परिवर्धितआवृत्ती (१९३७) माधवरावांनी डी. लिट्. ही पदवी मिळविण्यासाठी मुंबई विद्यापीठाकडे सादर केली आणि १९३८ मध्ये हीपदवी त्यांना प्राप्त झाली. ह्या ग्रंथाने मराठी पद्यरचनाशास्त्राचा पाया घातला. छंदोरचनेचाच विषय घेऊन त्यांनी पद्यप्रकाश(१९३८) लिहिले. शिक्षक आणि विद्यार्थी ह्याच्यासाठी हे पुस्तक मुख्यतः आहे. भाषाशुद्धीचे प्रखर पुरस्कर्ते म्हणूनही ते प्रसिद्ध आहेत. त्यासाठी त्यांनी महाराष्ट्राबाहेरही अनेक व्याख्याने दिली. लेखहीलिहिले, भाषाशुद्धिविवेक (१९३८) ह्या ग्रंथात त्यांचे हे लेख संगृहीत आहेत. ‘परकी शब्द न वापरणे, जुन्या मराठी शब्दांचाआठव ठेवून पुरस्कार करणे आणि नव्या नडी स्वावलंबनाने कष्टून भागवणे’ हा आपला संकल्प त्यानी भाषाशुद्धिविवेकाच्याप्रस्तावनेत व्यक्त केला. नासिक येथे १९३३ साली झालेल्या महाराष्ट्र क‍विसंमेलनाचे ते अध्यक्ष होते. तसेच बडोदे येथे भरलेल्या महाराष्ट्र साहित्यसंमेलनाच्या (१९३४) काव्यशाखेचे ते अध्यक्ष होते. १९३५ मध्ये बडोदे सरकारकडून त्यांचा साहित्यसत्कार करण्यात आला.१९३६ मध्ये जळगाव येथे झालेल्या महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले.

 

संदर्भ : १. करंदीकर, गो. वि. परंपरा आणि नवता, मुंबई, १९६७; आवृ. २, १९८०.

२. कानेटकर, शंकर केशव, स्वप्नभूमी, पुणे, १९६५.

३. खानोलकर, गं. दे. माधव जूलियन, मुंबई, १९५१; आवृ. दुसरी, १९६८.

४. गोखले, द. न. डॉ. पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, मुंबई, १९७८,

५. चुनेकर, सु. रा. माधवराव पटवर्धन : वाङ्‍मयदर्शन, मुंबई, १९७३.

लेखक - अनुराधा पोतदार

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate