অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मास्टर तारासिंग

मास्टर तारासिंग

मास्टर तारासिंग : (२४ जून १८८५–२२ नोव्हेंबर १९६७). अकाली दलाचे नेते. मूळ गाव नानकचंद. त्यांचा जन्म हरयाळ (रावळपिंडी जिल्हा) या खेड्यात एका सामान्य कुटुंबात झाला. वडील बक्षी गोपीचंद हे हरयाळ खेड्याचे पटवारी होते. लहानपणापासून त्यांचा ओढा शीख धर्माकडे होता. वयाच्या सतराव्या वर्षी त्यांनी शीख धर्म स्वीकारला. पदवीपरीक्षा १९०३ मध्ये उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी शिक्षणशास्त्रातील पदविका घेतली आणि शिक्षकी पेशा पतकरला. विद्यार्थिदशेत ब्रिटिशांविरुद्धच्या छात्र–चळवळीचे त्यांनी अनेक वेळा नेतृत्व केले. तसेच मैदानी खेळांत प्रावीण्य मिळविले. १९०७ मध्ये काही मित्रांच्या सहकार्याने त्यांनी ल्यालपूर येथे खालसा विद्यालय सुरू केले व अत्यंत अल्प वेतनावर त्याच्या मुख्याध्यापकपदाची धुरा सांभाळली. या सेवावृत्तीमुळे त्यांना ‘मास्टर’ ही उपाधी लाभली. शीख पंथीय राजकारणात त्यांनी प्रथमपासून भाग घेतला. गुरुद्वारांच्या शुद्धीकरण मोहिमेत ते अग्रभागी होते. अखेरीस ब्रिटिशांनी गुरुद्वारांच्या किल्ल्या शिखांच्या प्रातिनिधिक मंडळाकडे दिल्या.

पुढे नाभा संस्थानच्या चळवळीत भाग घेतल्याने त्यांना काही दिवस तुरुंगवास भोगावा लागला. या चळवळीमुळे अकाली दलात जहाल आणि मवाळ असे दोन गट पडले. जहाल गटाचे नेतृत्व तारासिंगाकडे होते. त्यांनी इतर पक्षांबरोबर सायमन आयोगावर बहिष्कार टाकला, पण नंतर प्रसिद्ध झालेल्या नेहरू अहवालाविरुद्ध त्यांनी चळवळ केली. पुढे ते म. गांधींच्या असहकार चळवळीत सहभागी झाले आणि वायव्य सरहद्द प्रांतात जाण्याचा निर्धार केला, पण लाहोरलाच त्यांना अटक झाली. १९३२ मध्ये रॅम्से मॅक्डॉनल्ड यांनी जातीय निवाडां जाहीर केला असता तारासिंगांनी त्याला कडाडून विरोध केला. अखंड भारत असे एक राष्ट्र असावे या मताचे तारासिंग होते. पण पाकिस्तानची मागणी पुढे येताच त्यांनी वेगळ्या शिखीस्तानची मागणी केली. स्वातंत्र्योत्तर कालखंडात त्यांनी स्वतंत्र पंजाबी सुभ्याची मागणी केली आणि त्याकरिता आमरण उपोषण आरंभिले. हे ४३ दिवसांचे उपोषण १५ ऑगस्ट १९६१ रोजी संपले आणि त्याबरोबरच तारासिंगाचे राजकारणातील स्थान जवळजवळ संपुष्टात आले. तारासिंग एक धडाडीचे वृत्तपत्रकार व लेखक होते.

अकाली ते प्रदेशी या वृत्तपत्राचे ते अनेक वर्षे संपादक होते. त्यांची बाबा तेगासिंग, प्रेमलगन व मेरी याद (१९४५) ही तीन पुस्तके प्रसिद्ध असून मेरी याद (१९४५) ही संस्मरणिका आहे. त्यांनी मुंबई व लुधियाना या ठिकाणी अनुक्रमे खालसा महाविद्यालय व गुरू नानक अभियांत्रिक महाविद्यालय यांची स्थापना केली. चंदीगढ येथे ते मरण पावले.

 

लेखक - इंदुमति केळकर

स्त्रोत - मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/23/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate