অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मोतीलाल गंगाधर नेहरू

मोतीलाल गंगाधर नेहरू

मोतीलाल गंगाधर नेहरू : (६ मे १८६१–६ फेब्रुवारी १९३१). भारतीय स्वातंत्र्य-चळवळीतील एक श्रेष्ठ पुढारी, स्वराज्य पक्षाचे संस्थापक-सदस्य आणि कायदेपंडित जन्म आग्रा येथे. मोतीलाल यांचा जन्म होण्यापूर्वी तीन महिने आधी त्यांचे वडील निधन पावले. नेहरू कुटुंब हे मूळचे काश्मीरमधील आणि त्यांचे मूळ आडनाव कौल. अठराव्या शतकात फरूखसियर या मोगल बादशाहाच्या निमंत्रणावरून ते दिल्लीला आले. त्यांना एक जहागीर व कालव्याकाठी घर देण्यात आले. कालव्याला हिंदीमध्ये नहर म्हणतात, त्यावरून पुढे त्यांचे नेहरू हे आडनाव रूढ झाले असावे. मोतीलालांचे आजोबा लक्ष्मीनारायण हे दिल्ली दरबारात ईस्ट इंडिया कंपनीचे वकील होते, तर वडील गंगाधर हे दिल्लीचे कोतवाल होते. १८५७ च्या उठावात नेहरू कुटुंबाचे आर्थिक नुकसान फार झाले आणि त्यांनी आग्र्यास स्थलांतर केले. वडिलांच्या मृत्यूनंतर मोतीलालांचे संगोपन व शिक्षण त्यांचा थोरला भाऊ नंदलाल व आई जीऊराणी यांनी केले. नंदलाल हे त्या वेळी प्रथम खेत्री संस्थानात दिवाण होते, पुढे त्यांनी कायद्याचा अभ्यास करून वकिली केली. आग्र्याचे उच्च न्यायालय अलाहाबाद येथे हलविल्यावर नेहरू कुटुंबही तिकडे गेले व तेथेच स्थायिक झाले.

मोतीलाल यांचे प्राथमिक शिक्षण खेत्री येथे, तर पुढील शिक्षण कानपूर व अलाहाबाद येथे झाले. बी. ए. ला असताना त्यांनी शिक्षण सोडले आणि वकिलीची परीक्षा दिली (१८८३). प्रथम काही वर्षे कानपूरला उमेदवारी केल्यानंतर ते अलाहाबादला नंदलाल यांच्या हाताखाली वकिली करण्यासाठी आले. नंदलाल १८८७ मध्ये मरण पावले व नेहरू कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर पडली. तत्पूर्वी विद्यार्थीदशेतच त्यांचे पहिले लग्न झाले होते; पण पत्नी व मुलगा ही दोघेही मरण पावली. त्यानंतर त्यांचा दुसरा विवाह स्वरूपराणी यांच्याशी झाला. त्यांना चार अपत्ये झाली. त्यांपैकी पहिला मुलगा लहानपणीच वारला. जवाहरलाल, स्वरूपकुमारी ऊर्फ विजयालक्ष्मी (पंडित) व कृष्णा (हाथिसिंग) यांचे जन्म अनुक्रमे १८८९, १९०० व १९०७ या वर्षी झाले. यांपैकी जवाहरलाल स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान झाले, तर  विजयालक्ष्मी पंडित संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या पहिल्या अध्यक्षा झाल्या.

मोतीलालांची वकिलीतील कीर्ती झपाट्याने वाढली आणि त्यांना मिळकतही भरपूर होऊ लागली. त्यांनी अलाहाबादला आनंदभवन नावाचा भव्य प्रासाद बांधला. त्यांचे राहणीमान पाश्चात्त्य पद्धतीचे होते. शिकार, टेनिस, पोहणे यांसारखे खेळ, उंची कपडे, उत्तम मद्य, सुग्रास भोजन व निवडक मित्रांचा सहवास यांत ते रममाण होत. त्यांनी यूरोपच्या कधी एकट्याने, तर कधी सहकुटुंब अशा अनेक सफरी केल्या. जवाहरलालना इंग्लंडच्या हॅरो येथील प्रसिद्ध विद्यानिकेतन (पब्लिक स्कूल) मध्ये दाखल करण्यासाठी ते सहकुटंब इंग्लंडला गेले (१९०५). सुरुवातीस त्यांनी वकिली व तत्संबंधित विषय यांपलीकडे दुसऱ्या कशातही फारसे लक्ष दिले नाही. राष्ट्रीय चळवळ व काँग्रेस यांबद्दल त्यांना सहानभूती होती; पण त्यात सक्रिय भाग त्यांनी कधीच घेतला नाही. काँग्रेसच्या अधिवेशनांना केवळ एक प्रेक्षक म्हणूनच ते हजर असत; तथापि बंगालच्या फाळणीनंतर काँग्रेसमध्ये मवाळ (नेमस्त) व जहाल असे दोन तट पडले.

१९०७ च्या सुरुवातीस काँग्रेसमध्ये हा वाद अधिक उफाळून आला आणि मोतीलाल नेमस्तांच्या राजकारणाकडे आकृष्ट झाले. हा त्यांचा मार्ग जवाहरलाल यांना मान्य नव्हता, त्यामुळे पुढे पिता-पुत्रांमध्ये मतभेद झाले. मवाळांचे काँग्रेसमध्ये मताधिक्य असल्यामुळे मोतीलाल संयुक्त प्रांताच्या काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष झाले. त्याशिवाय म्युनिसिपल बोर्डाचे सदस्य, मिंटो मेमोरियल कमिटीचे चिटणीस, प्रयाग सेवा समितीचे उपाध्यक्ष अशा विविध नात्यांनी त्यांचे कार्य चालू होते. पण त्यांच्या राजकीय जीवनाची खरी सुरुवात होमरूल लीगच्या स्थापनेनंतर १९१७ मध्ये झाली. या वेळी बेझंटबाईंच्या बाजूने ते सरकारविरुद्ध उभे राहिले. अलाहाबाद होमरूल शाखेचे ते अध्यक्ष झाले. यानंतर काही वर्षांतच जालियनवाला बागेत ब्रिटिशांनी भारतीयांची अमानुष कत्तल केली. या हत्याकांडाच्या काँग्रेसनियुक्त चौकशी समितीचे ते सदस्य होते. तत्पूर्वी आपली मते स्वतंत्रपणे मांडण्याकरिता त्यांनी इंडिपेंडंट नावाचे वृत्तपत्र सुरू केले (फेब्रुवारी १९१९). अमृतसर काँग्रेसचे ते अध्यक्ष झाले (१९१९). त्यांची म. गांधीशी भेट झाली व त्यांच्या जीवनात आमूलाग्र परिवर्तन घडून आले. १९२० च्या नागपूर काँग्रेसने असहकाराच्या चळवळीचा पुरस्कार केला व इतर कार्यकर्त्यांप्रमाणे मोतीलाल यांनीही विलासी वृत्ती टाकून सर्व बाबतींत स्वदेशीचा अवलंब केला. वकिली सोडून स्वातंत्र्य चळवळीस वाहून घेतले. असहकाराच्या चळवळीत भाग घेतल्याने ६ डिसेंबर १९२१ रोजी त्यांना अटक झाली व नैनितालच्या तुरुंगात सहा महिन्यांची शिक्षा भोगावी लागली. तुरुंगात त्यांना दम्याच्या विकाराचा त्रास झाला.

पुढे त्यांना म. गांधींचा मार्ग रास्त वाटेना, तेव्हा त्यांनी चित्तरंजन दास यांच्या सहकार्यांने स्वराज्य पक्षाची स्थापना केली (१९२३). या पक्षाने विधिमंडळात काही जागा मिळविल्या. मोतीलाल यांचे संसदपटुत्व या काळात दिसून आले; तथापि १९२४–३० या काळातील विधिमंडळातील अनुभवाने त्यांचा भ्रमनिरास झाला आणि पुन्हा ते गांधीवादी मार्गाचा पुरस्कार करू लागले. १९२७ मध्ये सायमन आयोगाविरुद्ध लोकमत तयार करण्यासाठी ते झटले. या सुमारास सर्व पक्षीय नेत्यांची सभा होऊन एक स्वराज्याचा आराखडा तयार करण्यासाठी समिती स्थापण्यात आली. या समितीत मोतीलाल व त्यांच्या मदतीसाठी तेजबहादूर सप्रू, लोकनायक अणे, सुभाषचंद्र बोस, एम्. आर्. जयकर, अली इमाम प्रभृती विद्वानांची नेमणूक करण्यात आली. समितीने हिंदुस्थानाच्या स्वराज्याचा आराखडा तयार केला, तोच नेहरू अहवाल म्हणून प्रसिद्ध आहे. हा अहवाल भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक महत्त्वाचा दस्तऐवज मानला जातो. यानंतर मोतीलाल १९२८ मध्ये कलकत्ता काँग्रेसचे अध्यक्ष झाले. त्यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय काँग्रेसने वसाहतीच्या स्वराज्याची मागणी केली. ही मागणी ब्रिटिशांनी जर एक वर्षाच्या आत मान्य केली नाही, तर संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी करण्याचे ठरले. १९२९ च्या लाहोर येथील काँग्रेस अधिवेशनात अध्यक्षपदाची सूत्रे जवाहरलाल नेहरूंच्या हाती आली आणि त्यांनी संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी केली. यानंतर १९३० मध्ये महात्माजींच्या दांडी सत्याग्रहाच्या वेळी ब्रिटिशांनी पुन्हा राष्ट्रीय नेत्यांची धरपकड केली. मोतीलाल यांना पुन्हा तुरुंगात डांबण्यात आले. या वेळी त्यांचा दम्याचा विकार फारच बळावला, यामुळे त्यांना सोडण्यात आले. लखनौ येथील रुग्णालयात त्यांना उपचारार्थ ठेवले असताना तेथेच त्यांचे निधन झाले.

मोतीलाल नेहरूंचे राजकीय कार्य-विशेषतः नेहरू अहवालाच्या रूपाने कायम झालेले-महत्त्वाचे आहेच; पण त्यांचे सुपुत्र पंडित जवाहरलाल या जगन्मान्य नेत्याच्या व्यक्तिमत्त्वाच्या घडणीतही त्यांचा हातभार मोलाचा ठरला. देशभक्तीचे एक आदर्श उदाहरण त्यांनी विलासी जीवनाचा तडकाफडकी त्याग करून व साधी त्यागमय राहणी स्वीकारून कायमचे उभे केले. कायदेपटू व संसदपटू म्हणूनही त्यांचे स्थान श्रेष्ठ होते.

 

संदर्भ : 1. Nair, L. R. Ed. Motilal Nehru-Birth Centenary Souvenir,  New Delhi, 1961.

2. Nanda, B. R. The Nehrus, London, 1962.

 

लेखक - सु. र. देशपांडे

स्त्रोत - मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate