অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

वैकुंठ लल्लुभाई मेहता

वैकुंठ लल्लुभाई मेहता

वैकुंठ लल्लुभाई मेहता  : (२३ ऑक्टोबर १८९१ – २७ ऑक्टोंबर १९६४) थोर गांधीवादी विचारवंत आणि भारतीय सहकारी चळवळीचे एक प्रवर्तक. वडील लल्लुभाई व आई सत्यवतीबेन. त्यांचा जन्म अहमदाबाद येथे सधन नागर ब्राह्म ण कुटुंबात झाला. सुविख्यात भारतीय अर्थतज्ञ गगनविहारी हे यांचे धाकटे बंधू. वैकुंठभाईंचे माध्यमिक शिक्षण मुंबईच्या न्यू हायस्कूलमध्ये झाले. ते मॅट्रिकच्या परीक्षेत गणित विषयात सर्वप्रथम आले. एल्‌फिन्स्टन महाविद्यालयातून गणित विषय घेऊन प्रथम श्रेणीत पदवी संपादून त्याचबरोबर मुंबई विद्यापीठात इंग्रजी विषयात सर्वप्रथम येऊन त्यांनी एलिस पारितोषीक मिळविले.

म.गांधींचे स्वीय साहाय्यक महादेव देसाई (१८९२–१९४२), बाँबे क्रॉनिकलचे संपादक सयद अब्दुल्ला ब्रेल्वी हे वैकुंठभाईंचे महाविद्यालयीन सहकारी असून त्यांची मैत्री अखेरपर्यंत राहिली. वैकुंठभाईंना आपल्या वडिलांप्रमाणेच सहकारी चळवळीत अतिशय रुची होती; मुंबई राज्य सहकारी बॅंकेत त्यांनी ३४ वर्षे काम केले; ही बॅंक म्हणजे सबंध मुंबई राज्यातील ग्रामीण पुनर्रचना कार्याचे त्यांनी केंद्र बनविले. खेर मंत्रिमंडळात (१९४७–५२) वैकुंठभाईंंना वित्त व सहकार मंत्री म्हणून नियुक्त करण्यात आले.

१९५२ मध्ये त्यांना ‘वित्त आयोग’ तसेच 'कर चौकशी समिती' यांचे सदस्य बनविण्यात आले. १९५३ मध्ये ते ‘अखिल भारतीय खादी व ग्रामोद्योग मंडळा’ चे (१९५७ पासून खादी व ग्रामोद्योग आयोग) अध्यक्ष बनले. याशिवाय ‘मुंबई प्रांत बॅंकिंग चौकशी समिती’ (१९३९–४०), ‘कापड उद्योग चौकशी आयोग’ (१९५३–५४) इ. समित्यांवर सदस्य म्हणून, तर ‘कृषी सहकारी पत आयोगा’चे (१९५९) अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले. हरिजन सेवक संघाच्या मुंबई प्रांतिक मंडळाचे ते सदस्य, तर ‘गांधी स्मारक निधी’ च्या मुंबई शाखेचे ते अध्यक्षही होते. वैकुंठभाईंना ब्रिटिश सरकारने कैसर-ई-हिंद रौप्यपदक (१९१६), तर सुवर्णपदक (१९२१) देऊन गौरविले; तथापि सरकारच्या अत्याचारी व दडपशाही धोरणाच्या निषेधार्थ त्यांनी ही दोन्ही पदके १९३० मध्ये सरकारला परत केली. १९५४ मध्ये भारत सरकारने त्यांचा ‘पद्मभूषण’ हा किताब देऊन सन्मान केला.

कट्टर गांधीवादी असल्याने वैकुंठभाईंना राजकारणापेक्षा महात्मा गांधींच्या विधायक कार्यामध्ये अधिक रस होता. त्यामुळेच म.गांधी व सरदार पटेल या दोघांच्या आग्रहाखातर वैकुंठभाईंनी खेर मंत्रिमंडळात वित्तखाते स्वीकारले. प्रतिदिनी ते सूत कातत असत व केवळ खादी वापरत. वाचन हा त्यांचा एकमेव छंउ असून त्यापायीच त्यांनी स्वतःचे असे समृद्ध ग्रंथालय उभे केले. हर्बर्ट जॉर्ज वेल्स (१८६६–१९४६), जोसेफ कॉन्‌रॅड (१८५७–१९२४) हे लेखक व कवी रॉबर्ट ब्राउनिंग (१८१२–८९) हे त्यांचे आवडते साहित्यकार होते. गांधीप्रणीत अर्थशास्त्राबाबत अनुकूलता तसेच अर्थव्यवस्थेचे विकेंद्रीकरण आणि ग्रामीण स्वयंनिर्भरता यांवर वैकुंठभाईंचा विश्वास असूनही राजकीय मतांबाबत ते मवाळ पक्षाचे होते; त्यांनी एकदाही कारावास पतकरला नाही. विनम्र वृत्तीचे असल्याने वैकुंठभाई नेहमीच प्रसिद्घीपराङ्‌मुख राहणे पसंत करीत.

सहकारी चळवळ व ग्रामोद्योग यांवर वैकुंठभाईंनी अनेक पुस्तके लिहिली. द को-ऑपरेटिव्ह मूव्हमेंट (१९१५), द को-ऑपरेटिव्ह मूव्हमेंट इन इंडिया (१९१८), स्टडीज इन को-ऑपरेटिव्ह फायनान्स (१९२७), प्लॅनिंग फॉर को-ऑपरेटिव्ह मूव्हमेंट (१९४१), व्हाय व्हिलेज इंडस्ट्रीज, इकॉनॉमिक्स ऑफ नॉन व्हायलन्स, डीसेंट्रलाइज्ड इकॉनॉमिक डिव्हलपमेंट (१९६३) ही त्यांपैकी काही महत्त्वाची पुस्तके होत. वैकुंठभाईंचे जीवन म्हणजे सहकारी चळवळ व ग्रामोद्योग यांच्या विकासार्थ देशासाठी सेवारत झालेले शांत समर्पणाचे उत्कृष्ट उदाहरणच होय. त्यांचे मुंबई येथे निधन झाले.

 

लेखक - वि. रा. गद्रे

स्त्रोत - मराठी विश्वकोश

 

 

अंतिम सुधारित : 4/26/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate