অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

इंडियाना

इंडियाना

अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील एक राज्य. क्षेत्रफळ ९४,३५६; लोकसंख्या ५१,४३,४२२ (१९७०). ३७४७' उ. ४१ ४६' उ. आणि ८४ ४८' प. ते ८८ ४' प. याच्या दक्षिणेस ओहायओ नदी व केंटकी राज्य, पश्चिमेस इलिनॉय, उत्तरेस मिशगन सरोवराचा थोडाभाग व मिशिगन राज्य आणि पूर्वेस ओहायओ राज्य आहे. याची दक्षिणोतत्र लांबी ४१६ किमी. व पूर्वपश्चिम रुंदी २४० किमी. असून मिशिगन सरोवराचा ५४१ चौ. किमी. भाग या राज्यात आहे. राजधानी इंडियानापोलिस येथे आहे.

भूवर्णन

उत्तरेस मिशिगन सरोवराच्या परिसरात प्राचीन काळी प्रचंड हिमस्तराने जमिनीत खणलेले खड्डे व उभारलेले खडकमातीचे ढीग आता अनेक सरोवरांच्या व लहानलहान टेकड्यांच्या रूपाने शिल्लक आहेत. या भागात सु. १,००० सरोवरे असून वॉवासी हे त्यांमधील सर्वांत मोठे आहे. मॅक्सिनककी, फ्रीमन, जेम्स, टिपिकॅनू आणि शेफर ही इतर सरोवरेही सहलीची ठिकाणे बनली आहेत. मध्यभाग ऊर्मिल पृष्ठभागाचा असून तो दक्षिणेकडे उंच होत गेला आहे. दक्षिण भाग चुनखडीच्या खडकांचा, त्यात पाण्याने कोरलेल्या अनेक गुहा व विवरे, कित्येक नद्या, खनिजयुक्त पाण्याचे झरे व टेकड्या असलेला आहे. वँडोटी व मारेंगो या दोन मोठ्या गुहा येथील आकर्षण होत.

उत्तरेकडे दलदलीच्या चिखलाची सकस माती, मका-पट्ट्यातील मध्य भागात मका व टोमॅटो पिकांना उपयोगी पडणारी जमीन व दक्षिणेच्या विविध प्रकारांच्या मृदा तंबाखू व फळांच्या लागवडीस उपयुक्त आहेत. नैऋत्य भागाच्या साडेसोळाहजार चौ. किमी. क्षेत्रात बिट्यूमिनस कोळशाच्या सु. १०० खाणी आहेत. कोळशाचा एकूण अंदाजी साठा पस्तीसशे कोठी टन असावा. राज्यातून बांधकामास योग्य चुनखडी खडकाचे उत्पादन देशात पहिल्या क्रमांकाचे आहे. पेट्रोलिअम, ज्वलनवायू, सिमेंटसाठी चुनखडी व वाळू, पांढरा शाडू ही येथील इतर खनिजे होत.

दक्षिणसीमेची ओहायओ नदी, तिला राज्याच्या आग्‍नेय कोपऱ्यात मिळणारी व्हाईट वगैरे अनेक उपनद्यांची वॉबॅश, ही राज्याच्या ७५ टक्के भूमीवर पडणारा पाऊस वाहून नेते. वायव्य भागातील प्रमुख नदी मॉमी ईअर सरोवरास मिळते. अगदी उत्तरेकडे सेंट जोसेफ व कँकाकी नद्या आहेत. वार्षिक सरासरी तपमान १२·५ से. असून वसंत ऋतू व पावसाळा सौम्य असतात. हिवाळा उत्तरेत कडक तर उन्हाळा दक्षिणेस जास्त असतो. सरासरी वार्षिक पर्जन्य १०० सेंमी. असून उत्तरेपेक्षा दक्षिणेकडे पाऊस जास्त पडतो. वसाहतकारांनी शोतीसाठी वने तोडल्यामुळे येथील फक्त १८ टक्के भूमी वनाच्छादित राहिली आहे. संरक्षित वनात ओक, बीच, सिकॅमोर, अक्रोड, हिकरी, मॅपल अशा जातींचे वृक्ष असून राज्यात फुलझाडे व वेल यांनी वनश्री संपन्न आहे.

इतिहास व राज्यव्यवस्था

फ्रेंच समन्वेषक ला साल १६६९—१६७१ च्या दरम्यान या प्रदेशातून ओहायओ नदीमार्गाने नव्या मुलुखाची पाहणी करीत गेला, तो पुन्हा या राज्याच्या वायव्य कोपऱ्यातला कँकाकी नदीमार्गाने १६७९ मध्ये पश्चिमेकडे गेला. नंतर व्हिन्सेंझ व फोर्ट वेन या ठिकाणी केसाळ चामड्यांच्या व्यापारासाठी फ्रेंच ठाणी स्थापण्यात आली. फ्रेंचांची अमेरिकन वसाहत सांभाळण्यासाठी संरक्षक गढ्यांची अशी मालिकाच बांधलेली होती, पण युद्धात इंग्रजांपुढे फ्रेंच लोक हरल्यामुळे या गढ्या इंग्रजांकडे आल्या. अमेरिकन स्वातंत्र्ययुद्धात आदिवासी इंडियनांना अमेरिकनांवर हल्ले करण्यास जेव्हा इंग्रज चिथावणी देऊ लागले. तेव्हा त्यांच्या प्रतिकारार्थ एक अत्यंत धाडसी मोहीम जॉर्ज रॉजर क्लार्क याने काढली.

व्हर्जिनियाचा राज्यपाल पॅट्रिक हेन्‍री याच्या पाठिंब्याने भर हिवाळ्यात दूर अंतरावरून येऊन ब्रिटिशांवर अचानक हल्ला चढवून त्याने १७७८ मध्ये व्हिन्सेंझ जिंकले, लगेच गमावले पण पुन्हा पुढल्याच वर्षी ते काबीज करून अ‍ॅपालॅचिअन पर्वतापासून मिसिसिपी नदीपर्यंतचा मुलूख संघराज्यासाठी मिळविला. इंडियन जमातींच्या वसाहतकारांशी चकमकी चालूच राहिल्या. १७९४, १८११ आणि १८१३ मधील लढायांत अखेर इंडियनांचा बिमोड झाला.

१८०० पासून केंद्रशासित प्रदेश असलेल्या इंडियानाला १८१३ मध्ये एकोणिसावे राज्य म्हणून अमेरिकन संयुक्त संस्थानांच्या संघराज्यात प्रवेश मिळाला. लिंकनचे आईवडील या राज्यातील रहिवासी होते. १८२५ मध्ये रॉबर्ट ओवेन या ध्येयवादी इंग्रज कारखानदाराने 'न्यू हार्मनी' नावाची आदर्श वसाहत याच राज्यात स्थापिली होती.

जरी ती यशस्वी झाली नाही, तरी श्रमिक आणि समाजसुधारणेच्या इतिहासात तिने स्थान मिळविले. यादवी युद्धाचा स्पर्श या राज्याला एकदा झाला. 'मॉर्गन्स रेडर्स' हे बंडखोरांचे घोडदळ दक्षिणेकडून ओहायओ नदी ओलांडून आले आणि एक लढाई देऊन पूर्वेस ओहायओ राज्यात घुसले, तेव्हा या राज्याने उत्तरेच्या संघराज्यपक्षाला २०,००० सैनिक पुरविले. दोन्ही महायुद्धांत इंडियानाने लाखांनी सैनिक दिले. शिवाय तोफा, चिलखती पत्रे, रणगाडे, विमानांची यंत्रे अशी युद्धसामग्री पुरविली.

१८५१ च्या संविधानानुसार ४ वर्षांसाठी निवडलेले गव्हर्नर व ४ खातेप्रमुख आणि २ वर्षांसाठी निवडलेले ४ खातेप्रमुख यांच्याकडे कार्यकारी सत्ता असते. चार वर्षांसाठी निवडलेल्या १०० सदस्यांचे प्रतिनिधिगृह व चार वर्षांसाठी पाळीपाळीने निवडलेल्या ५० सदस्यांचे सीनेट मिळून होणारे विधिमंडळ एक वर्षा-आड ६१ दिवसांच्या अधिवेशनासाठी भरते. सर्वोच्च न्यायालयाचे ५ न्यायमूर्ती ६ वर्षांसाठी व अ‍ॅपेलेट न्यायालयाचे न्यायाधीश ४ वर्षांसाठी निवडलेले असतात. राष्ट्रीय संसदेवर इंडियानातर्फे २ सीनेटर व ११ प्रतिनिधी निवडून दिले जातात.

आर्थिक व सामाजिक परिस्थिती

हे कृषिप्रधान राज्य आहे. राज्यातील ७७·५% जमीन लागवडीखाली असून मका, ओट, सोयाबीन, बार्ली, तंबाखू, फळफळावळ ही येथील महत्त्वाची पिके होत. तथापि मांसासाठी डुकरे, गुरे व कोंबड्या पोसून तयार करण्याचा धंदा मोठा आहे. १९६९ मध्ये राज्यात १८·४ लक्ष गुरे असून त्यांपैकी २·७ लक्ष दूध देणाऱ्या गाई होत्या. याशिवाय २·८ लक्ष शेळ्यामेंढ्या, ४२·८ लक्ष डुकरे, १·८ कोटी कोंबड्या होत्या. देशातील ७५ टक्के पेपरमिंट व स्पिअरमिंट वनस्पतींचा पुरवठा याच राज्यातून होतो.

कारखानदारीत पोलादधंदा देशात तिसरा असून मिशिगन सरोवराजवळील गेअरी उद्योगकेंद्राची जगातल्या मोठ्या केंद्रात गणना होते. तेथील पोलाद कारखाना जगातील मोठ्या कारखान्यांपैकी एक समजला जातो. मोटारी, विमाने, वाहतुकीची विविध साधने, विजेची व इतर यंत्रे यांचेही महत्त्वाचे उत्पादन होते. साउथ बेंडमधील स्ट्यूडबेकर कारखान्याने देशाला बऱ्याच मोटारी, वॅगन पुरविल्या आहेत; एलवुड हेन्स याने १८९४ मध्ये पहिली मोटारगाडी या राज्यात बनविली.

१९११ पासून इंडियानापोलिस येथे मोटारशर्यती भरतात. त्या जगप्रसिद्ध असून त्यामुळे मोटाररचनेच्या सुधारणेस मदत होते. कोळसा, बांधकामासाठी चुनखडी व वाळू, पेट्रोलियम व खनिज वायू यांमुळे येथील उद्योगांस चालना मिळाली.

देशातील ४३% बांधकामाचा दगड येथून जातो. तसेच जगातील मोठ्या तेलशुद्धीकरण कारखान्यांपैकी एक या राज्यात आहे. राज्याच्या दक्षिण सीमेची ओहायओ नदी जलवाहतुकीस पिट्सबर्ग टापू व मिसिसिपी जलमार्गापर्यंत पूर्वीपासून उपयुक्त असल्याने राज्याची झपाट्याने वाढ झाली. तिला मिळणारी वॉबॅश, मुखापासून ३२० किमी. पर्यंत उपयोगी असून उत्तरेस मिशिगन सरोवरातून महासागरापर्यंत दळणवळण चालते.

१९७० मध्ये राज्यात लोहमार्ग १०,८९१ किमी., रस्ते १,६३,४९६ किमी. (पैकी ९० टक्के पक्के), १८० विमानतळ असून २९·७५ लाख मोटारी होत्या. याशिवाय येथे ८३ नभोवाणीकेंद्रे, १८ दूरचित्रवाणीकेंद्रे, २७·६६ लाख दूरध्वनियंत्रे, ८३ दैनिके व ३०२ इतर नियतकालिके होती. एकूण लोकसंख्येपैकी ६२·४ टक्के शहरी होती.

लोकसंख्येत निग्रोंचे प्रमाण ५०·८ टक्के होते. ७ ते १६ वयापर्यंत शिक्षण मोफत व सक्तीचे असून १९६८ साली शाळांत ११,९१,४२९ विद्यार्थी होते. याशिवाय येथे दोन सरकारी व चार खाजगी विद्यापीठे, अनेक महाविद्यालये, कलासंस्था, सरकारी ग्रंथालये व वस्तुसंग्रहालये आहेत. ऐतिहासिक स्मृतिस्थाने, राज्योद्याने, चुनखडीच्या खडकातील दऱ्या, गुहा, विवरे, उष्ण झरे इ. निसर्गचमत्कार ही या राज्यातील सहलीची ठिकाणे होत.

राज्यातल्या १९ लहानमोठ्या शहरांपैकी राजधानीचे इंडियानापोलिस 'अमेरिकेचा चव्हाटा' (क्रॉसरोड्स) म्हणून विख्यात आहे. बंदर नसूनही व्यापार व कारखानदारीचे हे मोठे केंद्र आहे. इंडियानाच्या नागरिकांनी हूझिअर्स हे टोपणनाव आहे.

 

ओक, शा. नि.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 6/4/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate