অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

इनर मंगोलिया

इनर मंगोलिया

इनर मंगोलिया

चीनमधील एक स्वायत्त प्रांत. क्षेत्रफळ ११,७७,४९९ चौ. किमी.; लोकसंख्या सु. १.३ कोटी (१९६८). राजधानी हूहेहोट. ईशान्येकडे सायबीरियाच्या सरहद्दीपासून नैऋत्येकडे गोबीच्या वाळवंटापर्यंत इनर मंगोलिया पसरलेला असून याच्या पश्चिमेला औटर मंगोलिया, वायव्येला मांचुरिया व सोव्हिएट रशियाचा काही भाग, पूर्वेला खिंगन पर्वत व दक्षिणेस प्राचीन चीनची प्रसिद्ध भिंत आहे. याचा पूर्व भाग डोंगराळ असून त्यात इमारती लाकूड व अन्य वनसंपत्ती विपुल आहे. हा भाग इनर मंगोलियाच्या १२ % असून चीनच्या १७% जंगलभागाचे क्षेत्र या प्रांतात आहे.

हा पूर्वेकडून पश्चिमेकडे सरासरी ९७० मी. उंचीचा विस्तृत पठारी गवताळ प्रदेश असून तो पश्चिमेकडील गोबीच्या वाळवंटाच्या परिसरात खडकाळ, उजाड होत जातो. येथील हवामान खंडांतर्गत आहे. येथे पाऊस विशेष पडत नाही, पण नद्यांच्या पाटावर शेती चांगली होते. पीत नदीचा परिसर व राजधानीभोवतालच्या प्रदेशांत गहू, केओलियांग, बाजरी, मका, जवस, सोयाबीन व बीट ही पिके भरपूर येतात. पशुसंवर्धन हा येथील नागरिकांचा आणखी एक व्यवसाय असून मेंढी, बकरी, घोडा, गाय, उंट हे उपयुक्त प्राणी सर्वत्र आढळतात. साहजिकच लोकर व कातड्यांची निर्यात येथून बरीच होते. कोळसा, लिग्‍नाइट, लोखंड, शिसे, जस्त, सोने ही खनिजेही इनर मंगोलियात सापडतात व त्यामुळे या प्रांताच्या औद्योगिकीकरणास अलीकडे वेग आला आहे. यंत्रे, विजेची उपकरणे, अन्नप्रक्रिया, कापड, विद्युत्‌जनित्रे, पोलाद इत्यादींचे कारखाने बाओटो, हूहेहोट व हैलार येथे उभारले गेले आहेत. इनर मंगोलियातील बहुतेक वाहतूक लोहमार्गाने चालते. रशिया, मंगोलिया प्रजासत्ताक हे येथूनच लोहमार्गाने जोडले गेले आहेत. राजधानीच्या शहरी विद्यापीठ, शिक्षक प्रशिक्षण केंद्र व पशुसंवर्धन संस्था आहेत. प्रांतात सु. तेवीस टक्के मंगोल व बाकीचे चिनी लोक आहेत.

प्राचीन काळी या भागात हूण टोळ्यांची वसाहत होती. १५३० पासून १५८३ पर्यंत हा मुलूख तुमेट टोळीचा प्रमुख अल्तनखान याच्या ताब्यात होता. त्याने उत्तर चीनवर खाऱ्या करून पीकिंगपर्यंतचा मुलूख अनेकदा लुटला. अल्तनच्या निधनानंतर हा प्रांत चाहार टोळीच्या लिकडनखानाकडे गेला. परंतु १६३५ मध्ये लिकडनचा पराभव करून मांचू लोकांनी येथे आपला अंमल बसविला. तेव्हापासून मंगोलियाच्या दक्षिण भागाला इनर मंगोलिया नाव मिळाले. विसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत या प्रांतावर चीनचे नाममात्रच स्वामित्व असले, तरी दोनतीन शतकांत यात चिनी वसाहती वाढून मंगोल जमाती डोंगराळ, गवताळ भागात हाकलल्या गेल्या. १९११ मध्ये मांचू राजवट नष्ट झाल्यानंतर इनर मंगोलिया चिनी लोकसत्ताकाच्या प्रत्यक्ष अंमलाखाली येऊन प्रशासनाच्या सोयीसाठी त्याचे निंगशिआ, स्वेयुआन व चाहार हे जिल्हे पाडण्यात आले.

१९१७ च्या रशियातील क्रांतीनंतर औटर मंगोलियाचे स्वायत्त राज्य स्थापन झाले. त्याच्या प्रभावाने इनर मंगोलियातही चिनी अंमलाविरुद्ध बंडाळी झाली. परंतु ती मोडण्यात आली. १९३१ मध्ये जपानने मांचुरियावर स्वारी करून तेथे जपानी नियंत्रणाखाली मांचुकुओ राज्याची स्थापना केली व कालांतराने मांचुकुओच्या पश्चिम भागात मेंगकियांग ह्या मंगोल राज्याची स्थापना केली. तसेच १९४३ मध्ये मांचुकुओच्या ईशान्य भागात खिंगन स्वायत्त मंगोल विभागाची घोषणा केली. दुसऱ्या महायुद्धानंतर चिनी यादवी युद्धाचा फायदा घेऊन मंगोल लोकांनी स्वतंत्र स्वायत्त प्रांताची मागणी केली. परिणामतः १ मे १९४७ रोजी इनर मंगोलियाच्या स्वायत्त विभागाची घोषणा करण्यात येऊन उलानफूची राज्याच्या अध्यक्षपदी निवडणूक झाली. सुरुवातीला या राज्यात हेलुंगजिआंग, लिआउशी, जेहोल व चाहार हे जिल्हे होते. पुढे १९५४ मध्ये स्वेयुआन जिल्हा यात विलीन करण्यात आला. तसेच उलनहोट येथून हूहेहोटला राजधानीचे स्थलांतर करण्यात आले.


ओक, द. ह.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 8/22/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate