ब्रह्मदेशातील सर्वांत महत्वाची आणि आग्नेय आशियातील मोठ्या नद्यांपैकी एक. लांबी सु. २,००० किमी. ब्रह्मदेशाच्या उत्तर सीमेपासून दक्षिण सीमेपर्यंत ही वाहते. उत्तर सरहद्दीजवळ उगम पावलेल्या नमाई (सु. ५१० किमी.) आणि माली (सु. ३२० किमी.) यांच्या म्यिचीना शहराजवळील संगमानंतर तिला इरावती हे नाव मिळाले आहे. काचीन राज्यातील या दोन नद्यांनी व्यापलेला सु. ३०० किमी. रुंदीचा त्रिकोणाकृती, पहाडी व वनाच्छादीत प्रदेश असंख्य प्रवाहांचा व काही ठिकाणी खड्या उताराचा असल्यामुळे प्रवाह द्रुतगतीचे आहेत.
नमाई आणि माली यांच्या संगमाजवळ तिची रुंदी सु. १०० मी. भरते. भामो शहरापासून ही पश्चिमवाहिनी होते. येथपर्यंत ती एका अत्यंत अरुंद दरीतून जाते. मुखापासून भामोपर्यंत इरावती नौकासुलभ आहे. पश्चिमवाहिनी झाल्यावर पुन्हा दुसरी अरुंद दरी सुरू होते; तथापि या दरीतून जलवाहतूक चालते. मंडालेच्या २५० किमी. उत्तरेस कथ शहराजवळ इरावती दक्षिणवाहिनी होते. तिला मंडालेजवळ आणखी एका अरुंद दरीतून जावे लागते. पण तेथे नदीचे पात्र १०० मी. रुंदीचे असल्यामुळे पुरामध्येसुद्धा नौकानयन चालते. इरावतीच्या मध्य खोऱ्यात पेट्रोलियम सापडते. श्वेगूजवळ इरावती नदी पहाडी प्रदेश सोडून मैदानी प्रदेशातून वाहू लागते.
चिंदविन ही इरावती नदीची मुख्य उपनदी पकोक्कू शहराजवळ तिला मिळते आणि तिच्या सुपीक व विस्तीर्ण त्रिभुज प्रदेशाला सुरुवात होते. ती नऊ प्रमुख मुखांनी बंगालच्या उपसागरास मिळते. त्यांतील एका मुखावर रंगून हे ब्रह्मदेशाचे राजधानीचे शहर व मुख्य बंदर वसले आहे.
इरावतीचा त्रिभुजप्रदेश जगातील भात पिकविणाऱ्या देशांपैकी एक महत्वाचा प्रदेश गणला जातो. पोपा पर्वतातील ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे उत्तर इरावती नदीचा भूभाग हादरून सितांग नदी इरावती नदीपासून वेगळी झाली असावी. परंतु चिंदविन व इरावतीचे दक्षिणेकडील खोरे तसेच राहिले. या प्रदेशात नदीकिनार्याने टप्प्याटप्प्याची अनेक पठारे आढळतात. भामो, मंडाले, पकोक्कू , प्रोम, रंगून ही नदीकाठची प्रमुख बंदरे असून रंगून बंदरातून मुख्यत: तांदूळ, पेट्रोल व साग इ. जिन्नस निर्यात होतात.
यार्दी, ह. व्यं.
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 7/3/2020
चिंद्विन नदी : ब्रह्मदेशातील इरावती नदीची प्रमुख...
अक्याब : ब्रह्मदेशातील आराकान विभागाचे व अक्याब जि...
मंडाले : ब्रह्मदेशातील याच नावाच्या विभागाचे व जिल...