অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

इलिनॉय

इलिनॉय

अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांपैकी एक राज्य. क्षेत्रफळ १,१८,१४० चौ किमी.; लोकसंख्या १,११,१३,९७६ (१९७०). ३६५८' उ. ते ४२ ३०' उ. आणि ८७ ३५' प. ते ९१ ४०' प. इलियॉनच्या दक्षिणेस केंटकी व मिसुरी, पश्चिमेस मिसुरी व आयोवा, उत्तरेस विस्कॉन्सिन, पूर्वेस मिशिगन सरोवर आणि इंडियाना व केंटकी ही राज्ये आहेत. मिशिगन सरोवराचा ३,१९४ चौ. किमी. क्षेत्रफळाचा भाग या राज्यात मोडतो. राजधानी स्प्रिंगफील्ड येथे आहे.

भूवर्णन

राज्यप्रदेश अमेरिकेच्या महान मध्य मैदानाचा भाग असून ही सपाट, सुपीक भूमी अतिप्राचीन हिमनद्यांच्या हिमोढांनी विभागलेली आहे. ईशान्य कोपऱ्याच्या डोंगराळ भागात सर्वोच्च (३८५ मी.) ठिकाण चाल्‌र्झ मौंड असून, पश्चिमेस मध्यभागात फार थोडे उंच प्रदेश व दक्षिणेस ओझार्क पठारापैकी एक चिंचोळी पट्टी येते. राज्याची सरासरी उंची समुद्रसपाटीपासून १८६ मी. असून भूमीला उतार अगदी थोडा आहे.

राज्यात मुख्यत: मैदानी काळी माती आहे. दक्षिणेकडे काही ठिकाणी चुनखडीमिश्रित जमीन असून अगदी दक्षिणेत ओहायओ-मिसिसिपी संगमापाशी नदी गाळाने विशेष समृद्ध आहे. राज्याच्या ६६ टक्के भूपृष्ठाखाली बिट्यूमिनस कोळशाचे साठे आहेत. याशिवाय येथे पेट्रोलियम व नैसर्गिक ज्वलनवायू असून जगातील पहिल्या क्रमांकाचा फ्‍लुओरस्पार संचय या राज्यात आहे. दगड, रेती, चुना, पीट, गंधक, निकेल, चांदी, जस्त ही खनिजेही येथे अल्प प्रमाणात आढळतात.

इलिनॉय ही राज्याची मुख्य नदी असून तिला अनेक उपनद्या आहेत. ही मिसिसिपीला नैर्ऋ‌त्येस मिळते. मिसिसिपीने राज्याची संपूर्ण पश्चिम सरहद्द व्यापली असून आग्‍नेयीकडील सरहद्द वॉबॅश नदीने व्यापली आहे. या नद्यांच्या सु. ५० उपनद्यांनी राज्य सुपीक बनविले आहे. उत्तरेकडील मिसिसिपी-इलिनॉय कालव्याने मिसिसिपी मिशिगन सरोवराला जोडलेली आहे. राज्याच्या उत्तरेस काही नैसर्गिक सरोवरे असून बाकीचे जलाशय शहरांच्या गरजांसाठी ठिकठिकाणी नद्या अडवून केलेले आहेत.

बदलत्या व अनिश्चित हवामानाबद्दल राज्य प्रसिद्ध असून अत्युष्ण तपमानाचा कधीकधी अनुभव येतो. उत्तरेकडून येणारी थंड हवा व मिसिसिपी खोर्‍यात येणारे गरम वारे हवामानात एकाएकी बदल करतात. सामान्यत: उत्तरेकडे थंडी जास्त आणि दक्षिणेत उन्हाळा व पाऊस जास्त. राज्याच्या मध्यभागाचे तपमान किमान ०.४०० से. व कमाल २४.२० से. असून वार्षिक सरासरी पर्जन्य ८८ सेंमी. आहे. राज्यात सु. शंभर वृक्षप्रकार असून एल्म, ओक, अ‍ॅपलवुड, अ‍ॅश, अक्रोड हे त्यांतील महत्त्वाचे होत. यांशिवाय येथे लहान झुडपांचे अनेक प्रकार आहेत.

इतिहास व राज्यव्यवस्था

प्रागैतिहासिक आदिवासी या प्रदेशात होते. याचा पुरावा येथे सापडलेली दहा हजारांवर पुरातन टेकाडे देतात. कॅनडातून काही फ्रेंच इलिनॉय नदीमार्गे १६७३ मध्ये येथे आले होते. १६८० मध्ये ला साल याने सध्याच्या पिओरिआजवळ क्रेव्हेकूर व १६८३ मध्ये ‘स्टार्व्हड्‌रॉक’ टेकडीवर सेंट लूई हे किल्ले बांधले होते. जेझुइट पाद्रयांनी कॅहोकिआ येथे १६९९ व कॅस्कॅस्किया येथे १७०३ मध्ये धर्मप्रचारस्थाने उघडली. १७१७ पासून लुइझियाना या फ्रेंच प्रांताचा हा भाग बनला. १७३१ मध्ये तो वेगळा प्रांत झाला.

१७६५ मध्ये पॅरिसच्या तहान्वये मिसिसिपीच्या पूर्वेकडील सर्व फ्रेंच प्रदेश ब्रिटनकडे गेला. स्वातंत्र्ययुद्धात व्हर्जिनिया वसाहतीतील क्लार्क या साहसी देशभक्ताने अचानक छापा घालून १७७८ मध्ये कॅस्कॅस्किया व कॅहोकिआ ही ठिकाणे जिंकली. १७७९ मध्ये हा प्रदेश व्हर्जिनियाचा, १७८७ ते १८०० वायव्य प्रांताचा, मग नवीन आखलेल्या इंडियाना प्रदेशाचा भाग होऊन अखेर १८०९ मध्ये वेगळा प्रदेश झाला. त्यात विस्कॉन्सिनचाही अंतर्भाव होता व राजधानी कॅस्कॅस्किया होती.

१८१२ तील ब्रिटिशांबरोबरच्या युद्धात ब्रिटिश पक्षपाती इंडियनांनी डिअरबॉर्न येथील अमेरिकनांची कत्तल केली. त्या युद्धानंतर नवे वसाहतकरी या प्रदेशात मोठ्या संख्येने लोटू लागले आणि आधीच्या केसाळ चामड्यांच्या व्यापाराऐवजी कृषिउद्योगाला महत्त्व आले. १८१८ मध्ये विस्कॉन्सिन वगळून राहिलेल्या इलिनॉयला राज्य म्हणून संघराष्ट्रात प्रवेश मिळाला. १८२० साली राजधानी व्हँडेल्या येथे व १८३९ मध्ये स्प्रिंगफील्ड येथे नेण्यात आली.

१८३२ मध्ये वसाहतकर्‍यांना होणार्‍या इंडियनांच्या विरोधातून उद्‌भवलेल्या ‘ब्‍लॅक हॉक’ युद्धात इंडियनांचा पाडाव होऊन त्यांना मिसिसिपीच्या पश्चिमेस लोटण्यात आले.

१८३९ मध्ये मॉर्मन पंथीयांनी नॉव्हू येथे वसाहत केली. पण भडकलेल्या झुंडीने मॉर्मन पुढारी जोसेफ व हायरम या स्मिथबंधूंचे खून केले. तेव्हा १८४६ मध्ये मॉर्मनांनी उटा प्रदेशात स्थलांतर केले. राज्याच्या सुरुवातीच्या काळात झुंडशाहीचा धुडगूस मधूनमधून चाले. १८५८ मध्ये लिंकन व डग्‍लस यांच्यामधील गुलामगिरीवरील जाहीर वादविवादाने सार्‍या राष्ट्राचे लक्ष वेधून घेतले. राज्याच्या दक्षिण विभागातले लोक जरी गुलामी पद्धतीला अनुकूल होते, तरी यादवी युद्धात इलिनॉय उत्तरेच्या सरकारपक्षाची एकनिष्ठ राहिले व राज्यातून २,५९,०९२ स्वयंसेवक लढण्यास गेले. त्या युद्धाने कृषिउद्योगास व कारखानदारीस चांगलाच हात दिला.

१८७० पर्यंत शिकागो या नव्या शहराला महत्त्व आले. आर्थिक विकासाबरोबर आलेल्या विषमतेमुळे शेतकऱ्यांनी ‘ग्रेंज व कामगारांनी ‘नाइट्स ऑफ लेबर या चळवळी सुरू केल्या. १८८६ मधील ‘हे मार्केट दंगा व १८९४ मधला पुलमन संप या तत्कालीन अमेरिकेतील श्रमिक संबंधांत मोठ्याच हिंसक घटना होत्याविसाव्या शतकाच्या सुरुवातीस मजुरांवर होणार्‍या अन्यायांवर नियंत्रण करणारे कायदे अमलात आले.

१८९० ते १९१० या काळात राज्यात वाङ्‌मयीन जागृती होऊन काव्य, ललितलेखन व वृत्तपत्रव्यवसाय यांना बहर आला. पहिल्या महायुद्धानंतर संघटित गुन्हेगारीबद्दल शिकागो कुप्रसिद्ध झाले. दुसर्‍या महायुद्धात इलिनॉयने युद्धसाहित्याचा पुरवठा मोठ्या प्रमाणावर केला.

१९४२ साली शिकागो विद्यापीठात अणुकेंद्रीय शृंखलाप्रक्रियेचा पहिला यशस्वी प्रयोग झाल्यापासून अणुकेंद्रीय संशोधनात राज्य आघाडीवर आहे. देशातील सर्वांत मोठे आणवीय शक्तिउत्पादन केंद्र डेस्टेन पॉवरस्टेशन १९६० साली उघडण्यात आले. पोलाद, इलेक्ट्रॉनिक्स व विद्युतनिर्मिती या धंद्यांत राज्याची झपाट्याने प्रगती होत आहे.

राज्याचे संविधान १८७० मध्ये बनविण्यात आले. ५८ लोकांचे सीनेट व १७७ लोकांचे प्रतिनिधिगृह असून दर दोन वर्षांनी अधिवेशन भरते. गव्हर्नर, लेफ्टनंट गव्हर्नर व सचिव चार वर्षांकरिता २१ वर्षांवरील मतदारांकडून निवडले जातात. देशाच्या सीनेटवर राज्यातर्फे दोन व प्रतिनिधिगृहावर चोवीस सभासद निवडून जातात.

 

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/6/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate