অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

ईजिप्त

ईजिप्त

(मिस्‌र अधिकृत युनायटेड अरब रिपब्‍लिक). आफ्रिका खंडाच्या ईशान्येकडील राष्ट्र. याचा सिनाई द्वीपकल्पाचा भाग आशियामध्ये मोडतो. क्षेत्रफळ १०,०२,००० चौ. किमी. (पैकी ३.६% कायम वस्तीयोग्य) लोकसंख्या ३,३३,२९,००० (१९७१ अंदाज). नैर्ऋ‌त्य आशियाला लागून आणि सुएझ कालव्यामुळे यूरोप व अतिपूर्व यांच्या वाटेवर मोक्याच्या ठिकाणी असलेल्या या देशाच्या उत्तरेस भूमध्य समुद्र, ईशान्येस इझ्राएल, पूर्वेस तांबडा समुद्र व त्यापलीकडे अरबस्तान, दक्षिणेस सूदान व पश्चिमेस लिबिया आहे. जवळजवळ चौकोनी आकाराच्या या देशाचे पूर्व-पश्चिम अंतर १,२१६ किमी. व दक्षिणोत्तर अंतर १,०८० किमी. आहे. कैरो ही ईजिप्तची राजधानी आहे.

भूवर्णन

भौगोलिक दृष्ट्या ईजिप्तचे चार विभाग पडतात दक्षिणेकडील व पश्चिमेकडील वाळवंट, नाईलचे खोरे, पूर्वेकडील वाळवंट व सिनाई द्वीपकल्प.

पश्चिमेकडील वाळवंट अथवा लिबियन वाळवंट हा सहाराचा भाग आहे. नाईलच्या किनाऱ्यापासून उंची वाढत वाढत लिबियन सीमेजवळ ३०० मी. पर्यंत पोहोचते. याच्या दक्षिणभागात वस्ती अतिशय तुरळक आहे, परंतु उत्तरभागात मरूद्याने असल्याने लोकवस्ती बरी आहे. येथे स्फटिकमय खडकावर वाळूच्या खडकांचे आवरण असलेले आढळते. तसेच मरूद्यानांचा प्रदेश स्तरभंगाने दबला गेला आहे. वायव्येकडील उताराचा "कॉटरॉ डिप्रेशन" हा दलदलीचा प्रदेश समुद्रसपाटीपासून १३२ मी. खाली असून तो १८,००० चौ. किमी. विस्ताराचा आहे.

नाईलच्या आसपासचा प्रदेश सपाट असून, दक्षिणेकडील वरचा ईजिप्त व उत्तरेकडील खालचा ईजिप्त असे त्याचे दोन भाग पडतात. वरचा ईजिप्त अदिंदन ते कैरोपर्यंत पसरला असून, खोऱ्याच्या बाजूबाजूने तुटलेले कडे १६ ते २२ किमी. पर्यंत गेलेले आढळतात. याच भागात अत्यंत सुपीक प्रदेश व ऐतिहासिक अवशेष आहेत. खालचा ईजिप्त कैरो ते भूमध्य समुद्रापर्यंत पसरला असून, तेथे नाईलच्या सात फाट्यांमुळे समृद्ध त्रिभुजप्रदेश निर्माण झाला आहे. या भागात अनेक कालवे असून, त्यांचा उपयोग वाहतुकीसाठी व जलसिंचनासाठी केला जातो. देशाची दोन तृतीयांश लोकसंख्या याच भागात असून बहुतेक सर्व मोठी शहरे व उद्योगधंदे येथेच आहेत.

पूर्वेकडील वाळवंटाला अरेबियन वाळवंटही म्हणतात. हा प्रदेश नाईलपासून पूर्वेस पसरलेला असून, तांबड्या समुद्रकिनारपट्टीजवळ याचा काही प्रदेश २,१०० मी. पेक्षाही उंच आहे. प्रवाळ भिंतींना सबंध समुद्रकिनारपट्टी व्यापली असून येथे अनेक वाड्या निर्माण झाल्या आहेत. या वाड्यांतून पाणी मिळाल्याने बेदूईन टोळीवाल्यांची येथे वस्ती आहे. सुएझ कालव्याद्वारा तांबडा समुद्र व भूमध्य समुद्र जोडले गेले आहेत. या उंचवट्याची पूर्व बाजू म्हणजे पूर्व आफ्रिकेतून मृत समुद्राकडे गेलेल्या खचदरीचाच भाग होय. किनारपट्टीजवळ अनेक खनिजे सापडण्याचा संभव असून सध्या तेथून तेल व फॉस्फेट काढले जाते.

सिनाई द्वीकल्प ईशान्येला आहे. हा ईजिप्तमधील सर्वांत उंच प्रदेश आहे. येथील २,२८५ मी. उंचीच्या जेबेल मूसा पर्वतावर मोझेझला ईश्वराकडून दहा आज्ञा प्राप्त झाल्या असा अनेकांचा समज आहे. याच्या पूर्वेस अकाबाचे आखात आहे. हा प्रदेश निर्जन असला, तरी येथे खनिजसंपत्ती भरपूर आहे. सिनाईमध्ये अलीकडे तेलाच्या खाणी सापडल्या आहेत. तसेच सिनाईमधील उम्म बुग्मा येथे मँगॅनीजच्या खाणी व एल् तुर येथे फॉस्फेटच्या खाणी सापडल्या आहेत. जेबेल कॅथेरिना (२,६३७) हे येथील सर्वांत उंच शिखर आहे.

नाईल नदी ईजिप्तचे जीवन आहे; ही ईजिप्तमध्ये सु. १,५०० किमी. वाहते. नाईलला वर्षातून एकदाच पूर येतो. गाळ सगळीकडे पसरतो. इथिओपियातील सोबॅत नदी (नील नाईल) श्वेत नाईलला मॅलॅकॅल येथे मिळते व पावसाळ्यात नाईलला अर्ध्याअधिक पाण्याचा पुरवठा करते. इथिओपियातील बारो, आब्बाय व आतबारा नद्या, सूदानमधून ईजिप्तकडे जाणाऱ्या नाईलला ९०% पाणी पुरवतात. उन्हाळ्यात मात्र श्वेत नाईलचे व उपनद्यांचेच पाणी नाईलमध्ये जाते. अ‍ॅल्बर्टा सरोवरातून श्वेत नाईल निघून जूबावरून वाहत सूद च्या दलदली भागात शिरते. मॅलॅकॅलनंतर वाडी हॅल्फा व आस्वानच्या दरम्यान नाईलच्या ७% पाण्याची वाफ होते. नाईलवर अनेक पाटबंधारे बांधले गेले आहेत. या पाटबंधाऱ्यामुळे जलसिंचनाचे क्षेत्र वाढले असले, तरी नाईलचा गाळ पसरण्याचे क्षेत्र कमी झाले आहे.

भूमध्य सागराची ९६५ किमी. व तांबड्या समुद्राची १,९३० किमी. किनारपट्टी ईजिप्तला लाभली आहे. सर्वांत मोठे मरूद्यान एल् फायूम कैरोपासून ८० किमी. नैर्ऋ‌त्येस आहे. सीवा, बहारिया, दाखला व कार्गा यांसारखी मोठी मरूद्याने प्रसिद्ध आहेत.

जिप्त वाळवंटी हवामानाच्या (सहाराच्या) प्रदेशात मोडतो. उन्हाळ्यातील सरासरी तपमान २७ से. ते ३२ से. असते. हिवाळ्यातही उष्मा जाणवतो व सरासरी तपमान १२ से. ते २१ से. असते. वायव्येकडील वाऱ्यांमुळे मात्र किनारपट्टीजवळील तपमान थोडे सह्य होते. वसंत ऋतूत अथवा उन्हाळ्यात दक्षिणेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांस खमसिन म्हणतात; त्यांमुळे वाळवंटातील तपमान अनेकदा ४३ से. पर्यंतही चढते. ईजिप्तमध्ये पावसाळा नाहीच. भूमध्य सागरकिनारपट्टीत सरासरी २० सेंमी. पाऊस पडतो, दक्षिणेकडे सरासरी २.५ सेंमी, पाऊस पडतो, तर वाडी हॅल्फा येथे अजिबात पाऊस पडत नाही. अ‍ॅलेक्झांड्रिया येथे वर्षातून ४० दिवसांत १९ सेंमी., पोर्ट सैद येथे ८ सेंमी. व कैरो येथे २.३ सेंमी. पाऊस पडतो.

जिप्तमध्ये बहुतेक भाग वाळवंटी असल्याने तेथे मरुवनस्पती आढळतात; त्यांत लाजाळू, झाऊ व अनेक प्रकारची झुडपे व गवते आहेत. पूर्वेकडील व सिनाईमधील वाड्यांमध्ये भूमिगत पाण्याच्या आधाराने खजुराची झाडे होतात. नाईल खोऱ्यात काही जंगली वनस्पती आढळतात. ईजिप्तमध्ये अरण्ये नसली, तरी खजुराची व लिंबाच्या जातीच्या फळांची बने आढळतात. शेळ्या, मेंढ्या, गाढवे व उंट हे येथील प्रमुख प्राणी होत. हरणांच्या काही जाती, आयबेक्स, तरस, कोल्हा, खोकड हे प्राणी; तीनशेच्यावर पक्ष्यांच्या जाती, फुलपाखरे, पतंग, विंचू, साप, नाग इ. प्राणी ईजिप्तमध्ये आहेत. नाईलमध्ये विपुल मासे सापडतात हल्ली मगरी मात्र नष्ट झाल्या आहेत.


स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/18/2019



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate