অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

उत्तर आयर्लंड

उत्तर आयर्लंड

युनायटेड किंग्डम ऑफ ग्रेट ब्रिटन अँड नॉर्दर्न आयर्लंड या देशाचा एक घटक. जलविभाग सोडून क्षेत्रफळ १३,४८४ चौ.

किमी. लोकसंख्या १५,२५,१८७ (१९७१). आयर्लंड बेटाच्या ईशान्य भागातील अल्स्टर प्रांताच्या अँट्रिम, आर्मा, लंडनडेरी, डाऊन, फर्‌मॅना व टायरोन ह्या परगण्यांचा उ. आयर्लंडामध्ये समावेश होतो. याच्या उत्तरेस अटलांटिक महासागर, ईशान्येस नॉर्थ चॅनल, पूर्वेस आयरिश समुद्र, दक्षिणेस व पश्चिमेस आयरिश प्रजासत्ताक आहे.

भूवर्णन व इतिहास यांसाठी आयर्लंड ही नोंद पहावी.

राजकीय स्थिती

 

१९२० व १९२१ च्या आयर्लंडच्या प्रशासनविषयक कायद्यान्वये आयर्लंडचे विभाजन होऊन ब्रिटिश साम्राज्यांतर्गत उत्तर आयर्लंडचे राज्य अस्तित्वात आले व शेष आयर्लंडला ‘आयरिश फ्री स्टेट’  हे नाव मिळाले. १९२०- २१ साली झालेल्या आयर्लंडच्या विभाजनास आयरिश राष्ट्रवाद्यांची मान्यता मिळालेली नाही. उ. आयर्लंडातील प्रॉटेस्टंटांची ब्रिटिश साम्राज्यात रहाण्याची इच्छा व द. आयर्लंडातील जनतेचे व उत्तरेतील कॅथलिकांचे आयर्लंडचे एकीकरण घडवून आणण्याचे स्वप्न यांमुळे उत्तर आयर्लंडात अनेकदा दंगेधोपे व जाळपोळ झालेली आहे.

१९५६-५७ मध्ये प्रत्यक्ष लष्करी कारवाई करण्यात आली. गेल्या अर्धशतकातील अनेक दंगलीमुळे सरकारी मालमत्तेची अपरिमित हानी झालेली आहे. या दंगली अजूनही थांबलेल्या नाहीत. तसेच आयरिश राष्ट्रवाद्यांचे आयर्लंडच्या एकीकरणाचे प्रयत्‍नही पूर्णतः बंद झालेले नाहीत.

त्तर आयर्लंडच्या पार्लमेंटचे पहिले अधिवेशन जून १९२१ मध्ये भरले. सुरुवातीपासून १९६८ अखेरपर्यंत युनियनिस्ट पक्षाचेच पार्लमेंटात बहुमत असून सर जेम्स क्रेग, जे. एम्. अँड्रूज, सर बेसिल ब्रुक व टेरेन्स ओनील ह्या पक्षनेत्यांनी देशाचे महामंत्रिपद भूषविले आहे.

अलीकडे युनियनिस्ट पक्षाची किंचित पीछेहाट होऊन मजूर पक्षाचा प्रभाव वाढू लागला आहे. ब्रिटनच्या राजाने नियुक्त केलेला राज्यपाल उ. आयर्लंडचा वैधानिक राज्यप्रमुख असून प्रत्येक राज्यपालाचा कार्यकाल सहा वर्षांचा असतो. उ. आयर्लंडच्या पार्लमेंटने मान्य केलेल्या विधेयकांना मंजुरी देण्याचा वा प्रसंगी नामंजूर करण्याचा अधिकार राज्यपालाला असला, तरी संसदीय लोकशाहीच्या परंपरांनुसार खरी सत्ता महामंत्र्यांच्या हाती असते. संसदेतील बहुमतवाल्या पक्षाचा नेता देशाचा महामंत्री असतो व संसदेतील (सामान्यतः स्वपक्षीय) सभासदांच्या मंत्रिमंडळाच्या साहाय्याने तो देशाचे शासन चालवितो.

त्तर आयर्लंडचे विधिमंडळ व्दिसदनी असून कनिष्ठ सदनाला हाऊस ऑफ कॉमन्स (लोकसभा) व वरिष्ठ सदनाला सीनेट म्हणतात. लोकसभेत लोकनियुक्त ५२ व सीनेटमध्ये लोकसभासदस्यांनी निवडलेले २४ व अधिकारपरत्वे लंडनडेरी व बेलफास्टचे महापौर असे २६ सभासद असतात. लोकसभेची दर पाच वर्षांनी व सीनेटची आठ वर्षांनी निवडणूक होते. याशिवाय इंग्‍लंडच्या हाऊस ऑफ कॉमन्समध्ये उत्तर आयर्लंडचे १२ प्रतिनिधी असतात. उत्तर आयर्लंडचा समावेश युनायटेड किंग्डममध्ये होत असल्याने युद्ध पुकारणे, तह करणे वगैरे बाबींचे अधिकार कायद्याने ब्रिटिश संसदेने स्वतःकडे ठेवले आहेत. उत्तर आयर्लंडमधील कर व वसुली ही कामे इंग्‍लंडच्या करवसुलीयंत्रणेमार्फतच होतात. वसूल रकमेचा ठराविक हिस्सा राष्ट्रीय संरक्षणासाठी वळता करून बाकी रक्कम उत्तर आयर्लंडच्या शासनासाठी खर्च होते.

उत्तर आयर्लंडचे सहा परगणे, दोन मोठी शहरे, दहा अन्य शहरे, २४ जिल्हे व ३१ तालुके असून, प्रत्येकाचा कारभार लोकनियुक्त स्थानिक कौन्सिला मार्फत चालतो. उत्तर आयर्लंडची न्यायदानपद्धती इंग्‍लंडच्या न्यायदानव्यवस्थेनुरूप आहे.

आर्थिक स्थिती

उत्तर आयर्लंडमधील सु. ९०% जमीन शेतीला योग्य असून कृषी, पशुसंवर्धन व तज्जन्य दुग्धव्यवसायात सु. ११% नागरिक गुंतलेले आहेत. पाणथळ भागात गुराढोरांना पुष्ट करणारी विविध गवते होतात. अंबाडीचे पीक धनदायी असून त्यापासून उत्कृष्ट प्रकारचे लिनन कापड तयार होते. येथील शेतकरी बटाटे, सलगम, बीट, राय, ओट इ. पिके काढतात. मेंढ्या, बकरी, डुकरे इत्यादींचे मांस निर्यात करण्याचा व्यवसाय करणारे लोक पुष्कळ आहेत. देशाच्या दक्षिण भागात पेअर, प्लम, सफरचंद इत्यादींच्या बागा आहेत.

चुनखडी, ग्रॅनाइट, इमारती दगड, बॉक्साइट इ. खनिजे उ. आयर्लंडमध्ये सापडतात. देशात पीटचा सुकाळ असून त्याचा इंधनासाठी उपयोग होतो. किनारी मुलखात मच्छीमारी व्यवसाय चालतो.

उत्तर आयर्लंड मुख्यतः खेड्यांचा देश आहे.  बेलफास्ट सोडल्यास लाखाच्यावर वस्ती असलेले एकही शहर नाही. लंडनडेरी, न्यूटन, आर्मा, बँगोर, पोर्ट अ डाऊन, लर्गन, लिसबर्न, लार्न, बॅलिमीना इ. उत्तर आयर्लंडमधील प्रसिद्ध शहरे आहेत.

जगातील लिनन कापडाच्या उत्पादनापैकी एक तृतीयांश उ. आयर्लंडमध्ये होते. मुलायम पोत व शुभ्रपणासाठी ह्या लिननची जगात ख्याती आहे. सुतळी, ट्वाईन, सुती, लोकरी व रेयॉन कापडाचे उत्पादनही उत्तर आयर्लंडमध्ये विपुल होते.

बेलफास्ट येथे जहाजबांधणी व विमाने यांचे, तसेच लार्न येथे अ‍ॅल्युमिनियमचा कारखाना आहे. तंबाखूचे विविध पदार्थ, मद्ये, बीटची साखर, डबाबंद खाद्यपदार्थ यांचेही कारखाने उ. आयर्लंडमध्ये असून त्यांतून निघणारा माल दर्जेदार असतो. उ. आयर्लंडमध्ये औष्णिक वीज-उत्पादन सरकारी कारखान्यात होते. बॅलिलॅफर्ड, बेलफास्ट, लार्न, लंडनडेरी येथे औष्णिक वीजकेंद्रे आहेत.

कापडगिरणीयंत्रे, लिनन व रेयॉन कापड, गुरेढोरे, कोंबड्या, अंडी, डुकराचे मांस इत्यादींची निर्यात व विविध यंत्रसामग्री, कापूस, लोकर, रेयॉन, फ्लॅक्सचे सूत यांची आयात उत्तर आयर्लंड करतो. आयात जास्त व निर्यात कमी अशी परदेशी व्यापाराची स्थिती व्यवहारशेषाच्या दृष्टीने अर्थातच समाधानकारक नाही. उ. आयर्लंडचा आयात-निर्यात व्यापार मुख्यतः आयरिश प्रजासत्ताकाशी व ग्रेट ब्रिटनशी चालतो.

उत्तर आयर्लंडमध्ये १९७२ मध्ये २३,८७० किमी. लांबीचे रस्ते व ७२५ किमी. लोहमार्ग असून बेलफास्ट सारख्या बंदरातून देशोदेशींचा माल जात येत असतो. याशिवाय नद्या, कालवे इत्यादींतून पुष्कळ वाहतूक होते. डाक, तार, दूरध्वनियंत्रणा शासनाच्या ताब्यात असून बेलफास्टला देशाचे प्रमुख नभोवाणी व दूरचित्रवाणी केंद्र आहे. पाच दैनिकांच्या व कित्येक मासिकांच्या द्वारे विचारप्रसाराचे कार्य सतत चालू असते. देशात १९७० मध्ये ५५,८८७ बिनतारी परवाने, १,५२,१५० दूरध्वनी व १९७१ मध्ये ३,०२,७६४ दूरचित्रवाणी यंत्रे होती.

 

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate