অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

क्यूबा

क्यूबा

रिपब्‍लिका द कूबा. कॅरिबियन समुद्रातील ग्रेटर अँटिलीस किंवा वेस्ट इंडीज द्वीपसमूहापैकी सर्वांत मोठे बेट व साम्यवादी देश. शेजारच्या लहानमोठ्या बेटांसह क्षेत्रफळ १,१०,९२२ चौ. किमी.; लोकसंख्या ८५,२३,२९२ (१९७०). याची पूर्वपश्चिम लांबी सु. १,२०० किमी., दक्षिणोत्तर रुंदी ४० ते २९० किमी. व किनारा सु. ३,५०० किमी. आहे.

हे अमेरिकेच्या फ्लॉरिडा द्वीपकल्पाच्या दक्षिणेस सु. १५० किमी., मेक्सिकोच्या आखाताच्या तोंडाशी, १९° ४९´ उ. ते २३s° १५ उ. व ७४°´ प. ते ८४° ५७´ प. यांच्या दरम्यान असून, याच्या उत्तरेस अटलांटिक महासागर व त्यातील फ्लॉरिडाचे द्वीपकल्प आणि बहामा बेटे, पूर्वेस विंडवर्ड पॅसेज व त्यापलीकडे हैती, दक्षिणेस कॅरिबियिन समुद्र व त्यातील जमेका वगैरे बेटे आणि पश्चिमेस मेक्सिकोचे आखात व यूकातान खाडीपलीकडे मेक्सिकोचे यूकातान द्वीपकल्प आहे.

मेक्सिको आणि पनामा यांच्या मार्गावरील मोक्याच्या ठिकाणी असल्यामुळे क्यूबाचे भौगोलिक स्थान महत्त्वाचे आहे. याची राजधानी हाव्हॅना आहे.

भूवर्णन

क्यूबाचे मूळचे खडक शिस्ट, स्लेट, संगमरवर व ग्रॅनाइट इ. रूपांतरित व अग्निजन्य असून त्यांवर वलीकरण, विभंग, उत्थान, अधोगमन, क्षरण इ. क्रिया अनेक वेळा झालेल्या आहेत. काही ठिकाणी तीव्र वलीकरणामुळे जुने खडक वर व नवीन खडक खाली असेही झाले आहे. येथील भूमी अद्यापही काही अंशी अस्थिर असून मधूनमधून भूकंप होत असतात. निमज्जन वगैरेंमुळे किनाऱ्यावर गोमुखाच्या आकाराची अनेक उत्तम नैसर्गिक बंदरे तयार झालेली आहेत. येथील मृदा मुख्यतः चुनखडक व चिकणमाती यांची बनलेली असून येथील तांबूस रंगाची मॅटान्झास मृदा उसाच्या पिकाला फारच चांगली आहे. अरुंद नदीखोऱ्यांतील जलोढमृदा फार सुपीक आहे.

क्यूबाची सु. ४०% भूमी डोंगराळ असून ती तीन विभागांत केंद्रित झाली आहे. पूर्वेकडे ओरिएंटे व कामाग्वे प्रांतांत दक्षिण किनाऱ्यावर सिएरा माएस्ट्रा व त्याला समांतर पूर्वपश्चिम पर्वतराजी असून त्यात १,९७३ मी. उंचीचे क्यूबाचे सर्वांत उंच शिखर पीको तूर्किनो हे आहे. या भागात लोखंड, तांबे, निकेल, मँगॅनीज, क्रोमियम इत्यादींच्या खाणी आहेत. आग्नेयीकडील बराच प्रदेश ६०० मी. उंचीचा, तर कामाग्वे भाग ३०० मी. उंचीचा आहे. मध्य क्यूबाच्या दक्षिण लास व्हीयास भागातील त्रिनिदाद पर्वताची जास्तीत जास्त उंची १,१५८ मी. आहे.

उत्तर किनाऱ्याजवळील पिनार देल रीओची उंची ७२८ मी. आहे. क्यूबाची सरासरी उंची १०० मी. असून पश्चिमे कडील सिएरा दे लोस ऑर्गानोसची उंची ७६२ मी. पेक्षा जास्त नाही. पूर्व, पश्चिम व मध्य क्यूबातील या पर्वत केंद्रांदरम्यानची क्यूबाची ऊर्मिल भूमी सौम्य उताराची असून ती लागवडीच्या आणि दळणवळणाच्या दृष्टीने फार उपयोगी आहे. किनारा दलदलीचा आणि प्रवाळभित्तियुक्त असून त्याच्याजवळ अनेक द्वीपे व द्वीपसमूह आहेत. क्यूबात मोठ्या नद्या अथवा सरोवरे नाहीत. सु. दोनशे छोट्या नद्या दक्षिणेकडे व उत्तरेकडे मिळून वाहतात. त्यांच्या मुखाशी रुंद खाड्या असून त्यांतून अंतर्भागात अगदी थोडेच अंतर वाहतूक होऊ शकते. सर्वांत मोठी नदी कॉटो सु. २४९ किमी. लांब असून ती पश्चिम ओरिएंटे प्रांताच्या मैदानी प्रदेशातून वाहते.

क्यूबाचे हवामान उपोष्णकटिबंधीय आहे. समुद्र सान्निध्यामुळे आणि व्यापारी वाऱ्यांमुळे ते बरेच सौम्य झालेले आहे. जानेवारी -फेब्रुवारीचे सरासरी तापमान २१·१°से. तर जुलै-ऑगस्टचे २७·२<° से. असते ३२° से. पेक्षा जास्त १०° से. पेक्षा कमी तापमान सहसा आढळत नाही. उंच डोंगरावर मात्र पाणी गोठण्याइतके तपमान उतरू शकते.

वार्षिक सरासरी तपमानकक्षा लहान असल्यामुळे उन्हाळा व हिवाळा असे ऋतू विशेषसे जाणवत नाहीत. उंचीचा परिणाम मात्र तपमानावर झालेला दिसतो. सरासरी पर्जन्यमान १३७ सेंमी. आहे. पिनार देल रीओच्या डोंगराळ भागात ते १६५ सेंमी., तर ओरिएंटेच्या वातपराङ्‍मुख दक्षिण किनाऱ्यावर ७५ सेंमी. पर्यंत असते. क्वचित अवर्षणही येते. १९६७-६८ चे अवर्षण सु. दीड वर्ष टिकले होते. मेपासून ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते एप्रिल कोरडा ऋतू असतो. उष्णकटिबंधीय आवर्तांचा तडाखा मात्र क्यूबाला पुष्कळदा बसतो. त्यावेळी वेगवान वारे, मुसळधार पाऊस आणि मोठमोठ्या सागरी लाटा यांमुळे मालमत्तेची व क्वचित जीविताचीही बरीच नुकसानी होते.

ऊस, कॉफी, कोको व केळी यांच्या बागा होण्यापूर्वी क्यूबाचे मैदानी प्रदेशही अरण्यमय होते. आता फक्त पर्वतीय प्रदेशातच अरण्ये दिसतात. उष्ण कटिबंधीय वर्षावने थोडीच आहेत.

पावसाच्या बदलत्या प्रमाणानुसार पानझडी झाडे अनेक प्रकारची आहेत. पाइन, सीडार, ओक, मॉहॉगनी, एबनी, अकाना, साबिको इ. इमारती व लाकूडसामान उपयोगी वृक्ष आहेत. डिंक, राळ, औषधी, रांग इ. उपयोगाचे वृक्षही पुष्कळ आहेत. २५ मी. पर्यंत उंच वाढणारा रॉयल पाम हा राष्ट्रीय वृक्ष असून त्याचे सर्व भाग उपयोगी येतात. सीबा हा रेशमासारखा मऊ, शेवरीसारखा कापूस देणारा सुंदर वृक्षही ३० मी. पेक्षा उंच वाढतो. नारळ व इतर ३०४० प्रकारचे ताडजातीचे वृक्ष येथे पुष्कळ आहेत.

क्यूबाच्या सु. चौथ्या भागात प्रथम सॅव्हाना गवत होते. हल्ली कामाग्वे, पश्चिम लास व्हीयास व दक्षिण पिनार देल रीओ येथे निकृष्ट मृदेमुळे गवत, ताड व झुडपे आढळतात. किनारी भागात, विशेषतः दक्षिणेकडे, कच्छ वनश्री आढळते. सफरचंद, सीताफळ, अ‍ॅव्होकॅडो व पपई ही येथील प्रमुख फळे होत.

क्यूबात पृष्ठवंशी व मोठे प्राणी क्वचितच दिसतात, विविध प्रकारचे व छोटे प्राणी विपुल आहेत. वटवाघळे तसेच बिळवासी आणि कीटकभक्षी प्राण्यांच्या पुष्कळ जाती आहेत. वटवाघळांपासून ग्वानो हे खत मिळते. नदीमुखांजवळ मॅनेटी दिसतो. स्थलांतरी व मूळचे पक्षी विपुल आहेत. सरपटणारे व उभयचर प्राणी थोडेच आहेत. मगरी, इग्वानो, कासवे आहेत. विषारी सर्प नाहीत. गोगलगायी खूप आहेत. मत्स्यधन विपुल आहे. मृदुकाय प्राण्यांच्या व कीटकांच्या हजारो जाती येथे आढळतात. पीत ज्वरवाही डासांचे जवळजवळ निर्मूलन झाले आहे हे विशेष होय.

इतिहास

१४९२ मध्ये कोलंबसास क्यूबा सापडले व १५११ पर्यंत स्पॅनिशांनी त्यावर आपले पाय पक्के करून त्यास अमेरिकेवरील आक्रमणाचे मुख्य ठाणे केले. त्यानंतर उत्तम बंदरामुळे त्या खंडातील लूट घेऊन येणाऱ्या स्पॅनिश जहाजांचे संकलनकेंद्रही क्यूबाच झाले. त्याचमुळे फ्रेंच व इंग्रज चाच्यांच्या छापामारीचे ते वारंवार भक्ष्य झाले. समृद्ध व मोक्यावर असलेल्या या बेटाचे यूरोपीय राज्यकर्त्यांना नेहमीच विलोभन असे. सतराव्या शतकातील क्यूबाचा इतिहास त्यांच्या आणि फ्रेंच व इंग्रज चाच्यांच्या विध्वंसक हत्यांनी भरलेला आहे.

एकोणिसाव्या शतकाच्या आरंभी स्पेनचे साम्राज्य कोसळून लॅटिन अमेरिकेत अनेक गणराज्ये स्थापन झाली पण क्यूबामध्ये स्वातंत्र्याचे वारे पोहोचले नाही १८१० १८५१ दरम्यान मिळमिळीत उठाव झाले, ते दाबण्यात आले. क्यूबाचे प्रतिनिधी स्पेनच्या सल्लागार मंडळात घेत असत.

ही सवलतही १८१० मध्ये रद्द झाली आणि त्यामुळे अशा उठावांना विशेष कारण सापडले. याच सुमारास अमेरिकेच्या दक्षिण संस्थानांनी गुलामांची सोयीस्कर बाजारपेठ म्हणून क्यूबा घेण्याचा असफल प्रयत्न केला. या प्रकारांनी अस्वस्थ होऊन स्पॅनिश राज्यकर्त्यांनी क्यूबास अधून मधून सुधारणा करण्याची अभिवचने दिली व मोडली. याचा परिणाम म्हणून अखेर क्यूबात मोठा उठाव झाला, पण तो फसला. हा उठाव ‘दशवार्षिक युद्ध (१८६८– ७८) म्हणून प्रसिद्ध आहे.

 

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 5/11/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate