অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

ग्रेनेडा

ग्रेनेडा

वेस्ट इंडिजच्या विंडवर्ड द्वीपसमूहापैकी ब्रिटिश राष्ट्रकुलांतर्गत स्वतंत्र द्वीपराज्य. क्षेत्रफळ ३४४ चौ. किमी. लोकसंख्या १,०७,००० ( १९७२ ). ११ ५९' उ. ते १२ १५' उ. आणि ६१ ३५' प. ते ६१ ४८' प. यांमध्ये पसरलेली ही बेटे त्रिनिदादच्या १४४ किमी. वायव्येस आणि बार्बेडोसच्या १६० किमी.

नैर्ऋत्येस आहेत. डोमिनिका, सेंट व्हिन्सेंट, सेंट लुसीया, ग्रेनेडा या बेटांपैकी हे सर्वात दक्षिणेकडील आहे. ग्रेनेडा, त्याच्या ३२ किमी. उत्तरेकडील कॅरीआकू (३३.७ चौ. किमी. ) व या दोहोंमधील ग्रेनेडीन्झ नावाने ओळखली जाणारी सु. ६०० छोटी छोटी बेटे यांचा समावेश ग्रेनेडामध्ये होतो. राजधानी सेंट जॉर्जेस-लोकसंख्या २२,८९३ ( १९७० ).

भूवर्णन

ज्वालामुखीनिर्मित, डोंगराळ, तीव्र कड्याकपारी व दऱ्या यांनी युक्त अशी ही बेटे आहेत. नैर्ऋत्य-ईशान्य पर्वतराजी असलेल्या ग्रेनेडावरील सेंट कॅथरिन (८३८ मी.). फेदॉन्झ (७६२ मी.) ही सर्वोच्च शिखरे होत. या बेटाचा दक्षिण किनारा अतिशय दंतुर असून त्यावर अनेक बंदरे आहेत.

सेंट जॉर्जेस हे नैर्ऋत्येकडील सुरक्षित उपसागरावर वसले आहे. डोंगरावरून अनेक छोट्या छोट्या नद्या वाहतात. परंतु त्यांचा उपयोग वीजनिर्मितीसाठी होऊ शकत नाही. येथे खनिज पाण्याचे झरे व ज्वालामुखी काहिलीत निर्माण झालेली अनेक सुंदर सरोवरे असून सेंट जॉर्जेसच्या ११ किमी. पूर्वेस ४२५ मी. उंचीवर ग्रँड एटांग हे निसर्गसुंदर सरोवरे आहे. अँट्‌वान सरोवर ईशान्येच्या मैदानी भागात आहे.

ही बेटे उष्णकटिबंधात मोडतात. डिसेंबर ते एप्रिल या महिन्यांत तपमान ३५ से. असले, तरी व्यापारी वाऱ्यांमुळे तेथील हवामान उत्तम असते. जुलै ते ऑक्टोबर या महिन्यांत हवा उष्ण (५० से.)व दमट असते. तथापि वर्षभर हवा निरोगी असते. जानेवारी ते मे हे महिने कोरडे व बाकीचे पावसाचे असतात.

सरासरी पर्जन्यमान १८८ सेंमी. असते. ग्रँड एटांग येथे ते ४१० सेंमी. पर्यत जाते. दक्षिण किनाऱ्यावर १०० सेंमी. असते. कॅरीआकू बेटावर सरासरी २० सेंमी. तर इतरत्र १२ सेंमी. पाऊस पडतो.

या बेटावर क्वचित वादळाचा तडाखा बसतो. तथापि १९५५ मध्ये झालेल्या वादळाने येथे खूपच नुकसानी झाली होती. उष्ण कटिबंधीय फळझाडे आणि फुलझाडे येथे विपुल असून डोंगरमाथे वनाच्छादित असतात. वन्य पशू येथे नाहीत.

इतिहास, अर्थव्यवस्था इत्यादी

१५ ऑगस्ट १४९८ रोजी कोलंबसने या बेटांचा शोध लावला. त्याने बेटांना कन्सेप्शन हे नाव दिले. कॅरिब जातीचे लोक त्या वेळेस तेथे राहत होते. सतराव्या शतकाच्या सुरूवातीस फ्रेंचांचे व इंग्रजांचे लक्ष या बेटांकडे वळले. निरनिराळ्या फ्रेंच मालकांकडून शेवटी १६७४ मध्ये ग्रेनेडा फ्रेंच शासनाकडे आले.

१७६२ मध्ये ही बेटे इंग्रजांनी जिंकली, १७७९-८४ मध्ये ती फ्रेंचांकडे होती व नंतर पुन्हा इंग्रजांकडे आली.

स्थानिक लोकांचा १७९५ मधील फ्रेंचांच्या मदतीने झालेला उठाव मोडून काढण्यात आला. १८८५ - १९५८ पर्यत ही बेटे ब्रिटिश विंडवर्ड बेटे म्हणून ओळखली जात. त्यांचे प्रशासकीय कार्यालय ग्रेनेडावर होते. १९५८ मध्ये ही बेटे वेस्टइंडीज संघराज्यात विलीन झाली; पण १९६२ मध्ये ती पुन्हा फुटून निघाली. पहिले पंतप्रधान एरिक गेअरी यांच्या प्रयत्नांनी ७ फेब्रुवारी १८७४ रोजी बेटे ब्रिटिश राष्ट्रकुलांतर्गत स्वतंत्र राष्ट्र झाली. गव्हर्नर जनरल, सिनेट, हाउस ऑफ असेंब्ली व मंत्रिमंडळ हे राज्य कारभार पाहतात.

कॅरिब लोक नष्टप्राय झाले, तरी या बेटांवरील बहुसंख्य लोक मिश्रवंशीय आहेत. थोडेसे गोरे लोक आहेत. तेथे इंग्रजी व फ्रेंच भाषा बोलतात. लोक धर्माने कॅथलिक व काही अँग्लिकन आहेत.

शेती हा या बेटांवरील मुख्य व्यवसाय. कोको, जायफळ, जायपत्री, केळी, नारळ, लिंबू, ऊस ही येथील महत्त्वाची पिके असून कापूस, लवंगा, दालचिनी, कॉफी इत्यादींचेही उत्पन्न काढतात. शेतीखालोखाल मच्छीमारी व पर्यटन हे येथील महत्त्वाचे उद्योग होत. साखर, रम, लिंबाचे तेल व रस, कापूस पिंजणे इ. कारखाने आहेत. बेटांवर एकूण ९२० किमी. चे रस्ते असून उत्तम जहाजवाहतूक व्यवस्था आहे.

१९७३ मध्ये ४,१४६ दूरध्वनीयंत्रे होती. राज्यात तीन वृत्तपत्रे आणि राजधानीत रेडिओ प्रक्षेपण केंद्र आहे. ३ स्थानिक व ५ बाहेरच्या बँका आहेत. १९६९ साली ५७ प्राथमिक शाळांमधून २९,८८३ विद्यार्थी व ११ माध्यमिक शाळांतून २,९१२ विद्यार्थी शिकत होते. यांशिवाय येथे २६ हुन्नर कामाची केंद्रे होती.

ईस्ट कॅरिबियन डॉलर हे चलन असून एप्रिल १९७४ मध्ये ते १०० डॉ. = २०.८३ पौंड = ४९.१९ अमेरिकन डॉ. होते.

निसर्गसुंदर सरोवरे व वनश्री, निरोगी हवामान, मसाल्याची उत्पन्ने यांमुळे या बेटांवर प्रवाशांची नेहमीच गर्दी असते.

 

शाह, र. रू.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 5/23/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate