অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

झँबिया

झँबिया

दक्षिण-मध्य आफ्रिकेतील एक स्वतंत्र प्रजासत्ताक. क्षेत्रफळ ७,५२,६१४ चौ. किमी., लोकसंख्या ४५,१५,००० (१९७१). विस्तार ८° १५’ द. ते १८° ७’ द. आणि २२° पू. ते ३३° ४३’ पू. यांदरम्यान आहे. याच्या पूर्वेला मालावी, आग्नेयीस मोझँबीक, दक्षिणेला ऱ्होडेशिया, बोट्स्वाना व नामिबिया (नैर्ऋत्य आफ्रिका), पश्चिमेला अंगोला व उत्तरेला झाईरे हे देश आहेत.

झाईरेची पेडिकल ही पट्टी मध्येच घुसल्यामुळे झँबियाच्या नैर्ऋत्य व ईशान्य भूभागांदरम्यान अवघ्या १८० किमी. रुंदीचा प्रदेश आहे. लूसाका (लोकसंख्या ३,८१,०००) ही राजधानी आहे. झँबिया हे एक भूवेष्टित राष्ट्र असल्यामुळे संपन्न असूनही त्याला बाह्य जगाशी संबंध ठेवण्यासाठी शेजारील राष्ट्रांवर सर्वस्वी अवलंबून रहावे लागते.

गोऱ्या लोकांच्या अधिपत्याखाली ऱ्होडेशियातून आतापर्यंतचा जवळचा मार्ग असला, तरी झँबियाचे ऱ्होडेशियाशी संबंध दुरावल्यामुळे पर्यायी वाहतूक मार्ग निर्माण करण्याचे प्रयत्न चालू आहेत. याचसाठी टांझानियातील दारेसलाम या बंदराला जोडणाऱ्या ‘टॅन-झॅम’ रेल्वेचा प्रकल्प दोन्ही देशांनी १९७० मध्ये हाती घेऊन पूर्ण करीत आणला आहे. अंगोलातून जाणाऱ्या मार्गावर तेथील अलीकडील घटनांचा परिणाम झाला आहे.

भूवर्णन

झँबिया हा स्थिर आफ्रिकन पठाराचा भाग असल्यामुळे त्याचे तळखडक अतिशय जुने असून ते स्फटिकयुक्त ग्रॅनाइट, नीस, शिस्ट इ. अग्निजन्य व रूपांतरित प्रकारचे आहेत. या तळखडकांवर काही ठिकाणी विशेषतः उत्तर सीमेवर पिंडाश्म, वालुकाश्म इत्यादींचे थर आहेत. काफूए नदी खोऱ्यात २६० कोटी वर्षांपूर्वीचे खडक सापडतात.

५५ ते ६२ कोटी वर्षांपूर्वीच्या कटांगा गाळथरात आजपर्यंतची महत्त्वाची खनिजे मिळालेली आहेत. पश्चिमेकडील कालाहारीच्या वाळूखाली आणि ल्वांग्वा व झँबीझी खोऱ्यात २० ते ३० कोटी वर्षांपूर्वीचे ‘कास’ खडक आहेत.

झँबियाचा बहुतेक प्रदेश ९०० ते १,५०० मी. उंचीचे पठार आहे. ईशान्य भागातील मूचिंगा पर्वतराजी २,१००मी. उंच आहे. राष्ट्राचा बराचसा भाग झँबीझीच्या खोऱ्यात असून उत्तरेकडील भाग काँगोच्या पाणलोट क्षेत्रात येतो. हा उत्तर भाग खोलगट असून त्यात बेंग्वेलू सरोवर आहे. त्याला चांबेशी नदी मिळते. सरोवराच्या दक्षिणेकडील व आग्नेयीकडील भाग जगातील एका मोठ्या (१०,३६० चौ. किमी.) दलदलीचा असून येथील पाणी लूआपूला नदीने झँबिया-झाईरे सीमेवरील ग्वेरू सरोवरात जाते व त्यातून काँगोचा लुबुआ हा शीर्षप्रवाह निघतो.

म्वेरूप्रमाणे टांगानिका सरोवरही खचदरीत साठलेले असून त्याचे दक्षिण टोक झँबिया-टांझानिया सीमेवर आहे. त्याला मिळणाऱ्या कालांबो नदीचा २२१ मी. उंचीचा धबधबा झँबियात सर्वांत उंच आहे. झँबीझी नदी झँबिया व ऱ्होडेशिया यांच्या सीमेवरून जाते. पठाराचा भाग सलग नसून त्यात झँबीझी, काफूए व ल्वांग्वा व त्यांच्या उपनद्या यांनी दऱ्या कोरून काढल्या आहेत. ल्वांग्वाचे खोरे ही ५६० किमी.ची एक मोठी खचदरीच आहे. ती झँबीझीला मिळते, तेथे देशातील सर्वांत कमी ३६० मी. उंचीचा प्रदेश आहे.

म्वेरू सरोवराच्या पूर्वेची म्वेरू दलदल, बेंग्वेलू सरोवराभोवतीचा प्रदेश आणि चांबेशी व काफूए नद्यांची पूरमैदाने तसेच बरॉत्स मैदान हे विस्तृत सपाट प्रदेश आहेत. झँबीझी नदीवरच जगप्रसिद्ध व्हिक्टोरिया धबधबा आणि करिबा हे आफ्रिकेतील सर्वांत मोठे मनुष्यनिर्मित सरोवर आहे. तेथील वीजउत्पादन व मासेमारी महत्त्वाची आहे. मोठ्या नद्यांना वर्षभर पाणी असते, तर लहान नद्या पावसाळ्यानंतर काही दिवसांनी कोरड्या पडतात.

मृदा

पठारावर वाळूमिश्रित मृदा आहेत; त्या अम्लधर्मी, अल्पखतमातीच्या व खाली लाल, लोहयुक्त व अपक्षालिन लॅटेराइटचे थर असलेल्या, म्हणून शेतीस फारशा उपयुक्त नाहीत. सरोवरप्रदेशातील व नदीखोऱ्याच्या तळभागातील गाळथरांच्या मृदा सुपीक आहेत.

हवामान

झँबियाचे हवामान उंचीमुळे सौम्य झाले आहे. मात्र सागरदूरत्वामुळे ते विषमही आहे. मे ते ऑगस्ट हिवाळा असतो. दक्षिणेकडून व आग्नेयीकडून थंड वारे येतात.

क्वचित पावसाची हलकी सर येते. मध्य ऑगस्ट ते ऑक्टोबरअखेर उन्हाळा असतो. हिवाळा कोरडा असून या काळात दिवसाचे तपमान ३१° से. पर्यंत चढते, तर ते रात्री २१° से. इतके खाली उतरते. उन्हाळ्याच्या आरंभीचा भाग कोरडा असल्यामुळे दिवसाचे तपमान ३६° से. पर्यंत चढते. ऑक्टोबरच्या उत्तरार्धात समुद्रावरील गार वारे येऊ लागतात. नोव्हेंबरच्या सुरुवातीस पुष्कळदा वादळे होतात.

वायव्येकडे गडगडाटी वादळेही होतात. नोव्हेंबर ते एप्रिल पावसाळा असतो. त्या वेळी तपमान उतरते. पावसाचे प्रमाण दक्षिण भागात ७१ सेंमी. असून उत्तर भागात ते १४७ सेंमी. च्यावर जाते. एप्रिल व मेमध्ये हवा बदलते.

एप्रिलमध्ये दिवसा तपमान चढते आणि रात्री उतरते; परंतु मेमध्ये दिवसा व रात्रीही ते उतरते. जास्तीत जास्त तपमान ल्वांग्वा खोऱ्यात ३७५ मी. उंचीवर ४४° से. व कमीत कमी नैर्ऋत्येस सेशेके येथे ९५१ मी. उंचीवर –७° से. इतके आढळले आहे. एकंदरीत हवामान सूदानीसॅव्हाना प्रकारचे आहे.

वनस्पती व प्राणी

देशातील बहुतेक भाग गवताळ असून त्यात लहानलहान झाडे व झुडपे विखुरलेली आढळतात. गवत बारमाही सु. १·५ ते २ मी. उंच असते. बाभळीच्या जातीची, काटेरी आणि गोरखचिंचेची जाड, पाणी साठवणाऱ्या खोडांची झाडे आढळतात. टांगानिका सरोवराजवळच्या भागात विरळ अरण्ये आहेत.

नैर्ऋत्येच्या बरॉत्स भागात ऱ्होडेशियन सागाची अरण्ये आढळतात. जंगलापासून इमारती लाकूड, खाणींसाठी लागणारे लाकूड, कोळसा, चारा, पूरक अन्न व इतर उपयोगी पदार्थ मिळतात. दक्षिण भागात लिव्हिंग्स्टनच्या पश्चिमेकडील प्रदेशात साग व मॉहॉगनी यांसारख्या झाडांपासून टणक इमारती लाकूड मिळते. झँबीझी व ल्वांग्वा यांच्या खोऱ्यात सखल भागात मोपेनची झाडे व वर्षायू गवत आढळते. बेंग्वेलू भागात मिळणाऱ्या मुक्का झाडाचे लाकूड फर्निचरला उपयुक्त असते.

झँबियाच्या गवताळ व जंगलभागात नानविध प्राणी आहेत. सर्व साधारणपणे हत्ती हा सार्वत्रिक आढळणारा प्राणी आहे. नद्यांमध्ये धिप्पाड हिप्पो आढळतात. गेंडा, झेब्रा, जिराफ, रेडा, हरिण, बॅबून, माकडे, बुशबेबी यांसारखे तृणभक्षक प्राणी व सिंह, चित्ता, बिबळ्या, तरस, रानटी कुत्रा, गेनेट, रॅटेल, कोल्हा यांसारखे मांसभक्षक प्राणी आढळतात. सु. ७०० जातींचे पक्षी, नद्यासरोवरांतून अनेक प्रकारचे मासे, सुसरी, कासवे, साप, सरडे, विषारी, बिनविषारी साप आणि शेकडो प्रकारचे कीटक आहेत. त्से त्से माशी प्राण्यांना व माणसांना त्रासदायक आहे.

फिश ईगल हा झँबियाच्या राष्ट्रचिन्हावरील पक्षी मोठ्या जलाशयांजवळ सर्वत्र आढळतो. एके काळी नानाविध जंगली प्राण्यांनी गजबजलेल्या भागातील प्राणिजीवन निष्काळजीपणे व अविरत केलेल्या शिकारीमुळे फारच कमी झाले; म्हणून अभयारण्ये निर्माण करावी लागली आहेत.

काही दुर्मिळ प्राणी काफूएसारख्या अभयारण्यात आणि राष्ट्रीय उद्यानातच सापडतात. शिकारीवरील बंधने कडक होत आहेत. नानाविध प्राण्यांनी संपन्न जंगले पर्यटन उद्योगाच्या दृष्टीने महत्त्वाची असून त्यापासून चांगले उत्पन्न मिळू शकेल, हे लक्षात घेतले जात आहे.

 

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/30/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate