অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

ड्युइसबुर्क

ड्युइसबुर्क

ड्युइसबुर्क

पश्चिम जर्मनीच्या नॉर्थ ऱ्हाईन–वेस्टफेलिया प्रांतातील औद्योगिक शहर. हे ड्युसेलडॉर्फच्या उत्तरेस २४ किमी.वर ऱ्हाईन आणि रुर यांच्या संगमावर वसले आहे. लोकसंख्या सु. ४,५७,९०० (१९७०). मूळ शहर रुरच्या दक्षिणेस होते व रोमन काळापासून ते व्यापारी केंद्र होते. सध्याचे शहर ऱ्हाईनपर्यंत कालव्याने जोडले असून शहरापर्यंत जहाजांची ये–जा होते. नदीकाठावरील या बंदराने ६३२ हे. क्षेत्र व्यापले असून कालव्यांच्या व वाहतुकीच्या सोयींमुळे हे व्यापार उद्योगांचे मोठे केंद्र बनले आहे. येथे तेलशुद्धीकरण, पोलादी –लोखंडी वस्तू, अवजड यंत्रे, रासायनिक द्रव्ये, सुती व लोकरीचे कापड, तंबाखू, साबण इ. उत्पादनांचे कारखाने आहेत. नेदर्लंड्समधील ॲम्स्टरडॅम व रॉटरडॅम ही औद्योगिक शहरे जलमार्गाने ड्युईसबुर्कशी जोडलेली आहेत. जगातील मोठ्या भू–अंतर्गत बंदरापैकी हे एक बंदर आहे. येथील गोद्यांची एकूण लांबी सु. ४२ किमी. आहे. जलमार्गाने व लोहमार्गाने येथे मोठा व्यापार चालतो. येथे स्थानिक कला–इतिहासाची संग्रहालये, प्राणिसंग्रहालय तसेच प. जर्मनीतील सर्वांत मोठे जलजीवालय आहे.

 

सावंत, प्र. रा.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 5/19/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate