অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

ताक्लामाकान

ताक्लामाकान

ताक्लामाकान

चिनी–ताकोलामाकान शान्मो. चीनच्या सिंक्यांग प्रांतातील विस्तीर्ण मरुप्रदेश. आशियातील व जगातील या अतिमोठ्या मरुप्रदेशाचे क्षेत्रफळ २,७०,००० चौ.किमी. आहे. तिएनशान व कुनलुन पर्वतराजींदरम्यानचा तारीम खोऱ्याचा हा मध्य व पूर्व भाग ३७° ३′ उ. ते ४२° उ.व ८०° पू. ते ९०° पू. यांमध्ये असून त्याचा पूर्व–पश्चिम विस्तार सु. ९६० किमी. व उत्तर–दक्षिण कमाल रुंदी सु. ४१६ किमी. आहे.

उंची पश्चिम भागात सु. १,१९० मी. ते १,४९५ मी. आणि पूर्व भागात सु. ७९० ते १,००५ मी. आहे. याच्या पूर्वेस लॉपनॉर सरोवर, उत्तरेस तारीम नदी, पश्चिमेस तारीमची उपनदी खोतान व तिच्या पलीकडे मझरताघ, रासताघ इ. पर्वत असून दक्षिणेस कुनलुन पर्वत आहे.

हा भाग म्हणजे अंतर्गत जलवाहनाचे उत्तम उदाहरण आहे. आजूबाजूच्या पर्वतीय भागांत उगम पावलेल्या नद्या बाहेर जाऊ शकत नाहीत. चेरचेन, केरीया, खोतान या येथील मुख्य नद्या होत. अशा पर्वतवेष्टित भागात पाऊस कमी पडत असल्याने हा प्रदेश वाळवंटी बनला आहे.

शेकडो मीटर जाडीच्या जलोढ थरांवर ३०० मी. जाडीचा वाळूचा थर आहे. जिकडे–तिकडे लहानमोठे वालुकागिरी आढळतात. वाळूच्या टेकड्यांची जागादेखील सतत बदलत असते. अशा वालुकामय भागात नद्यांचे पाणी वाळूत झिरपून त्या लुप्त होतात. यार्कंद व खोतान ही येथील प्रमुख मरूद्याने होत. चेरचेन खोऱ्यात वालुकागिरींच्या दरम्यान मधूनमधून सपाट प्रदेश, जुने प्रवाहमार्ग, उघडेबोडके उंचवटे व क्षरणावशेष आढळतात.

हवामान अर्थांतच विषम आहे. हिवाळ्यात तपमान सु. –२३° से. असते कधीकधी ते –३०° से.पर्यंत खाली येते, तर उन्हाळ्यात ते ३८°से. पर्यंतही चढते. पाऊस पश्चिमेस ३·८ सेंमी. पासून पूर्वेस १ सेंमी. पर्यंत पडतो. हिवाळ्यात कधीकधी हिमवर्षावही होतो. पुष्कळदा वाळूची वादळे होऊन धुळीच्या लोटांनी आकाश भरून जाते

प्राणी व वनस्पतीजीवन बेताचेच आहे. नद्या–सरोवरांजवळ वनस्पती मुख्यतः लव्हाळे व क्वचित विरळ स्टेप, टॅमॅरिस्क आणि पॉप्लर यांच्या स्वरूपात असतात. उंदीर, जर्बोआ, ससे, खोकड, कोल्हे, लांडगे, गॅझेल, हरिण, रानटी उंट हे येथील महत्त्वाचे प्राणी होत. हे प्राणी पाणी व वनस्पती यांच्या आसपास असतात.

मानवी जीवनाच्या दृष्टीने कोणत्याही प्रकारचे आकर्षण या भागात नाही. उलट पाण्याच्या कमतरतेमुळे अडचणी फार आहेत. स्थानिक लोक नद्यांजवळ आणि मरूद्यानांत निर्वाहशेती करून राहतात. मात्र १९४९ पासून चीन सरकार या भागाकडे अधिकाअधिक लक्ष पुरवीत असून जलसिंचनाच्या नवीन सोयी उपलब्ध झाल्यामुळे शेतीखालील क्षेत्र वाढत आहे.

 

फडके, वि. शं.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 8/8/2019



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate