অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पॅराग्वाय

पॅराग्वाय

(रिपब्लिका दे पॅराग्वाय). दक्षिण अमेरिकेतील एक भूवेष्टित सार्वभौम प्रजासत्ताक राष्ट्र. अक्षवृत्तीय विस्तार १९० १७’ द. ते २७० ३०’ द. व रेखावृत्तीय विस्तार ५४० ३०’प. ते ६२० ३०’ प. असून क्षेत्रफळ ४,०६,७५२ चौ. किमी. व लोकसंख्या २८,०५,००० (१९७७ संयुक्त राष्ट्रांचा अंदाज) आहे. देशातून वाहणाऱ्या पॅराग्वाय या मोठ्या नदीवरून देशास हे नाव मिळाले आहे. आसूनस्यॉन (लोकसंख्या ४.३४९ लक्ष-१९७५ अंदाज) हे राजधानीचे व देशातील सर्वांत मोठे शहर आहे. पॅराग्वायच्या पश्चिमेस अर्जेंटिना व बोलिव्हिया, उत्तरेस ब्राझील व बोलिव्हिया, पूर्वेस ब्राझील व अर्जेंटिना आणि दक्षिणेस अर्जेंटिना हे देश आहेत. या देशाच्या पूर्व सीमेवरून पाराना, पश्चिम सीमेवरून तिची प्रमुख पनदी पील्कोमायो व दक्षिण सीमेवरून पॅराग्वाय या नद्या वाहतात.

भूवर्णन

दक्षिण अमेरिकेच्या जवळजवळ मध्यभागी असणारा हा देश ब्राझीलच्या पाराना पठाराचाच दक्षिण भाग आहे. हे पठार ट्रायासिक कालखंडातील रेतीखडक व बेसाल्ट खडकांपासून बनले आहे. पठाराच्या ईशान्य भागात सर्वोच्च उंची ६०० मी. च्या दरम्यान असून त्यावर पारानाच्या उपनद्यांच्या खोल दऱ्या निर्माण झाल्या आहेत. पॅराग्वाय नदी या देशाच्या जवळजवळ मध्यावरून वाहते. पश्चिमेकडील भाग बराच सपाट असून त्यास ‘ग्रान चाको’ म्हणतात; त्याचे क्षेत्रफळ २,४६,९२५ चौ. किमी. आहे. हा भाग अर्वाचीन तृतीयक व चतुर्थक काळांतील गाळाच्या खडकांनी बनला आहे. पॅराग्वायचा पूर्वेकडील भाग १,५९,८२७ चौ.किमी. क्षेत्रफळाचा असून नदीलगतचा सखल खोऱ्यांचा प्रदेश व पूर्वेकडील डोंगराळ भाग, असे, त्याचे विभाग आहेत. पॅराग्वाय नदीच्या पूर्वेस ईशान्य-नैऋत्य दिशेने ३०० ते ७०० मी. उंचीच्या डोंगररांगा नदीस समांतर जातात; या डोंगरांचा पूर्वेचा उतार समेवरील पाराना नदीपर्यंत तीव्र आहे. या डोंगररांगा म्हणजे पॅराग्वाय व पाराना या नद्यांमधील जलविभाजक प्रदेश होय. या प्रदेशातून पश्चिमेस पॅराग्वाय नदीकडे वाहणाऱ्या नद्या संथ आहेत, तर पूर्वेस पारानाकडे जाणाऱ्या नद्यांवर अनेक धबधबे आहेत. अशा प्रकारे या देशाचे भूरचनेप्रमाणे तीन विभाग होतात.

(१) पूर्वेकडील पाराना व पॅराग्वाय नद्यांमधील जलविभाजक उच्च प्रदेश : हा ब्राझील पठाराचाच भाग असून त्याची उंची ३०० ते ६०० मी. हे. कॉर्डिलेरा डे आमाम्बाय ही डोंगररांग सीमेनजीक असून ती दक्षिणेस एंकार्नासीओनपर्यंत पसरते. या रांगेच्या पूर्वेस पॅराग्वायच्या सीमेवरीन पाराना नदी वाहते.

(२) पॅराग्वाय नदीच्या पूर्वेचा सखल प्रदेश: हे पॅराग्वायचे विस्तीर्ण खोरे असून लोकवस्ती या भागातच एकवटली आहे व या भागातच ईप्वा हे २४० चौ. किमी. क्षेत्रफळाचे व ईपाकाराई ही दोन सरोवरे आहेत. सरोवरांकाठी बरीच दलदलही आहे. पॅराग्वाय नदीच्या पूर्वेकडील या दोन्ही विभागांस ‘रीजन ऑरिएंटल’ म्हणतात.

(३) पॅराग्वाय नदीच्या पश्चिमेचा विस्तीर्ण सपाट प्रदेश (ग्रान चाको): हा अर्जेंटिना, पॅराग्वाय आणि बोलिव्हिया ह्या तिन्ही देशांत पसरतो. हा प्रदेश अर्वाचीन काळातील गाळ संचयनाने निर्माण झाला असून त्याचा १/३ भाग पॅराग्वाय देशात समाविष्ट होतो.

नद्या

पॅराग्वाय ही अर्थातच प्रमुख नदी आहे. पॅराग्वाय याचा ग्वारानी भाषेतील अर्थच मुळी ‘मोठी नदी’ असा आहे. पॅराग्वायला खरे पाहता नद्यांचा देश असेच म्हणावयास हवे. कारण देशाची ८०% सीमा नद्यांनी निश्चित झालेली आहे. पाराना, पॅराग्वाय, आपा, आल्टो पाराना व पील्कोमायो या नद्यांचे काही प्रवाहभाग सीमेवरून वाहतात. पॅराग्वाय १,५०० किमी. उत्तरेस ब्रीझीलच्या पठारावरून वाहत येऊन पॅराग्वायमध्ये प्रवेशते व नागमोडी वळणांनी सरळ दक्षिणेस वाहते. मार्गात हेव्ही-ग्वासू, आपा व आकीडाबान या उपनद्या पूर्वेकडून मिळतात, तर आसूनस्यॉनजवळ पील्कोमायो नदी पश्चिमेकडून मिळते. पुढे पॅराग्वाय नदीस दक्षिण सीमेवर पाराना नदी मिळते व त्यांपासून पुढे अर्जेंटिनामध्ये ला प्लाता नदी बनते. ग्रान चाको भागात मोठ्या नद्या नाहीत व ज्या आहेत त्या उन्हाळ्यात कोरड्या पडतात. ईप्वा व ईपाकाराई ही दोन सरोवरे मध्य सखल प्रदेशात निर्माण झाली हेत. पॅराग्वाय हा देश पूर्णपणे भूमिवेष्टित असल्याने ला प्लातामधूनच पुढे अर्जेंटिनामार्गे पॅराग्वायला समुद्र संपर्क ठेवता येतो.

मृदा

पॅराग्वायमधील मृदा जास्त पाऊस व उष्ण हवामान यांमुळे रारायनिक विदारणाने बनलेल्या असून पूर्वेस डोंगराळ भागात तांबूस मुरमाड माती व बेसाल्टपासून विदारणाने बनलेली माती आहे. नद्यांच्या मैदानात गाळाचे व चुनखडीचे प्रमाण जास्त असलेली माती आहे. पॅराग्वाय नदीकाठी बराच भाग दलदलीचा असून त्या भागात जलसंपृक्त खाजणी मृदा व लोम मृदा आहेत. तर पारानाच्या काठी पूर्व भागात लाल मृदा व दक्षिणेस काळी चिकण माती आहे. पश्चिमेच्या ग्रान चाको भागातील मृदा अर्वाचीन गाळापासून बनल्या आहेत व पश्चिमेस हवामान कोरडे असल्याने भूपृष्ठालगत चुनखडक वर आलेले आहेत. त्यांमुळे मातीला पांढरट छटा प्राप्त झाली हे. तसेच वाऱ्याबरोबर वाहून आलेल्या वाळूच्या मिश्रणाने बनलेल्या मृदा या भागात आहेत. शेतीला ही जमीन फारशी योग्य नाही, पण विरळ कुरणे या भागात आढळतात.

खनिज संपत्ती

देशात एकूण खनिज संपत्ती मर्यादितच आहे. लोह व मँगॅनीजचे साठे आहेत, पण ते व्यापारी प्रमाणावर नसल्याने खाणकाम परवडणारे नाही. चुनखडक, मीठ, केओलीन व अपेटाइटचे खूप मोठे साठे आहेत. ग्रान चाको भागात खनिज तेल सापडण्याची शक्यता असून अनेक परदेशी कंपन्या खनिज तेलाचा शोध घेत आहेत. एंबोस्काडा व कापूकू येथे अनुक्रमे मँगॅनीज व तांबे सापडते. पूर्वी येथे विविध प्रकारची खनिज संपत्ती सापडेल असा अंदाज होता, पण तो खोटा ठरला आहे.

हवामान

उत्तर भागात आर्द्र उष्ण हवामान आणि दक्षिण भागात उबदार थंड हवामान आहे. हिवाळ्यात सरासरी तपमान उत्तरेस २००से. व दक्षिणेस १००से. पर्यंत असते, तर उन्हाळ्यात ऑक्टोबर ते मार्च या काळात तपमान ३२० ते ३५०से. पर्यंत वाढते. ब्राझीलच्या सीमाप्रदेशात व पूर्वेच्या डोंगराळ भागात पाऊस २०० सेंमी.पर्यंत पडतो व तो पश्चिमेस कमी होतो.पॅराग्वायच्या खोऱ्यांत १२० सेंमी. व ग्रान चाकोच्या खोऱ्यात मारीस्काल एस्टीगारीब्या भागात ५० ते ७५ सेंमी. पाऊस पडतो. पाऊस वर्षभर पण मुख्यत: मार्च ते मे यांदरम्यान पडतो.

वनस्पती व प्राणी

देशाचा सु. ५४% भाग जंगलाखाली असून पूर्व भागात कठीण लाकडांचे व सीडार झाडांचे घनदाट जंगल आहे. त्यातील लाकूडतोड अद्याप फारशी झालेली नाही. ताड, तुंग व अन्य झाडे थोड्या प्रमाणात तेलासाठी तोडली जातात. ह्या जंगलाच्या पश्चिम भागात पानझडी व अतिपूर्वेस चाकोमध्ये खुरटी झुडपे व उंच गवत आढळते. चाको भागातील सहज मिळू शकणारी क्वेब्रॅको ही चामडे कमावण्यास उपयुक्त असणारी झाडे संपून गेली आहेत; पण दुर्गम प्रदेशात अजूनही ती शिल्लक आहेत व त्या भागात लाकूडतोड प्रयत्‍न सुरू आहेत. उरूंडी, लापाचो व परातोडो ही झाडे पॅराग्वायमध्येच सापडतात. परातोडोपासून क्विनीन बनवितात. पूर्वेस ब्राझीलमधील प्राण्यांसारखेच प्राणी असून वानर, टॅपिर,जॅगुआर (जॅग्वार) आणि रानडुक्कर सर्वत्र आहेत.आर्मडिलो (घोरपडीसीरखा प्राणी), कॉइपू हा पाण्यात राहणारा उंदीर, कॅपिबारा हा कुरतडणारा प्राणी व आयबिस, हेरन, टूकान, मस्कव्ही बदक, कबुतरे, होले, पोपट, गरुड, ससाणा इ. पक्षी व टॅरँट्युला हे राक्षसी विषारी कोळी सापडतात. पक्ष्यांच्या सु. ४०० जाती येथे आढळतात.

 

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/15/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate