অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पॅलेस्टाइन

पॅलेस्टाइन

पॅलेस्टाइन

भूमध्य समुद्राच्या पूर्व किनाऱ्यावरील प्राचीन इतिहासप्रसिद्ध भूप्रदेशाचे नाव. बायबल-युगात येथे इस्त्राएल व ज्यूडा अशी दोन राज्ये होती. विसाव्या शतकात इस्त्राएल, इजिप्त व जॉर्डन यांच्यामध्ये येथील भूप्रदेश विभागला गेला. पुढे इस्त्राएल स्वतंत्र झाल्यानंतर अरब राष्ट्रे व इस्त्राएल यांमध्ये या प्रदेशासंबंधी झगडा चालू आहे. हा प्रदेश ख्रिस्ती, ज्यू व इस्लाम या तिन्ही धर्मांच्या अनुयायांत पवित्र मानला जातो. पॅलेस्टाइन हे नाव पॅलेइस्टिना या ग्रीक शब्दापासून आले असून हा शब्द प्लेशेट म्हणजे फिलिस्टीन लोकांची भूमी–फिलिस्टीया–यावरून आला असावा. पहिल्या महायुद्धानंतर हा महादिष्ट प्रदेश म्हणून ब्रिटिशांकडे असताना त्यांनी पॅलेस्टाइन या शब्दचा अधिकृतरित्या प्रथम वापर केला. सु. ५,००० वर्षे पॅलेस्टाइन ही ‘पवित्र भूमी’ म्हणून जगाला ज्ञात होती. यहुदी व ख्रिस्ती या धर्मांचे पॅलेस्टाइन जन्मस्थळ आहे. बायबलमध्ये वर्णिलेल्या अनेक घटना येथे घडल्या. ऐतिहासिक पॅलेस्टाइनचे ऐकूण क्षेत्र २७,०२३.९५ चौ. किमी. असून हा प्रदेश भूमध्य समुद्राच्या पूर्व किनारपट्टीने इजिप्त व सिरिया या प्रदेशांतून पसरला आहे. अमेरिकेच्या व्हर्माँट राज्यापेक्षा तो थोडा मोठा असून, २०,७१९.९२ चौ. किमी. पॅलेस्टाइनचा प्रदेश इस्त्राएलच्या ताब्यात आहे व उरलेला प्रदेश जॉर्डन, लेबानन आणि सिरिया यांच्या आधिपत्याखाली आहे.

पॅलेस्टाइनमध्ये फार प्राचीन काळापासून मानवी वस्ती असावी, असा पुरातत्त्वज्ञांचा कयास आहे. येथे निअँडरथल मानवाचे सांगाडे सापडले आहेत. नसुफ, जेरिको, जोर्मो इ. स्थळी तसेच खुद्द जेरूसलेममध्ये नवाश्मयुगीन मानवाचे सांगाडे मिळाले आहेत. पुराणाश्मयुगातील तद्वतच नवाश्मयुगातील अनेक हत्यारे येथे मिळाली. इ. स.पू. २००० मध्ये पॅलेस्टाइन हा प्रदेश ‘कानन’ या नावाने प्रसिद्ध होता आणि काननाइट लोकांची सधन संस्कृती तेथे नांदत होती. ती ईजिप्शियनांप्रमाणे प्रगत होती. ते बॅबिलोनियनांप्रमाणे क्यूनिफॉर्म लिपी वापरीत. इ. स.पू. १९०० च्या सुमारास हिब्रू राजा अब्राहम आपल्या जमातीसह काननमध्ये स्थायिक झाला. हिब्रूंनी सभोवतालच्या प्रदेशांशी व्यापारी संबंध प्रस्थापित केले. काही वर्षे ईजिप्तने त्यांच्यावर वर्चस्व गाजविले. पुढे मोझेसने ज्यू लोकांची गुलामगिरीतून मुक्तता करून त्यांना पॅलेस्टाइनमध्ये इ. स.पू. बाराव्या शतकात परत आणले, असे आख्यायिका सांगते. तेव्हापासून पॅलेस्टाइनमध्ये हिब्रू संस्कृतीस सुरुवात झाली. हिब्रू हे मुळचे मेंढपाळ होते; परंतु त्यांनी काननाइट लोकांची संस्कृती आत्मसात केली. काहींनी काननाइट लोकांशी रोटीबेटी व्यवहार केले. इ. स.पू. ११००मध्ये इस्त्राएली लोकांनी पॅलेस्टाइनचा बहुतेक मुलूख पादाक्रांत केला. या सुमारास इजीअन बेटातून फिलीस्टीन लोक इकडे आले व नैऋत्य पॅलेस्टाइनच्या भागात स्थायिक झाले. त्यांनी त्या प्रदेशाला फिलिस्टिया हे नाव दिले. त्यामुळे पुढे हा प्रदेश पॅलेस्टाइन या नावाने प्रसिद्धीस आला. यावेळी इस्त्राएली लोकांच्या लहानमोठ्या टोळ्या होत्या. काननाइट आणि फिलीस्टीन लोकांशी मुकाबला करण्यासाठी या टोळ्या सॉल राजाच्या नेतृत्वाखाली एकत्र आल्या. सॉलनंतर डेव्हिड व सॉलोमन हे महत्वाचे राजे झाले. सॉलोमनच्या मृत्यूनंतर या राज्याचे दोन भाग झाले: उत्तरेकडील राज्यास इस्त्राएल व दक्षिणेकडील राज्यास ज्यूडा ही नावे प्राप्त झाली. इ. स. ७० मध्ये ही राज्ये रोमनांनी पादाक्रांत केली व त्यांना पॅलेस्टाइन हे नाव देऊन तो प्रदेश आपल्या साम्राज्याचा एक प्रांत बनविला. सु. ५०० वर्षे पॅलेस्टाइन रोमच्या आधिपत्याखाली होते. त्यानंतर बायझंटिन अंमल आला व पुढे अरबांनी हा प्रदेश इ. स. सातव्या शतकात ताब्यात घेतला आणि इस्लाम धर्माचा तेथे प्रवेश झाला. यानंतर सेल्जुक तुर्कांनी पॅलेस्टाइनवर काही वर्षे अंमल गाजविला. धर्मयुद्धांत पॅलेस्टाइनच्या भूमीला महत्व प्राप्त झाले, पण ऑटोमन तुर्कांनी ते १५१७ मध्ये काबीज केले. यानंतर येथे अधिक वस्ती मुसलमानांची होती. तुलनात्मक दृष्ट्या ज्यू फार थोडे होते व जे होते ते फार गरीब होते. १८८२मध्ये यूरोपमधून एक ज्यू तुकडी येथे स्थायिक होण्यासाठी आली. त्या तुकडीने ⇨ज्यू राष्ट्रीय आंदोलनास प्रारंभ केला आणि त्यातूनच पुढे १९४८ मध्ये इस्त्राएल या स्वतंत्र राष्ट्राची निर्मिती झाली.पहिल्या महायुद्धात पॅलेस्टाइन ही रणभूमी झाली. १९१८मध्ये ब्रिटिशांनी येथून तुर्की लोकांना हाकलून तेथे आपले वर्चस्व प्रस्थापित केले. काही ज्यूंनी ब्रिटिशांना मदत केली. पुढे प्रसिद्ध शास्त्रज्ञ-मुत्सद्दी व्हाइट्समान याने ज्यूंना पॅलेस्टाइन भूमी देण्याविषयी ग्रेट ब्रिटनला विनंती केली. या योजनेला बाल्फोर जाहीरनाम्याने महत्त्व प्राप्त झाले. पहिल्या महायुद्धानंतर राष्ट्रसंघाने बाल्फोर जाहीरनामा मान्य केला. राष्ट्रसंघाने १९२२मध्ये हा प्रदेश ब्रिटिशांकडेच महादिष्ट प्रदेश म्हणून सुपूर्त केला.

त्यानंतर विविध देशांतील हजारो ज्यू हळूहळू पॅलेस्टाइनमध्ये जमू लागले. ज्यू राष्ट्रीय आंदोलनास चालना मिळाली व ज्यूंची सुधारित वस्ती होऊ लागली. ज्यूंनी स्थानिक अरबांकडून जमिनी खरेदी करून वसाहती स्थापिल्या. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी ब्रिटिशांनी ज्यूंच्या स्थलांतरावर बंदी घातली; तरीसुद्धा जागतिक दडपणामुळे अखेर ज्यू राज्यनिर्मितीला त्यांनी मान्यता दिली. २९ नोव्हेंबर १९४७ रोजी संयुक्त राष्ट्रांनी पॅलेस्टाइनची फाळणी करून ज्यूंसाठी स्वतंत्र राष्ट्र व जेरूसलेम शहरास आंतरराष्ट्रीय दर्जा असावा, असा ठराव संमत केला. त्यानुसार १९४८ मध्ये इस्त्राएल या स्वतंत्र राष्ट्राची स्थापना झाली.

ईजिप्तमध्ये ज्यूंची संख्या मोठी होती. अफ्रिकेमधील इतर देशांतही ते विखुरलेले होते. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात हिटलर आणि त्याचा नाझी पक्ष यांनी ज्यूविरोधी आंदोलन सुरू केले. लक्षावधी ज्यू कुटुंबांची हिटलरने कत्तल केली. ज्यू जरी विखुरलेले होते, तरी ज्यू धर्मावर त्यांची निष्ठा होती; त्यांना आपले स्वतंत्र राष्ट्र असावे असे वाटत होते. या कल्पनेतूनच १८९७ मध्ये थीओडोर हेर्टझल या ऑस्ट्रियन लेखकाने ज्यू राष्ट्रीय आंदोलनास चालना दिली. त्याला पॅलेस्टाइनमध्ये ज्यू राष्ट्र निर्माण करावयाचे होते. याला प्रतिसाद देण्यासाठी १९३० नंतर अनेक ज्यू यूरोपमधून पॅलेस्टाइनमध्ये जमू लागले. दुसऱ्या महायुद्धाच्या सुमारास पॅलेस्टाइनमध्ये सु. ६लाख ज्यू आले होते.

डेव्हिड, सॉलोमन यांची सत्ता व इस्त्राएल आणि ज्यूडा ही छोटी राज्ये यांचा विचार करता ज्यूंची शासनयंत्रणा ज्यूडाच्या पाडावापर्यंतच अस्तित्वात होती. पॅलेस्टाइनमध्ये आलेल्या ज्यू टोळ्यांत राज्यसंस्था अस्तित्वात नव्हती. त्यांचे आर्थिक आणि सामाजिक जीवन गुंतागुंतीचे होऊन पुढे प्रांताधिकारी निर्माण झाले. नंतर फिलिस्टीन टोळ्यांमुळे एकतंत्री संघटनेची गरज उद्भवली. तीतून ज्यू राज्यसत्ता निर्माण झाली.

 

पहा : इस्त्राएल; ईजिप्त; जॉर्डन;लेबानन;सिरिया.

देशपांडे, सु. र.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 4/14/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate