অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मंगोलिया प्रजासत्ताक

मंगोलिया प्रजासत्ताक

मध्यपूर्व आशियातील एक स्वतंत्र प्रजासत्ताक देश. हा औटर मंगोलिया अथवा मंगोलिया या जुन्या नावांनीही ओळखला जातो. क्षेत्रफळ १५,६५,००० चौ. किमी. लोकसंख्या १७,७३,००० (१९८३ अंदाज). हा देश ४१° ३२' उ. अक्षांश ते ५२° १६' उ. अक्षांश व ८७° ५०' पू. रेखांश ते ११९° ५४' पू. रेखांश यादरम्यान पसरलेला आहे.

याच्या उत्तरेस सोव्हिएट रशिया; तर पूर्व, दक्षिण व पश्चिम या तिन्ही दिशांना चीन आहे. देशाची पूर्व-पश्चिम कमाल लांबी २,४१४ किमी. व दक्षिणोत्तर रूंदी १,२५५ किमी. आहे. ऊलान बाटोर (लोकसंख्या ४,३५,४००-१९८०) ही देशाची राजधानी आहे.

भूवर्णन

स्थूलमानाने मंगोलिया प्रजासत्ताकाचा भूप्रदेश म्हणजे एक पठार असून त्याची सस.पासून उंची सु. ९०० ते १,५२० मी. आहे. देशाच्या पूर्व, उत्तर व पश्चिम सरहद्दी पर्वतरांगांनी सीमित झालेल्या असून पूर्व सीमेलगत शिंगान (खिंगन) पर्वतरांग, तर उत्तर व पश्चिम सीमांवर अनुक्रमे सायान (सेयान्स) व अल्ताई पर्वतरांगा पसरलेल्या आहेत. दक्षिण सीमेवर गोबी वाळवंट आहे.

देशाचे मध्य, उत्तर, पश्चिम व नैर्ऋत्य भाग टेकड्या व उंच पर्वरांगांनी व्यापलेले आहेत. अतिपश्चिमेकडील भाग मुख्यत्वे डोंगराळ व उंच पर्वतशिखरांचा असून दक्षिण व पूर्व भाग वाळवंटी व ओसाड आहेत.

पर्वतरांगांदरम्यानच्या द्रोणीप्रदेशात अनेक सरोवरे आहेत. भूरचनेच्या दृष्टीने देशाचे उत्तरेकडील व पश्चिमकडील पर्वतप्रदेश, उत्तरेकडील पर्वतांदरम्यानचा द्रोणीप्रदेश आणि पठारी व वाळवंटी प्रदेश असे तीन विभाग पाडले जातात.

उत्तरेकडील व पश्चिमेकडील पर्वतप्रदेश

देशातील या पर्वतरांगांची निर्मिती अल्पाइन काळात झाली असावी. देशात प्रमुख तीन पर्वतरांगा असून त्यांपैकी पश्चिम भागातील वायव्य-आग्नेय दिशेने पसरलेली, सु. १,६०० किमी. लांबीची अल्ताई पर्वतरांग प्रमुख आहे. मंगोलियन अल्ताई (मंगोल अल्तायन नूरू) व गोबी अल्ताई (गोव्ही अल्तायन नूरू) या तिच्या दोन प्रमुख शाखा होत.

मंगोलियन अल्ताई या रांगेतील ताबन बोग्दो (उंची ४,६५३ मी.) हा रशिया, चीन व मंगोलिया यांच्या सरहद्दीवरील भाग देशातील सर्वोच्च भाग आहे. ही रांग आग्नेयीस सु. १,४५० किमी. पसरली असून तेथून पुढे तिच्या लहानलहान रांगा गोबी वाळवंटापर्यंत विस्तारल्या आहेत. या रांगेत मुंकू खैरखान (सु.४,२१० मी.) हे दुसरे उंच शिखर आहे.

गोबी अल्ताई ही दुसरी रांग देशाच्या दक्षिणमध्य भागात वायव्यआग्नेय दिशेने पसरलेली असून तिच्या दक्षिणेस तिला समांतर अशा एड्रेगियन व गुर्व्हान या छोट्या डोंगररांगा आहेत. इखे बोग्दो (३,९६२ मी.) हे या रांगांतील महत्त्वाचे शिखर आहे.

गोबी अल्ताईच्या उत्तरेस तिला समांतर अशी खांगाई (हांग्यन नूरू) ही पर्वतरांग असून ऑत्खोनतेंग्री (४,०३१ मी.) हे तिच्यामधील उंच शिखर आहे.

देशाच्या ईशान्य भागात ऊलान बाटोरच्या ईशान्येस हेंटियन नूरू (खेतेंन) ही १,९०० ते २,४५० मी. उंचीची रांग नैर्ऋत्य-ईशान्य दिशेने, तर देशाच्या उत्तर सरहद्दीनजीक खब्सगल नूरू ही रांग पश्चिम-पूर्व दिशेने पसरली आहे.

उत्तरेकडील पर्वतांदरम्यानचा द्रोणीप्रदेश

देशातील प्रमुख पर्वतरांगांदरम्यानचा हा अनेक सरोवरांचा प्रदेश आहे. याचा बराचसा भाग पर्वतउतारावरून वाहून आलेल्या गाळाचा बनलेला आहे.

मंगोलियन अल्ताई, खांगाई व वायव्येस रशियाच्या सरहद्दीवरील डोंगररांगा यांदरम्यानचा द्रोणीप्रदेश ‘सरोवरांचा प्रदेश’ म्हणून प्रसिद्ध आहे. या भागात सु. ३०० हून अधिक सरोवरे आहेत. याशिवाय खांगाई पर्वतरांगेचा पूर्व उतार व हेंटियन नूरूचा पश्चिमेकडील पायथ्यालगतचा द्रोणीप्रदेश तसेच खब्सगल नरूच्याउत्तरेकडील द्रोणीप्रदेश हे सरोवरांसाठी प्रसिद्ध आहेत.

दक्षिण भागातील टूलागोल व ऑरकॉनगोल हे द्रोणीप्रदेश सुपीक असून मंगोलियाच्या इतिहासात वसाहतींच्या दृष्टीने ते अत्यंत महत्त्वाचे ठरले. खांगाईचा उत्तरेकडील खोर्गो प्रदेश व इतर भाग हा निद्रिस्त ज्वालामुखींचा प्रदेश असून याच्या काही भागांत ज्वालामुखीजन्य सरोवरे आढळतात.

तसेच या प्रदेशात काही उष्ण पाण्याचे झरेही आहेत. देशात भूकंपाचे प्रमाण अधिक आहे.

पठारी व वाळवंटी प्रदेश

देशाचा पूर्व भाग विस्तीर्ण ओसाड मैदानाचा, लहानलहान टेकड्यांचा व सस. पासून सु. ६०० ते ७०० मी. उंचीचा आहे. याही भागात अनेक निद्रिस्त ज्वालामुखी शंकू आहेत.

देशाच्या पूर्व भागातील दरिगंगा प्रदेशात सु. २२० निद्रिस्त ज्वालामुखी शंकू आढळतात. हा प्रदेश गोबी वाळवंटांचा असून याचा बहुतेक भाग ग्रॅनाइटी व रूपांतरित खडकांचा आणि वाळूचा आहे. यात अधूनमधून रूंद उथळ द्रोणीप्रदेश आढळतात. याच प्रदेशात गुर्व्हान, एड्रेंगियन इ. छोट्या डोंगररांगा आहेत. याच्या काही भागात मात्र मरूद्याने, बेसाल्टी खडकांनी बनलेले कडे इ. नैसर्गिक भूविशेष पहावयास सापडतात.

देशाच्या दक्षिण भागातील गोबी वाळवंटी प्रदेशात येलिन आम (व्हॅली ऑफ काँडर) हे प्रसिद्ध राष्ट्रीय उद्यान आहे. याच प्रदेशात अनेक निदऱ्या, कडे व त्यांमध्ये काँडर पक्ष्यांची घरटी पहावयास मिळतात. इतिहासकालीन समृद्ध संस्कृती याच भागात होती, असे उपलब्ध पुराव्यांवरून दिसून येते [ गोबी-१].

देशाचा वायव्य व उत्तर भाग अनेक नद्या व सरोवरे यांनी व्यापलेला आहे. बहुतेक सर्व नद्या देशांतर्गत व देशाबाहेरील लहानमोठ्या सरोवरांना जाऊन मिळतात; तर काही छोटे प्रवाह वाळवंटी प्रदेशातच लुप्त होतात. देशातील नदीप्रवाह डोंगराळ प्रदेशातून वाहत असल्याने अत्यंत वेगवान असून त्यांची पात्रे अरूंद आहेत. त्यामुळे अंतर्गत जलवाहतून अत्यंत मर्यादित आहे.

बहुतेक नद्यांतील पाणी थंडीमध्ये गोठते, तर उन्हाळ्यात पात्रे कोरडी पडतात. उत्तरवाहिनी सेलेंगा ही देशातील प्रमुख नदी असून ती खांग ई पर्वतरांगेत उगम पावते. मूरेन व ईडेर हे तिचे प्रमुख शीर्षप्रवाह होत. १,४४४ किमी. लांबीची ही नदी प्रथम पूर्वेस वाहत जाते व रशियाच्या सरहद्दीजवळ उत्तरवाहिनी बनून पुढे रशियातील बैकल सरोवरास जाऊन मिळते.

ऑरकॉन ही तिची उजवीकडून मिळणारी प्रमुख उपनदी असून या दोन्ही नद्या खांगाई पर्वतरांगेच्या उत्तर उतारावरील वनप्रदेशातून वाहतात. सेलेंगा नदीला डावीकडून डेलगेर, एगीन इ., तर उजव्या बाजूने चानुजन, ऑरकॉन या महत्त्वाच्या नद्या मिळतात. सेलेंगा नदी मे ते ऑक्टोबर या काळात सखे बाटोरच्या खाच्या भागात जलवाहतुकीस सोयीची ठरते.

एगीन ही ४७२ किमी. लांबीची उपनदी देशांच्या उत्तर सरहद्दीजवळील खब्सगल सरोवरातून उगम पावून प्रथम दक्षिणेस व नंतर पूर्वेस वाहत जाऊन हुतागच्या पूर्वेस सेलेंगा नदीस मिळते.

हिचे पाणी नोव्हेंबर ते एप्रिल या काळात गोठते. या प्रमुख नद्यांशिवाय देशाच्या पश्चिम भागात हॉव्हड, दझाबखान व पूर्व भागात टूला, नॉन, केरलेन इ. लहानमोठे नदीप्रवाह आहेत.

केरलेन ही १,२५६ किमी. लांबीची नदी हेंटियन नूरू रांगेत उगम पावून प्रथम दक्षिणेस व नंतर ईशान्य दिशेने वाहत जाऊन चीनच्या इनर मंगोलिया प्रांतातील हूलुन सरोवरास जाऊन मिळते.

 

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/26/2019



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate