हिंदी महासागरातील एक प्रवाळद्वीपीय प्रजासत्ताक देश. अक्षवृत्तीय व रेखावृत्तीय विस्तार अनुक्रमे ७° ७′ उ. ते ०° ४३′ द. व ७२° ३१' पू. ते ७३° ४३′ पू. यांदरम्यान. दक्षिणोत्तर विस्तार ८२० किमी. व पूर्व-पश्चिम विस्तार १३० किमी. असून किनाऱ्याची लांबी २,३९३ किमी. व क्षेत्रफळ २९८ चौ. किमी. आहे.
लोकसंख्या १,५८,५०० (१९८३ अंदाज). भारताच्या दक्षिणेस असलेले हे आशियातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वांत लहान राष्ट्र आहे. देशामध्ये सु. २,००० वर बेटे असून त्यांपैकी केवळ २२० बेटांवरच मनुष्यवस्ती आहे. देशातील सर्वांत उत्तरेकडील कंकणद्वीप भारताच्या दक्षिण टोकावरील कन्याकुमारीपासून ४८० किमी. असून श्रीलंकेच्या नैर्ऋत्येस ६४० किमी. अंतरावर हा देश आहे.
याच्या उत्तरेस ११० किमी. अंतरावर भारताचे मिनिकॉय हे कंकणद्वीप आहे. मालदीव व मिनिकॉय ही बेटे आठ अंश खाडीने एकमेकांपासून अलग झाली आहेत. माले हे राजधानीचे ठिकाण (लोकसंख्या ३०,०००–१९७८) याच नावाच्या कंकणद्वीपावर असून देशातील जास्तीतजास्त लोकसंख्या याच शहरी एकवटलेली आहे. मालदीव हा ‘महालदीव’ (महाल = राजवाडा; दीव = बेट) या शब्दाचा अपभ्रंश असावा.
मालदीव प्रजासत्ताकात इहवांडिफुलू, टिनाडुम्मटी, मिलडुम्मडुलू, उत्तर मलोस्मडुलू, दक्षिण मलोस्मडुलू, फडिफोलू, माले,आरी, फेलिडू, निलंडू, मुलकू, कोलुमडुलू, हड्डुम्मटी, सुव्हाडिव्ह, आडू इ. प्रमुख कंकणद्वीपसमूह आहेत. या द्वीपसमूहांतील बहुतेक बेटे सपाट व सस.पासून अगदी कमी उंचीची असून १·८ मी. पेक्षा अधिक उंचीची बेटे क्वचितच आढळतात.
काही प्रवाळबेटांची निर्मितिप्रक्रिया अजून सुरू असून हळूहळू त्यांचा आकारही वाढत असलेला दिसतो, तर काही बेटांची उंची व आकार कमी होत आहे.
काही बेटांवर गोड्या पाण्याची खाजणे आहेत. काही बेटे आकाराने खूपच लहान असून काहींच्याभोवती प्रवाळशैलभित्तींची निर्मिती झालेली आढळते. मध्य भागातील बेटांपेक्षा उत्तरेकडील व दक्षिणेकडील बेटे अधिक सुपीक असून त्यांतही पश्चिमेकडील बेटांपेक्षा पूर्वेकडील बेटे जास्त सुपीक आहेत.
मालदीव बेटांचे हवामान विषुववृत्तीय प्रकारचे उष्ण व आर्द्र आहे. वार्षिक सरासरी तापमान २७° से. असते. ईशान्य मोसमी वाऱ्यांच्या काळात (नोव्हेंबर–मार्च) हवामान सौम्य व उत्साहवर्धक, तर नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांच्या काळात (जून–ऑगस्ट) हवामान वादळी स्वरूपाचे व जोरदार पावसाचे असते.
दक्षिणेकडील बेटांपेक्षा उत्तरेकडील कंकणद्वीपांना जास्त जोरदार वाऱ्यांचा तडाखा बसतो. दक्षिण भागात वार्षिक सरासरी पर्जन्य ३८० सेंमी., तर उत्तर भागात २५० सेंमी. पडतो.
बेटांवर खुरट्या व लहानलहान झुडुपांचे दाट आच्छादन आढळते. यांशिवाय नारळ, विलायती फणस, केळी, पपई, आंबा, वड इ. वृक्षप्रकार बरेच आहेत. फुलझाडेही आढळतात. वेगवेगळ्या प्रकारचे उंदीर, ससे, फळे खाणारी वटवाघळे इ. प्राणी येथे दिसून येतात.
बदके, बिटर्न (बगळ्याचा एक प्रकार), कावळे, गुलिंदा, पाणलावा व अनेक प्रकारचे समुद्रपक्षी आढळतात. विंचू , भुंगेरे, जमिनीवरील खेकडे सर्वत्र दिसून येतात. खाजणांत, समुद्रकिनाऱ्यावर व भरसमुद्रात कासवे व इतर कवचधारी प्राणी, मुशा, तलवार मासा, घड्याळमासा इ. उष्ण कटिबंधीय जलचर मोठ्या प्रमाणात सापडतात.
टॉलेमीच्या लेखनावरून पाश्चिमात्यांना इ. स. दुसऱ्या शतकात मालदीव बेटांविषयी प्रथम माहिती मिळाली. दक्षिण आशियाई लोकांनी येथे प्रथम वसाहती केल्या असाव्यात. प्राचीन काळी मालदीववर चीनचे आधिपत्य असल्याचे दिसून येते. त्यानंतर पश्चिम भारतातील माडलिक राजांकडे मालदीवकडून वार्षिक खंडणी पाठविली जाई.
११५३ मध्ये अरब व्यापाऱ्यांनी येथे इस्लाम धर्माचा प्रसार केला. तेव्हापासून १९५३ पर्यंत एकूण ९२ सुलतानांनी मालदीववर राज्य केले. १३४३ मध्ये प्रसिद्ध अरबी प्रवासी इब्न बतूता याने या बेटांना भेट देऊन काही काळ येथे वास्तव्यही केले. त्याची पत्नी मालदीवची होती.
पोर्तुगीज प्रवासी दॉन लोरेन्को दे आल्मेईदा १५०७ मध्ये येथे आला, तेव्हा पोर्तुगीज फौजांनी मालदीव बेटे ताब्यात घेऊन त्यांना गोव्याकडे ठराविक खंडणी भरण्यास भाग पाडले. १५७३ मध्ये मुहम्मद ठाकुरूफानी अल् आझम याने येथील पोर्तुगीज सत्ता संपुष्टात आणून तो स्वतः बेटांचा सुलतान बनला. त्यानेच येथे चलनपद्धती, नवीन लिपी व जुजबी फौज अस्तित्त्वात आणली.
सतराव्या शतकात सीलोनवर (श्रीलंका) सत्ता असलेल्या डचांशी येथील सुलतानाचा करार होऊन डचांवर मालदीवच्या संरक्षणाची जबाबदारी सोपविण्यात आली. त्यासाठी मालदीवचा सुलतान सीलोनकडे ठराविक खंडणी पाठवीत असे. १८८७ मध्ये बेटांचा ताबा ब्रिटिशांकडे गेला; मात्र बेटांची अंतर्गत स्वायत्तता कायम राहिली.
१९५६ मध्ये ब्रिटिशांनी गां बेटावर हवाई तळ आणि हिट्टाडू बेटावर ब्रिटिश रेडिओ केंद्र उभारले. २६ जुलै १९६५ रोजी कोलंबो येथे झालेल्या करारानुसार मालदीवला स्वातंत्र्य मिळाले, परंतु चौदाव्या शतकापासून राज्य करणाऱ्या अद्-दिन (दिदी) राजघराण्याची कारकीर्द संपुष्टात आल्यावर ११ नोव्हेंबर १९६८ रोजी प्रजासत्ताक म्हणून मालदीवची घोषणा करण्यात आली. हा देश राष्ट्रकुलाचा व संयुक्त राष्ट्रांचा सदस्य आहे.
या देशात सतराव्या शतकात सु. ४० वर्षे राज्य करणारा सुलतान इस्कंदर व पहिला इब्राहिम, तसेच आधुनिक नेते अमीर इब्राहिम नासिर व मौमून अब्दुल गायूम इ. व्यक्ती थोर मानल्या जातात. २६ जुलै हा राष्ट्रीय सुट्टीचा दिवस मानला जातो. १९६८ मध्ये देशाचे नवीन संविधान तयार करण्यात आले.
देशात एकसदनी राज्यपद्धती असून राष्ट्राध्यक्ष हा देशाचा आणि सरकारचा प्रमुख असतो; त्याची निवड पाच वर्षांसाठी विधानमंडळाकडून (मजलिस) केली जाते. कार्यकारी मंडळाचा तो प्रमुख असून मंत्रिमंडळाची रचना तोच करतो.
विधानमंडळाची सभासदसंख्या ४८ असून तीपैकी ४० सभासद सार्वत्रिक प्रौढ मतदानपद्धतीने निवडून आलेले व ८ राष्ट्राध्यक्षांनी नियुक्त केलेले असतात. ४० सभासदांपैकी २ सभासद राजधानी माले येथून, तर १९ बेटांमधून प्रत्येकी २ याप्रमाणे एकूण ३८ सभासद निवडून आलेले असतात.
विधानमंडळाची मुदत पाच वर्षांची असते. येथे राजकीय पक्ष नाहीत. देशाचे २० प्रशासकीय जिल्हे आहेत. त्यांपैकी राजधानी केंद्रशासित असून १९ बेटांच्या कारभारासाठी राष्ट्राध्यक्षांकडून प्रत्येक बेटासाठी एका प्रमुखाची (वरिन) नियुक्ती केलेली असते. परंपरागत इस्लामी कायद्याच्या (शरीआह) चौकटीतूनच न्यायदान केले जाते. १९८० मध्ये मालदीव उच्च न्यायालयाची स्थापना झाली.
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 7/18/2019
चागोस : हिंदी महासागरातील ब्रिटिशांचा द्वीपसमूह. म...
मानारचे आखात : भारत व श्रीलंका यांदरम्यानचा हिंदी ...
अरबी समुद्र : हिंदी महासागराचा वायव्येकडील फाटा. प...