অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मिशिगन

मिशिगन

अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील उत्तरेकडील एक राज्य. पंचमहासरोवरांच्या प्रदेशातील या राज्याच्या भूभागाचे क्षेत्रफळ १,५०,७७९ चौ.किमी. आहे.

जलाशयांनी ९९,९०९ चौ. किमी. प्रदेश व्यापला असून सुपीरिअर सरोवरातील रॉयल, ह्यूरन सरोवरातील ड्रमंड व मिशिगन सरोवरातील बीव्हर इ. मोठ्या आणि त्यांच्या जवळच्या लहान बेटांचाही समावेश या राज्यात होतो.

राज्याची लोकसंख्या ९२,६२,०७८ (१९८०) असून लॅनसिंग (१,३०,४४४) हे राजधानीचे ठिकाण आहे.

मॅकिनॅक सामुद्रधुनीमुळे या राज्याचे उत्तर व दक्षिण द्वीपकल्प असे दोन भाग झाले आहेत.

उत्तर द्वीपकल्पाच्या पश्चिमेस व उत्तरेस सुपीरिअर सरोवर, दक्षिणेस विस्कॉन्सिन राज्य व मिशिगन सरोवर, पूर्वेस कॅनडातील आँटॅरिओ राज्याच्या सरहद्दीवर सेंट मेरी नदी आहे.

दक्षिण द्वीपकल्पाच्या दक्षिणेस इंडियाना, ओहायओ ही राज्ये, पश्चिमेस मिशिगन सरोवर, उत्तरेस मिशिगन व ह्यूरन सरोवरांना जोडणारी मॅकिनॅक सामुद्रधुनी, पूर्वेस ह्यूरन व ईअरी सरोवरे व त्यांना जोडणाऱ्या डिट्रॉइट व सेंट क्लेअर नद्या आहेत.

भूवर्णन

राज्याचा बराचसा भाग जलाशयांनी व्यापलेला आहे. भूरचनेच्या दृष्टीनेही या दोन द्वीपकल्पांत भिन्नता आढळते. दक्षिण द्वीपकल्पाच्या समावेश देशाच्या कमी उंचीच्या व गाळाच्या प्रदेशात होतो.

हा प्रदेश भूखंड हिमवाहांमुळे बनलेला असून या भागात गाळाचे संचयन मोठ्या प्रमाणात झालेले दिसून येते. तसेच नद्यांच्या खोऱ्यांचा सुपीक प्रदेश शेतीसाठी फार महत्त्वाचा आहे. हा भाग जिप्सम, चुनखडक, वाळूचे दगड, मीठ, खनिज तेल, वाळू व रेती इत्यादींच्या खाणींसाठी तसेच कारखानदारीसाठी प्रसिद्ध आहे.

त्तर द्वीपकल्पाचा पश्चिम भाग प्रामुख्याने लॉरेन्शिअन पठाराचा, कँब्रियनपूर्व काळातील खडकांनी बनलेला आहे. हे द्वीपकल्प ‘सुपीरिअर हायलँड’ या नावानेही ओळखले जाते.

याच्या पश्चिम भागात अनेक लहानलहान पर्वतरांगा असून त्यांपैकी ह्यूरन मौंटन्स, मनॉमनी, आयर्न रेंज, गोगीबिक रेंज, पॉर्क्युपाइन मौंटन्स व कॉपर रेंज या प्रमुख आहेत. राज्यातील सर्वोच्च शिखर (६१५ मी.) पॉर्क्युपाइन मौंटन्समध्ये आहे. हा भाग जंगलव्याप्त असून तांबे (कॉपर रेंज परिसर) आणि लोह यांच्या खनिजांसाठी प्रसिद्ध आहे.

याच्या पूर्वेकडील कमी उंचीचा काही प्रदेश दलदलयुक्त असून त्याच्या पूर्वभागातून मिशिगन सरोवराला समांतर असा चुनखडकांचा ‘नायगारा डोंगर (क्वेस्टा)’ पसरलेला आहे.

हे राज्य महासरोवरांच्या प्रदेशात असल्याने येथील नद्या लांबीने खूपच कमी आढळतात. उत्तर भागातील नद्यांवर अनेक धबधबे व द्रुतवाह दिसून येतात. राज्यात ग्रँड, मस्कीगन, मॅनिस्टी, ह्यूरन, टक्वामनन, सेंट मेरी, डिट्रॉइट, सेंट क्लेअर इ नद्या महत्त्वाच्या आहेत.

हवामान

येथील हवामान खंडीय प्रकारचे असले, तरी सरोवरांच्या सान्निध्यामुळे स्थलपरत्वे हवामानात फरक आढळतो.

येथील हिवाळे थंड असतात. उत्तर द्वीपकल्पाच्या उत्तर भागात जानेवारीतील तपमान −१२ से., तर दक्षिण द्वीपकल्पाच्या दक्षिण भागात −३° से. असते. उन्हाळे कडक असतात.

जुलै महिन्यांचे सरासरी तापमान १५° ते २१°से. पर्यंत असते. आग्नेय भागातील डिट्रॉइट या शहराचे तापमान जानेवारीत −४०° से., तर जुलैमध्ये २३° से. असते. उत्तर भागातील सू सेंट मेरी येथे जानेवारीतील तापमान −११° से., तर जुलैमधील तापमान १७° से. असते.

उत्तर द्वीपकल्पाच्या पश्चिम भागात व दक्षिण द्वीपकल्पाच्या दक्षिण भागात वार्षिक सरासरी ७५ ते ८८ सेंमी. पाऊस पडतो, तर दक्षिण द्वीपकल्पाच्या उत्तर व उत्तर द्वीपकल्पाच्या पूर्व भागात ६० ते ७५ सेंमी. पाऊस पडतो.

वनस्पती व प्राणी

राज्याच्या पश्चिम भागातील पर्वतप्रदेश तसेच संपूर्ण उत्तर भाग जंगलांनी व्यापलेला आहे. येथील जंगलांत प्रामुख्याने मॅपल, व्हाइट पाइन, हेमलॉक, ओक, बर्च, एल्म, स्प्रूस, बासवुड इ. वृक्षप्रकार तसेच वेगवेगळी फुलझाडे आढळतात. यांशिवाय जंगलात ब्लॅकबेरी, रासबेरी, ब्लूबेरी, गूजबेरी, जंगली द्राक्षे इ. फळांचे प्रकारही मुबलक दिसून येतात. थंड हवामान व विपुल जंगले यांमुळे फरधारी प्राणी भरपूर आहेत.

एकोणिसाव्या शतकात फर व्यापाऱ्यांनी येथील प्राण्यांची बेसुमार कत्तल केली, तसेच खनिज उत्पादनासाठी व शेतीसाठी बहुतेक जंगले साफ करण्यात आली.

येथील जंगलांत हरणे काळी अस्वले, मूस, एल्क, ससे, बीव्हर, कायोट, स्कंक, चिचुंदरी, वीझल, ऊद मांजर, रॅकून, ऑस्पॉस्सम, वीझू, बॉबकॅट इ. प्राणी आढळतात. बहुतेक पक्षी इतर राज्यांतून येतात. फेझंट, वुडकॉक, तितर, जंगली हंस, वेगवेगळ्या प्रकारची बदके इ. पक्षी सर्वत्र आढळतात.

नद्या, सरोवरांत प्रामुख्याने पर्च, ट्राउट, बास, क्रॅपी, पाइक इ. मासे सापडतात. जंगली श्वापदांची व सरोवरांतील वेगवेगळ्या प्रकारच्या माशांची शिकार करणे हा येथील लोकप्रिय खेळ आहे. अलीकडच्या काळात जंगले वाढविण्याच्या दृष्टीने सरकारचे प्रयत्न सुरू आहेत.

चौंडे, मा. ल.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 6/4/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate