অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

युनायटेड किंग्डम

युनायटेड किंग्डम

युनायटेड किंग्डम

यूरोपच्या वायव्य किनाऱ्याजवळील अटलांटिक महासागरातील इंग्लंड, स्कॉटलंड, वेल्स व उत्तर आयर्लंड या प्रमुख चार प्रादेशिक विभागांचा बनलेला द्वीपरूप देश. विस्तार ४९० ५५’ते ६०० २५’ उ. व १० ४६’ पू. ते ७०३८’ पू. अधिकृत नाव युनायटेड किंग्डम ऑफ ग्रेट ब्रिटन अँ नॉदर्न आयर्लंड. ग्रेट ब्रिटन अथवा ब्रिटन या नावांनीही या देशाचा उल्लेख केला जातो. क्षेत्रफळ २,४४,१०३ चौ. किमी. लोकसंख्या ५,६३,७६,८०० (१९८३). इंग्लिश खाडीतील चॅनेल बेटे व आयरिश समुद्रातील आइल ऑफ मॅन यांचा फक्त आकडेवारीपुरताच युनायटेड किंग्डममध्ये समावेश होतो. हा देश पूर्वेस उत्तर समुद्र, दक्षिणेस इंग्लिश खाडी, पश्चिमेस व उत्तरेस अटलांटिक महासागर यांनी वेढलेला असून लंडन (महानगरीय लोकसंख्या ६७,५६,०००; १९८४) ही देशाची राजधानी आहे.

इंग्लंडच्या भूमीवर सु. १००० वर्षांपूर्वीच्या काळात सात राज्ये अस्तित्वात होती. इंग्लंडच्या राजकीय इतिहासात संयुक्तीकरणाची प्रवृत्तीही तेव्हापासूनच आढळते. मध्ययुगात वेल्सचाही त्यांमध्ये समावेश करण्यात आला (१२८४). सतराव्या शतकात स्कॉटलंडचा राजा सहावा जेम्स हा पहिला जेम्स म्हणून इंग्लंडच्या गादीवर आला व त्यामुळे इंग्लंड व स्कॉटलंड यांचे राजकीय दृष्ट्या एकीकरण घडून आले (१६०३). जेम्सने १६०४ मध्ये ‘युनायटेड किंग्डम’ या संज्ञेचा प्रथम वापर केला. १७०७ मध्ये ‘किंग्डम ऑफ ग्रेट ब्रिटन’ असे अधिकृत नामांतरण करण्यात आले. १८०० मध्ये त्यात आयर्लंडचाही समावेश करण्यात आला व हा देश ‘युनायटेड किंग्डम ऑफ ग्रेट ब्रिटन अँड आयर्लंड’ या नावाने ओळखला जाऊ लागला. त्याच वर्षी या देशाची संयुक्त संसदही स्थापन करण्यात आली. १९२२ मध्ये आयर्लंडचा मोठा प्रदेश स्वतंत्र झाला; परंतु आयर्लंडच्या उत्तर भागातील सहा परगण्यांनी एकत्र येऊन ‘नॉर्दर्न आयर्लंड’ (उत्तर आयर्लंड) असा विभाग स्थापन करून युनायटेड किंग्डममध्येच राहण्याचे ठरविले. त्यामुळे १९२७ मध्ये देशाचे ‘युनायटेड किंग्डम ऑफ ग्रेट ब्रिटन अँड नॉर्दर्न आयर्लंड’ असे नाव अधिकृतपणे जाहीर करण्यात आले. तथापि इंग्लंडच्या शाही नामाभिधान अधिनियमानुसार (रॉयल टायटल ॲक्ट) या नव्या नावास काही काळपर्यंत इंग्लंडच्या राजाने मान्यता दिली नाही. त्याने ‘युनायटेड किंग्डम’ हा शब्दप्रयोग अयोग्य ठरविला. दुसऱ्या महायुद्धकाळात मात्र नव्या नावास राजानेही मान्यता दिली. १९४५ मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या सनदेवरही हेच नाव नोंदविण्यात आले. पुढे १९५३ मध्ये शाही नामाभिधान अधिनियमातही यावर शिक्कामोर्तब करण्यात आले व दुसरी एलिझाबेथ ही या देशाची राणी म्हणून घोषित करण्यात आली.


पहा : आयर्लंड प्रजासत्ताक; इंग्लंड; उत्तर आयर्लंड; ग्रेट ब्रिटन; चॅनेल बेटे; मॅन, आइल ऑफ; वेल्स; स्कॉटलंड.

चौंडे, मा. ल.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 8/10/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate