অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

एडवर्ड नॉर्टन लॉरेन्झ

एडवर्ड नॉर्टन लॉरेन्झ

गणिती आणि हवामानतज्ज्ञ अशा एडवर्ड नॉर्टन लॉरेन्झ या अमेरिकन शास्त्रज्ञाचे योगदान आधुनिक हवामान क्षेत्रात उच्च कोटीचे मानले जाते. त्यांनी दुसऱ्या महायुद्धात (१९४२-४५) अमेरिकेच्या लष्करात हवामानतज्ज्ञ अशी भूमिका पार पाडली. त्यांचे मूळ शिक्षण गणितातले, पण नंतर त्यांनी मॅसेच्युसेटस् इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून हवामानशास्त्रातही पदव्या प्राप्त केल्या आणि शेवटपर्यंत त्या संस्थेत हवामानशास्त्राचे अध्यापन आणि संशोधन केले.

१९५०च्या दशकापर्यंत हवामानाच्या अंदाजासाठी रेषीय सांख्यिकी प्रतिकृती वापरल्या जात असत. तथापि हवामान अनेक प्रकारचे घटक आणि त्यांच्या परस्पर गुंतागुंतीवर अवलंबून असते. तरी लॉरेन्झ यांनी नवीन अरेषीयगणिती पद्धती हवामान अंदाजासाठी विकसित केल्या. त्या संदर्भात त्यांचा १९६३ साली प्रसिद्ध झालेला एक लेख फार महत्त्वाचा मानला जातो. त्यात लॉरेन्झ यांनी असे दाखवले की, दोन स्थिती सुरुवातीस अगदी सारख्या असल्या तरी त्यात अरेषीय रीतीने बदल घडत गेल्यास काही काळाने त्या दोन्हींत कुठलेही साम्य आढळत नाही. हवामानातही सहसा असेच घडत असल्याने हवामानाचा अंदाज चुकू शकतो.

वातावरणात हवा कशी फिरते याबाबत लॉरेन्झनी काही साधी समीकरणे मांडली आणि त्यावर विशिष्ट प्रकारची पुनरावृत्ती गणिती प्रक्रिया केल्यास अतिशय गतिमान व व्यामिश्र सूत्रबंध तयार होतात असे दाखवले, ज्यांना आता ‘लॉरेन्झ आकर्षक’ असे म्हटले जाते. त्यांच्या सदर कामाने ‘गोंधळ सिद्धांत’ या एका नव्या गणिती विषयाला सुरुवात झाली, ज्याचा वापर हवामान आणि अनेक क्षेत्रांत केला जातो. त्याच कामाचा विस्तार करून लॉरेन्झनी १९६९ मध्ये असे दाखवले की जगातील एका भागात घडलेल्या एखाद्या क्षुल्लक नसíगक घटनेमुळेदेखील त्यापासून अतिशय दूर असलेल्या भागातील हवामानावर काही काळाने परिणाम होऊ शकतो. त्याला ‘फूलपाखरू प्रभाव’ असे म्हटले जाते.

उदा. दक्षिण अमेरिकेच्या जंगलात एका फूलपाखराने त्याचे पंख सामान्यपेक्षा जास्ती वेळा फडफडवले तर भारतातील पावसावर परिणाम घडू शकतो. सारांश, म्हणजे एका आठवडय़ापलीकडचे हवामान अंदाज सहसा चुकीचे ठरू शकतात.

लॉरेन्झ यांना त्यांच्या हवामान क्षेत्रातील भरीव संशोधन कार्यासाठी अनेक मान मिळाले. जसे की क्राफोर्ड पुरस्कार (१९८३), क्योटो पुरस्कार (१९९१), लोमोनोझोव्ह सुवर्णपदक (२००४). त्यांचे संशोधन सतत चालू होते. ९० व्या वर्षी मृत्युपूर्वी एक आठवडा त्यांनी एक शोधलेख सहलेखित केला होता हे विशेष!

लेखक : डॉ. विवेक पाटकर

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

अंतिम सुधारित : 7/16/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate