অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

ग्यिऑर्गी व्हल्येंट्यीनव्ह्यिच प्ल्येखानॉव्ह

ग्यिऑर्गी व्हल्येंट्यीनव्ह्यिच प्ल्येखानॉव्ह

ग्यिऑर्गी व्हल्येंट्यीनव्ह्यिच प्ल्येखानॉव्ह : (२९ नोव्हेंबर १८५६–३० मे १९१८). रशियन क्रांतिकारक आणि रशियन मार्क्सवादाचा प्रणेता. रशियातील टम्बॉव्ह प्रांतात, गूडलोव्हक या गावी, लष्करी पेशाची परंपरा असलेल्या एका सामान्य कुटुंबात त्याचा जन्म झाला. सेंट पीटर्झबर्ग येथील लष्करी महाविद्यालयात तो सहा महिने होता (१८७३). त्यानंतर तो क्रांतिकारक पॉप्युलिस्ट पक्षात दाखल झाला. शेतकऱ्यांच्या या क्रांतिकारक चळवळीला शेतकरी वर्गाकडून पुरेसा प्रतिसादही मिळत नव्हता. शिवाय शासन ती चिरडून टाकण्याच्या प्रयत्नात होते; म्हणून ‘लँड अँड लिबर्टी’ ही संघटना स्थापून दहशतवादी मार्ग अवलंबिण्यात आले. दहशतवादाच्या निषेधार्थ तो या चळवळीतून बाहेर पडला (१८७९) आणि जिनीव्हा (स्वित्झर्लंड) येथे निघून गेला. तेथे तो सु. ४० वर्षे राहिला. जिनीव्हा येथे तो मार्क्सवादी विचारांकडे आकृष्ट झाला. त्याने पॉल अक्झेलॉर्ड, एल्. डॉइचस, व्ही. झासुलिच व इतर काही समविचारी सहकाऱ्यांच्या साह्याने ‘मार्क्सिस्ट लिबरेशन ऑफ लेबर’ हा गट स्थापन केला (१८८३). या गटामार्फत त्याने मार्क्सचे सर्व लेखन रशियन भाषेत अनुवादित केले आणि चोरट्या मार्गांनी ते रशियात प्रसृत केले.

पुढे त्याने मार्क्सवादी विचारांचा प्रसार आणि प्रचार व्हावा, म्हणून रशियात ‘रशियन सोशल डेमॉक्रॅटिक वर्कर्स’ या पक्षाची स्थापना करण्यास मदत केली (१८९८). हाच पक्ष पुढे त्याचा शिष्य लेनिन याच्या नेतृत्वाखाली कम्युनिस्ट पक्ष या नावाने प्रसिद्धीस आला. या पक्षाच्या प्रचारार्थ त्याने ‘ठिणगी’ (Iskra) नावाचे मुखपत्र काढले (१९००). त्याचे संपादन तोच करी. रशियातील सामाजिक लोकशाही चळवळीचे नेतृत्व त्याच्याकडे होते. या काळात लेनिन त्याच्या विचारांकडे आकृष्ट झाला. तात्त्विक मतभेदांमुळे १९०३ मध्ये रशियन सोशल डेमॉक्रॅटिक वर्कर्स पक्षात दुही पडली आणि बोल्शेव्हिक व मेन्शेव्हिक असे दोन पक्ष निर्माण झाले. प्ल्येखानॉव्ह सुरुवातीस बोल्शेव्हिक पक्षात सामील झाला; पण काही धोरणांसंबंधी मतभेद होऊन त्याने १९०४ मध्ये मेन्शेव्हिक पक्षाचे नेतृत्व स्वीकारले; परंतु बोल्शेव्हिक पक्षाची प्रसंगोपात्त ध्येयधोरणे त्यास मान्य होती. तो लेनिनला मदतही करीत असे. पहिल्या महायुद्धकाळात (१९१४–१८) त्याने रशियन शासनास पाठिंबा दिला. या त्याच्या धोरणावर सर्वत्र टीका झाली.

१९१७ च्या क्रांतीनंतर तो रशियात आला आणि त्याने ‘एकता’ (Yedinstwo) हे बोल्शेव्हिकांविरुद्ध प्रचार करण्यासाठी वृत्तपत्र सुरू केले. शिवाय याच वेळी मेन्शेव्हिक पक्षात दोन गट निर्माण झाले व त्याची लोकप्रियता ढासळली. तेव्हा तो फिनलंडला गेला. हद्दपारीत असताना टेरिजोकी येथे तो मरण पावला. प्ल्येखानॉव्हने अर्थशास्त्र, राजकीय सिद्धांत, तत्त्वज्ञान इ. विविध विषयांवर विपुल लेखन केले. त्याचे बहुतेक लेखन मार्क्सवादी दृष्टिकोनातून केलेले असून त्यात आर्थिक नियतिवादाचे तत्त्व त्याने सविस्तरपणे स्पष्ट केले आहे. भांडवलशाही व उद्योगधंदे यांचा पुरेसा विकास झाल्याशिवाय रशियातील सामाजिक परिस्थिती समाजवादास अनुकूल होणार नाही, हा विचार त्याने आपल्या लेखनातून स्पष्ट केला. मार्क्सवादी परिभाषा त्याने विकसित केली. त्याच्या प्रमुख ग्रंथांत द डिव्हल्‌पमेंट ऑफ मोनिस्टिक व्ह्यू ऑफ हिस्टरी (१८९४, इं. भा.), व एसेज ऑन द हिस्टरी ऑफ मटेरिअॅलिझम (१८९६, इं. भा.) हे दोन महत्त्वाचे ग्रंथ होत. पहिला ग्रंथ त्याने ‘बेल्टोव्ह’ या टोपणनावाखाली लिहिला आणि त्यात इतिहासविषयीचा मार्क्सवादी दृष्टिकोण मांडला असून क्रांतिकारकांना अखेर विजय मिळेल, असा दृढ विश्वास व्यक्त केला आहे. या त्याच्या पुस्तकाला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली.

दुसऱ्या पुस्तकात द्वंद्वात्मक जडवाद ही संज्ञा त्याने शोधून काढली व भौतिकवादी तत्त्वावर हेगेलचा द्वंद्ववाद कसा आधारित आहे, या बाबतचे मार्क्सचे विवरण सांगताना या संज्ञेचा त्याने उपयोगही केला. रशियन मार्क्सवादाच्या ऐतिहासिक विकासाच्या दृष्टीने केलेली सैद्धांतिक चर्चा त्याच्या सोशॅलिझम अँड पोलिटिकल स्ट्रगल (इं. शी. १८८३) आणि अवर डिफरन्सीस (१८८३, इं. भा.) या दोन आधीच्या ग्रंथांत आढळते. यांत प्ल्येखानॉव्हने आपल्या जुन्या साथीदारांवर टीका केली आहे : कृषी कम्यूनचा ऱ्हास आणि रशियन भांडवलशाहीचा उदय या दुहेरी वस्तुस्थितीकडे क्रांतिकारकांनी दुर्लक्ष केले, असा या टीकेचा रोख होता. द्विस्तरीय क्रांतीचे डावपेच या नव्या परिस्थितीत लढवणे शक्य होते. म्हणून प्रथम कामगार वर्ग व भांडवलदार यांनी झारशाहीच्या एकतंत्री कारभाराविरुद्ध उठाव केला आणि नंतर कामगारवर्गाने भांडवलदारांविरुद्ध उठाव करून समाजवादी क्रांती घडवून आणली. याशिवाय त्याने व्ही. ब्यिल्यीनस्कई आणि एन्. चेरनिशेव्हस्की या समकालीन लेखकांच्या ग्रंथांवर विस्तृत लेख लिहिले. त्याची सोशॅलिझम अँड पोलिटिकल ॲक्शन (१८८३, इं.भा.) व अनार्किझम अँड सोशॅलिझम (१८९५, इं. भा.) हीही पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्याच्या मृत्यूनंतर त्याचे समग्र वाड्‌मय २४ खंडांत प्रसिद्ध करण्यात आले (१९२३–२७). सोव्हिएट इतिहासकार रशियन मार्क्सवादाचा जनक म्हणून त्याचा उल्लेख करतात; पण पहिल्या महायुद्धकाळातील त्याची भूमिका व लेनिनबरोबरचा संघर्ष यांवर ते टीका करतात.

 

संदर्भ : 1. Baron, S. H. Plekhanov : The Father of Russian Marxism, London, 1971.

2. Haimson, L. H. The Russian Marxists and the Origins of Bolshevism, Cambridge (Mass.), 1955.

लेखक - सु. र. देशपांडे

स्त्रोत - मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 4/18/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate