অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

जोसेफ अ‍ॅडिसन

जोसेफ अ‍ॅडिसन

जोसेफ अॅडिसन : (१ मे १६७२ – १७ जून १७१९). इंग्रज निबंधकार आणि वृत्तपत्रकार. जन्म मिल्स्टन येथे. आरंभीचे काही शिक्षण लिच्‌फील्ड येथे तसेच ‘चार्टरहाउस’ या सुविख्यात शाळेत झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी तो ऑक्सफर्डला आला. तेथे त्याने लॅटिन भाषेवर असामान्य प्रभुत्व संपादन केले. एम. ए. झाल्यानंतर काही काळ ‘मॅग्‌डालीन कॉलेज’चा तो फेलो होता. त्याच्या लॅटिन काव्यरचनेने ड्रायडनचे लक्ष वेधून घेतले. विल्यम काँग्रीव्हशीही त्याची ओळख झाली आणि त्याच्यामार्फत सर जॉन सोमर्स आणि चार्ल्स माँटेग्यू या राजकारणी व्यक्तींशी त्याचा परिचय झाला. या दोघांच्या स्नेॉहामुळे महत्त्वाच्या अनेक सरकारी पदांवर काम करण्याची संधी त्याला मिळाली. तसेच राजनैतिक शिक्षणाच्या निमित्ताने त्यास इंग्लंुडबाहेरील अनेक यूरोपीय देशही पाहावयास मिळाले. १७०८ पासून तो ब्रिटिश संसदेचा सभासद होता. त्याची राजकीय मते ‘व्हिग’ पक्षाला अनुकूल होती. अॅडिसनने कविता आणि नाटके लिहिली असली, तरी निबंधकार आणि वृत्तपत्रकार म्हणूनच त्याची प्रतिमा नजरेत ठळकपणे भरते. त्याचा मित्र रिचर्ड स्टील (१६७२ – १७२९) याने काढलेल्या द टॅटलर(१७०९–११) या नियतकालिकात त्याने आपले निबंधलेखन प्रथम सुरू केले.

द टॅटलर बंद पडल्यावर अॅUडिसनने द स्पेक्टेटर हे स्वतःचे नियतकालिक सुरू केले (१७११). मनोरंजन करताकरता लोकशिक्षण साधणे, हा हेतू हे नियतकालिक काढण्यामागे होता. अॅनडिसनने द स्पेक्टेटरमधून राजकीय, सामाजिक, धार्मिक, वाङ्‌मयीन इ. विविध प्रकारच्या विषयांवर जिव्हाळ्याने लेखन केले. तसेच बुद्धिवादी व समन्वयवादी दृष्टिकोनातून सर्व प्रश्नांचा विचार करण्याची प्रेरणा दिली. द स्पेक्टेटर मधील ‘स्पेक्टेटर क्लब’ या सदरात अॅषडिसनने रेखाटलेल्या सर रॉजर डी कॉवुर्ली, कॅप्टन सेंट्री, अँड्रू फ्रीपोर्ट इ. संस्मरणीय व्यक्तिरेखा म्हणजे तत्कालीन इंग्रजी समाजातील व्यक्तींची प्रातिनिधिक चित्रेच होत. या व्यक्तिचित्रांच्या माध्यमातून तत्कालीन जीवनावर त्याने भाष्य केले आहे. ‘नियतकालिक निबंध’ हा नवा साहित्यप्रकार स्टीलच्या लेखनातून आकारास आला होता. या साहित्यप्रकारास आगळे आणि वेधक स्वरूप देऊन त्यास परिपूर्णतेस नेण्यात अॅाडिसनचा वाटा फार मोठा आहे. त्याच्या निबंधलेखनाने इंग्रजी गद्याच्या विकासास महत्त्वाचा हातभार लावला. खेळकर आणि सहजसुंदर भाषा हे त्याच्या निबंधांचे एक वैशिष्ट्य होते. त्या भाषेत कधी नर्मविनोद, तर कधी रुचेल इतपत उपहास आढळतो. त्याच्या काळाची वाङ्‌मयीन गरज त्याने समर्थपणे भागविली. त्याच्या आधीच्या पिढीला प्यूरिटन धर्मपंथीयांच्या दुराग्रही व नीरस जीवनदृष्टीचा छळवाद सोसावा लागला, तर त्याच्या पिढीला दुसऱ्या चार्ल्स राजाच्या नेतृत्वाखालील दरबारी व विद्याविभूषित मंडळींनी बुद्धिवादाच्या नावाखाली चालविलेला स्वैराचार पाहावा लागला. ही दोन्ही टोके टाळून मध्यम मार्गाने जाणे म्हणजेच बुद्धिवादी दृष्टिकोन स्वीकारणे होय, ही गोष्ट अॅरडिसनने प्रभावीपणे पटवून दिली. १७११ ते १७१२ पर्यंत द स्पेक्टेटरचे अंक निघत होते. १७१४ त त्याचे पुनरुजीवन करण्यात आले आणि त्याच वर्षी ते कायमचे बंद पडले. द गार्डियन, द लव्हर, द रीडर या नियतकालिकांतूनही त्याने निबंधलेखन केले.

कवी आणि नाटककार म्हणून अॅ डिसनचे कर्तृत्व विशेष लक्षात घेण्याजोगे नाही. तत्कालीन मुत्सद्दी आणि योद्धा मार्लबरो याने फ्रेंचांबरोबर केलेल्या ब्ले‍निमच्या लढाईतील यशाचे गुणगान करणारी द कँपेन (१७०४) ही अॅ डिसनची कविता त्या काळी थोडीफार प्रशंसिली गेली. त्याने लिहिलेल्या रॉझामंड (१७०७), केटो (१७१३) आणि द ड्रमर ऑर द हाँटेड हाउस (१७१६) या नाट्यकृतींपैकी केटोचा अपवाद वगळता एकही लोकप्रिय झाली नाही. केटोची लोकप्रियताही त्याच्या काळापलीकडे फारशी गेली नाही. लंडन येथे तो मरण पावला.

 

 

संदर्भ : 1. Aiken, Lucy, Life of Joseoh Addison, London, 1843.

2. Courthope, J. W. Addison, New York, 1884.

3. Lannering, Jan, Studies in the Prose Style of Joseph Addison, Cambridge (Massachusetts), 1952.

लेखक - वा. चिं. देवधर

स्त्रोत - मराठी विश्वकोश

 

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate