অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

टॉमस आल्वा एडिसन

टॉमस आल्वा एडिसन

(११ फेब्रुवारी १८४७ – १८ ऑक्टोबर १९३१). सुप्रसिद्ध अमेरिकन संशोधक. अनेक नव्या विद्युत्, प्रकाश व ध्वनी उपकरणांचे जनक. त्यांचा जन्म मिलान, ओहायओ येथे झाला. त्यांचे शिक्षण मिशिगनमधील पोर्ट ह्यूरन येथील शाळेत केवळ तीन महिनेच झाले होते. वयाच्या बाराव्या वर्षापासून रेल्वेत संदेशवाहकाचे व त्यानंतर पंधराव्या वर्षापासून निरनिराळ्या शहरांत तारायंत्रावर काम करून त्यांनी आपला चरितार्थ चालविला. फावल्या वेळात ते अभ्यासात व प्रयोगकार्यात निमग्न असत.

त नोंदविणाऱ्या त्यांच्या विद्युत् यंत्राकरिता १८६८ मध्ये त्यांना पहिले पेटंट मिळाले. त्यानंतरच्या काही वर्षांत त्यांनी एकाच तारेवर दोन वा अनेक संदेश एकाच वेळी वाहू शकणाऱ्या व स्वंयचलित तारायांत्रिक पद्धतीचा तसेच टंकलिखाणाच्या आवृत्त्या काढण्याकरिता विद्युत लेखणीचा (याचाच पुढे ‘मिमिओग्राफ’ या स्वरूपात विकास झाला) शोध लावला. कार्बन प्रेषकाचा (ध्वनितरंगांचे विद्युत् प्रवाहात रूपांतर करणार्‍या साधनाचा) शोध लावून (१८७७-७८) ग्रॅहॅम बेल यांचा दूरध्वनी व्यवहारोपयोगी करण्यास त्यांनी मदत केली.

एडिसन यांचा सर्वपरिचित व सर्वांत मूळचा शोध फोनोग्राफचा होय (१८७७). त्यांचा मूळचा नमुना हाताने फिरवावयाच्या टीनच्या पत्र्याच्या वृत्तचितीचा (नळकांड्याच्या आकाराचा) होता. दहा वर्षांनंतर त्यांनी मोटरने चालणारा व मेणाची वृत्तचितीकार तबकडी उपयोगात आणणारा फोनोग्राफ तयार केला. त्यानंतर त्यांनी, सांगितलेला मजकूर लिहून घेण्यास मदत करणारे ‘एडिफोन’ या कचेऱ्यांच्या कामकाजांस उपयुक्त असलेल्या उपकरणाचा शोध लावला. व्यवहारोपयोगी विजेचा उद्दीप्त (तापलेल्या तंतूपासून प्रकाश देणारा) दिवा तयार करण्यासाठी त्यांनी केलेले अनेक प्रयोग निष्फळ ठरले व त्यांकरिता त्यांना ४०,००० डॉलरपेक्षाही जास्त खर्च सोसावा लागला.

परंतु अखेरीस २१ ऑक्टोबर १८७९ रोजी काचेच्या निर्वात फुग्यात ठेवलेल्या कार्बनयुक्त कापसाच्या धाग्याचा उद्दीप्त दिवा तयार करण्यात त्यांना यश आले. नंतरच्या दहा वर्षांत त्यांनी विजेद्वारे प्रकाश, उष्णता व शक्ती यांच्या निर्मितीसाठी व वितरणासाठी तीन तारांच्या पद्धतीचा शोध लावला. विद्युत् जनित्र (डायनामो) व मोटर यांत सुधारणा केल्या आणि विद्युत् रेल्वेच्या विकासास मदत केली. १८९१–१९०० या काळात त्यांनी प्रामुख्याने लोह खनिजांची सांद्रता (दिलेल्या घनफळात असणारे खनिजाचे प्रमाण) चुंबकीय पद्धतीने वाढविण्यासंबंधी संशोधन केले. त्यानंतर त्यांनी शिशाच्या संचायक विद्युत् घटापेक्षा (विद्युत् भार साठवून ठेवणाऱ्या घटापेक्षा) बराच हलका असा एक नवीन प्रकारचा निकेल हायड्रेट (धन अग्र), आयर्न ऑक्साइड (ऋण अग्र) व पोटॅशियम हायड्रॉक्साइड (विद्राव) उपयोगात आणणारा संचायक विद्युत् घट तयार केला. १८९१ मध्ये त्यांनी प्राथमिक स्वरूपाच्या चलच्चित्रपट कॅमेऱ्याचे (किनेटोस्कोपिक कॅमेरा) व नंतर चलच्चित्रपट पडद्यावर दाखविणाऱ्या प्रक्षेपकाच्या पेटंटसाठी अर्ज केला.

उद्दीप्त दिव्याच्या गोलकामध्ये (हल्लीच्या इलेक्ट्रॉनीय नलिकेचे प्राथमिक स्वरूप) एक धन विद्युत् भारित धातूची पट्टी बसविल्यास दिव्यातील तप्त तंतूपासून (ऋण अग्र) धातूच्या पत्र्याकडे (धन अग्र) विद्युत प्रवाह वाहतो असा त्यांनी १८८३ मध्ये शोध लावला. यालाच एडिसन परिणाम म्हणतात. परंतु या शोधाचा काही व्यावहारिक उपयोग दिसून न आल्यामुळे त्यांनी त्यासंबंधी पुढे संशोधन केले नाही. १८८५ मध्ये त्यांनी चालत्या आगगाडीतून किंवा जहाजातून प्रवर्तनाने (विद्युत् चुंबकीय क्षेत्रात बदल होत असताना त्यात ठेवलेल्या संवाहकात विद्युत् वर्चस् किंवा विद्युत् प्रवाह निर्माण झाल्याने) तारायंत्र संदेश पाठविण्याच्या पद्धतीचे पेटंट मिळविले. पहिल्या महायुद्धकाळात त्यांनी अमेरिकन सरकारला नाविक प्रश्नांबाबत व फिनॉल आणि इतर रसायनांच्या निर्मितीसाठी मदत केली.

त्यांची १९२७ मध्ये नॅशनल अ‍ॅकॅडेमी ऑफ सायन्सेसच्या सदस्यत्वावर निवड होऊन पुढील वर्षीच अमेरिकन काँग्रेसतर्फे सुवर्णपदकाचा त्यांना बहुमान मिळाला. फ्रान्स, इटली व ग्रेट ब्रिटन या देशांकडूनही त्यांना अनेक सन्मान देण्यात आले. एडिसन यांनी प्रथमत: मेन्लो पार्क येथील व नंतर ऑरेंज, न्यू जर्सी येथील स्वत:च्या कर्मशाळेत व प्रयोगशाळेत निरनिराळे शोध लावण्यात ५० वर्षांहून अधिक काळ अविरतपणे काम केले व एप्रिल १९२८ पर्यंत त्यांनी १,०३३ पेटंटे मिळविली होती. ते ऑरेंज येथे मृत्यू पावले.


लेखक - व. ग. भदे

स्त्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 8/22/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate