অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

रने देकार्त

रने देकार्त

(३१ मार्च १५९६ - ११ फेब्रुवारी १६५०) आधुनिक तत्त्वज्ञानाचा जनक म्हणून देकार्त प्रसिद्ध आहे. तत्त्वज्ञानाप्रमाणेच गणितातही देकार्तने मौलिक भर घातली आहे. जन्म फ्रान्समध्ये तुरेन ह्या विभागातील ला हेग ह्या गावी. देकार्तचे वडील झोआकीम हे रेनच्या पार्लमेंटचे सभासद होते व उमरावांच्या कनिष्ठ श्रेणीत त्यांचा समावेश होत होता.

देकार्तच्या दोन्ही बाजूच्या (आई–वडिलांकडील) नातलगांत अनेक व्युत्पन्न पंडित व्यक्ती होत्या. ह्या सुसंस्कृत व व्यासंगाला अनुकूल अशा वातावरणात देकार्त वाढला. वयाच्या आठव्या वर्षी ला फ्लेश येथे जेझुइटांनी नव्यानेच स्थापन केलेल्या शाळेत त्याला पाठविण्यात आले.

ह्या शाळेविषयी व आपल्या शिक्षकांविषयी त्याच्या मनात नेहमीच ममतेचा भाव असे. येथे ग्रीक व लॅटिन भाषा, तर्कशास्त्र, नीतिशास्त्र, गणित, भौतिकी, तत्त्वमीमांसा ह्यांचा त्याने अभ्यास केला. १६१८ मध्ये नॅसॉच्या प्रिन्स मॉरिसच्या सैन्यात तत्कालीन प्रथेप्रमाणे स्वयंसेवक म्हणून तो दाखल झाला.

ह्या निमित्ताने त्याने जर्मनीत बराच प्रवास केला. १० नोव्हेंबर १६१९ च्या रात्री जर्मनीत उल्म येथे त्याला एक उत्कट, साक्षात्कारासारखा अनुभव आला; गूढ, अर्थपूर्ण स्वप्ने पडली. गणिताच्या पद्धतीवर निसर्गाचे एकसंध ज्ञान आधारता येईल आणि हे आपले जीवितकार्य आहे, असा ह्या साक्षात्काराचा आशय होता.

देकार्तचा पहिला ग्रंथ म्हणजे Regulae ad Directionem Ingilenii (म. शी. मनाच्या दिग्दर्शनाचे नियम) हा १६२८ च्या सुमारास रचण्यात आला; पण अपुराच राहिला. तो पुढे १७०१ मध्ये प्रसिद्ध झाला. प्रमाण ज्ञानाच्या पद्धतीविषयीचा हा ग्रंथ आहे. १६२८ तो १६४९ पर्यंत देकार्त हॉलंडमध्ये निवास करून होता. ह्या कालखंडात त्याने आपल्या तत्त्वज्ञानाचा विकास केला.

१६३४ पर्यंत त्याने Le Monde हा आपला वैज्ञानिक ग्रंथ पुरा करीत आणला; पण गॅलिलीओला झालेल्या शिक्षेची बातमी आल्यामुळे त्याने तो प्रसिद्ध होऊ दिलानाही. देकार्तची वृत्ती एकंदरीत सावध, भीरू आणि सत्ताधाऱ्‍यांशी जुळवून घेण्याची होती. १६३७ मध्ये गणित आणि भौतिकी ह्या विषयांवरील एक ग्रंथ त्याने प्रसिद्ध केला.

ह्या पुस्तकाची प्रस्तावना म्हणजेच Discours de la methode (म. शी. रीतिविषयक प्रबंध) हा सुप्रसिद्ध प्रबंध. हा फ्रेंच भाषेत लिहिलेला आहे आणि देकार्तच्या तात्त्विक दर्शनाच्या मूलभूत सिद्धांतांची त्याच्यात संक्षेपाने मांडणी केली आहे. १६४१ मध्ये त्याचा Meditationes de Prima Philosophia (म. शी. आद्य तत्त्वज्ञानावरील चिंतने) हा ग्रंथ प्रसिद्ध झाला. यात देकार्तच्या तत्त्वज्ञानावर इतर तत्त्ववेत्त्यांनी घेतलेले आक्षेप आणि त्यांना देकार्तने दिलेली उत्तरे यांचाही अंतर्भाव आहे. ह्यानंतर Principia Philosophiae (म. शी. तत्त्वज्ञानाची तत्त्वे) हा त्याचा ग्रंथ १६४४ मध्ये आणि Les Passions de I`ame (म. शी. आत्म्याच्या वासना) हा ग्रंथ १६४९ मध्ये प्रसिद्ध झाला.

स्वीडनची राणी क्रिस्टीना ही देकार्तची चाहती होती. तिच्या आग्रहाच्या निमंत्रणामुळे तिला तत्त्वज्ञान शिकविण्यासाठी देकार्त अनिच्छेने १६४९ मध्ये स्टॉकहोम येथे गेला; पण तेथील हवा आणि दिनचर्या न मानवल्यामुळे वर्षभरातच न्युमोनियाने आजारी पडून तेथेच त्याचे निधन झाले.

तत्त्वज्ञान

देकार्तला ज्ञानाची तर्कशुद्ध आणि भक्कम पायावर उभारणी करायची होती आणि प्रमाण ज्ञानात भर पडत राहील, अशी व्यवस्था लावून द्यायची होती. ह्यासाठी त्याने स्वीकारलेल्या पद्धतीचे स्वरूप Discours de la methode ह्या ग्रंथात त्याने स्पष्ट केले आहे. ही पद्धत पुढील चार नियमांवर आधारलेली आहे :

(१) जे सत्य आहे अशी ज्याची स्पष्टपणे ओळख पटलेली नाही, अशा कशाचाही सत्य म्हणून स्वीकार करायचा नाही.

(२) कोणत्याही समस्येचे, ती सोडविण्यासाठी तिचे जितक्या भागांत विश्लेषण करणे आवश्यक असेल, तितक्या भागांत विश्लेषण करायचे.

(३) विचार योग्य त्या क्रमाने करायचा; म्हणजे प्रथम साध्या समस्या सोडवून मग क्रमाने अधिकाधिक मिश्र समस्यांना हात घालायचा.

(४) समस्येचा सर्वांगीण परामर्ष घ्यायचा; तिचे कोणतेही अंग विचारातून निसटणार नाही अशी खबरदारी घ्यायची.

देकार्तच्या उद्दिष्टांना आणि पद्धतीला एक ऐतिहासिक संदर्भ आहे. परंपरेने प्राप्त झालेले जे मध्ययुगीन ज्ञान होते, त्याच्यात अ‍ॅरिस्टॉटलच्या तत्त्वज्ञानावर आणि ख्रिस्ती धर्मशास्त्रावर आधारलेल्या स्कोलॅस्टिक तत्त्वज्ञान, गणित, अ‍ॅरिस्टॉटलच्या सिद्धांतावर आधारलेली भौतिकी, इतिहास आणि दंतकथा ह्यांचे एक विचित्र मिश्रण इ. अनेक गोष्टींचा अंतर्भाव होता आणि हे ज्ञान परंपरेने प्राप्त झाले होते म्हणून प्रमाण मानण्यात येत होते. त्याच्याकडे पाठ फिरवून देकार्तला ज्ञानाच्या क्षेत्रात नव्याने सुरुवात करायची होती आणि ज्या बुद्धीला स्पष्टपणे प्रमाण म्हणून प्रतीत होतील, अशा गोष्टींचाच ज्ञान म्हणून स्वीकार करायचा होता. देकार्तने पुरस्कारलेली वरील पद्धती ही विश्लेषक पद्धती आहे व ती गणिती,

उदा., भूमितीत वापरली जाणारी, पद्धती आहे. भूमितीत जेव्हा एखादी नवीन समस्या सोडवायची असते तेव्हा तिचे विश्लेषण करण्यात येते; उदा., त्या समस्येत नेमके काय काय दिलेले आहे, नेमके काय सिद्ध करायचे आहे, जे दिलेले आहे त्यापासून काय निष्पन्न होते आणि त्याचा व जे सिद्ध करायचे आहे त्याचा कसा कसा संबंध पोहोचू शकेल, असा विचार आपण करतो. देकार्तने पुरस्कारिलेली पद्धत ही अशी विश्लेषक पद्धत आहे आणि नवीन प्रमाण ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी जिचा अवलंब करावा, अशी ती पद्धत आहे.

उलट भूमितीत जे प्रमाण ज्ञान अगोदरच अवगत असते ते मांडण्यासाठी संश्लेषक पद्धतीचा वापर करतात. म्हणजे स्वतःप्रमाणे अशा स्वयंसिद्धकांपासून प्रमाण पायऱ्‍यांनी सिद्धांत कसे निष्पन्न होतात, हे दाखवून देतात.

आपल्या पद्धतीचावापर करून सर्वच क्षेत्रांतील ज्ञान–उदा., भौतिक जगाचे, मनांचे, ईश्वराचे इ.–प्राप्त करून घेता येईल असा देकार्तचा विश्वास होता. तत्त्वमीमांसा आणि विज्ञान तसेच भौतिकी, जीवशास्त्र इ. विविध विज्ञाने ह्यांच्यात तो भेद करीत नव्हता. विश्व एकसंध आहे आणि म्हणून ज्ञान एकसंध असले पाहिजे आणि प्रमाण ज्ञानाची पद्धतीही एकच असली पाहिजे, अशी ही भूमिका होती. ही पद्धती म्हणजे निगमनाची पद्धती.

बुद्धीला स्वच्छपणे, स्पष्टपणे आणि असंदिग्धपणे प्रतीत झालेल्या विधानांपासून तितक्याच स्पष्टपणे आणि असंदिग्धपणे निष्पन्न होणारी विधाने प्राप्त करून घेऊन ज्ञानाचा विकास केला पाहिजे. तेव्हा देकार्त  विवेकवादी होता. अनुभवाला, निरीक्षणाला ज्ञानाच्या ह्या रीतीत स्थान नव्हते. विवेकाला प्रतीत होणारी ही विधाने ज्या संकल्पनांविषयी असतात, त्या संकल्पनाही मनाला अनुभवापासून प्राप्त झालेल्या नसतात; त्या मनातच उपजत असतात. त्या काळी उदयाला येत असलेल्या गॅलिलीओ इत्यादिकांच्या गणिती भौतिकीमुळे देकार्तचा गणिती पद्धतीवरील विश्वास दृढावला असणार.

ह्या पद्धतीप्रमाणे बुद्धीला संशयातीतपणे सत्य म्हणून प्रतीत होणारी विधाने पायाभूत असतात आणि त्यांच्यापासून संशयातीतपणे प्रमाण असलेल्या पायऱ्यांनी निष्पन्न होणारी विधाने प्राप्त करून घेऊन आपण ज्ञानाची रचना करतो. अशी निश्चितपणे सत्य असलेली विधाने शोधून काढण्यासाठी देकार्त संशयाच्या रीतीचा पद्धतशीरपणे अवलंब करतो.

ही पद्धती अशी, की ज्या ज्या विधानाच्या सत्यतेविषयी संशय घेता येईल, ती ती विधाने ताप्तुरती ज्ञानाच्या प्रांतातून वर्ज्य करायची आणि ज्यांच्या सत्यतेविषयी संशय घेताच येत नसेल, केवळ अशीच विधाने प्रमाण ज्ञान म्हणून स्वीकारायची. ह्या पद्धतीचा अवलंब केला असता देकार्तला पुढील प्रकारांची विधाने संशयास्पद आहेत असे आढळून आले :

(१) बाह्य, भौतिक वस्तूंच्या अस्तित्वाविषयीची विधाने. हे समोर जे टेबल दिसते ते आहे असे मी मानतो; पण मला भास होत असेल किंवा मी स्वप्नात असेन व म्हणून ह्या टेबलाचे तसेच कोणत्याही भौतिक वस्तूचे–माझे शरीर धरून कोणत्याही भौतिक वस्तूचे–अस्तित्व संशयास्पद आहे.

(२) भूतकालाविषयीची विधाने. ही स्मृतीवर आधारलेली असतात; पण आपली स्मृती आपल्याला अनेकदा फसविते.

(३) ईश्वराच्या अस्तित्वाविषयीचे विधान.

(४) गणिती विधाने. गणिताची स्वयंसिद्धके आपण प्रमाण म्हणून स्वीकारतो; कारण त्यांचे आकलन झाले, की ती सत्य असणारच असे आपल्याला स्पष्टपणे दिसून येते. पण देकार्तचा युक्तिवाद असा, की जे सत्य नाही तेही आपल्या बुद्धीला सत्य आहे असे भासू शकेल. समजा एखाद्या दुष्ट दैत्याने माझ्या बुद्धीची घडण अशी केली आहे, की जे वस्तुतः असत्य आहे ते तिला सत्य असे भासते. मग गणिताची स्वयंसिद्धके सत्य आहेत असे जरी माझ्या बुद्धीला दिसत असले, तरी ती वस्तुतः असत्य असतील.

पण ज्याच्या सत्यतेविषयी संशय घ्यायला अवसरच नसतो असे एक विधान संशयातीतपणे सत्य आहे, असे देकार्तला आढळून आले. ते म्हणजे ‘मी आहेʼहे विधान. कारण जरी मी स्वतःच्या अस्तित्वाविषयी संशय घेतला, तरी मी संशय घेत आहे ही गोष्ट संशयातीतपणे सत्य आहे आणि मी संशय घेतो हे जर संशतातीत असेल, तर मी आहे हेही संशयातीत असणार. आता संशय घेणे म्हणजे एक प्रकारचा विचार करणे.

तेव्हा देकार्तचा युक्तिवाद असा मांडता येईल : ‘मी विचार करतो ∴ मी आहेʼ. ‘विचारʼ हा शब्द येथे अत्यंत व्यापक अर्थाने वापरला आहे. समजा, मला टेबल दिसते आहे, पण तो भ्रम आहे. तेव्हा ते टेबल तेथे नाही; पण मला भ्रम होत आहे, म्हणजे मला कशाची तरी (जे अस्तित्वात नाही त्याची) जाणीव होत आहे हे संशयातीत आहे. ʼविचारʼ हा शब्द साक्षात जाणिवेचे कोणतेही रूप ह्या अर्थाने येथे वापरण्यात आला आहे. ‘मी विचार करतो.म्हणून मी आहेʼ हा देकार्तचा युक्तिवाद लॅटिनमध्ये ‘कॉजिटो, एर्गो सुमʼ असा मांडण्यात आला होता आणि देकार्तचा ‘कॉजिटोʼ म्हणून तो प्रसिद्ध आहे.

‘कॉजिटोʼ विषयीचा एक महत्त्वाचा प्रश्न असा, की त्याच्यात एक अनुमान मांडण्यात आले आहे की नाही?देकार्तचे म्हणणे एकंदरीत असे दिसते, की त्याच्यात संवाक्याच्या स्वरूपाचे अनुमान मांडण्यात आलेले नाही. म्हणजे सर्व विचार करणाऱ्‍यांना अस्तित्व असते; मी विचार करणारा आहे;∴ मी अस्तित्वात आहेʼ, ह्या स्वरूपाचे ते अनुमान नाही. त्याची संशयातीत सत्यता मनाला साक्षात प्रतीत होते. आता ‘कॉजिटोʼ पासून मी विचार करतो∴ मी आहे; यापासून देकार्त पुढील निष्कर्ष काढतो :

(१) हा जो ‘मीʼ आहे, ज्याचे अस्तित्व त्याच्या विचार करण्यापासून (त्याला जाणीव असण्यापासूनच) सिद्ध करण्यात आले आहे, तो ‘मीʼ म्हणजे विचार करणे (जाणीव असणे) हे ज्याच्या स्वरूपाचे सार आहे असे अस्तित्व किंवा द्रव्य आहे. म्हणजे जाणीव हे आत्म्याच्या किंवा मनाच्या स्वरूपाचे सार आहे. आणि ‘मी आहेʼ असे जे सिद्ध करण्यात आले आहे, त्यात निर्देश केलेला मी म्हणजे एक आत्मा किंवा मन आहे.

आता मी जेव्हा माझा निर्देश करतो तेव्हा सामान्यपणे ह्या निर्देशात माझ्या शरीराचाही निर्देश असतो. उदा., ‘मला हातपाय आहेत, मी उंच आहेʼ इत्यादी. ही माझी वर्णने अर्थात माझ्या शरीराची आहेत. आता मी विचार करतो ही गोष्ट संशयातीत आहे. तेव्हा विचार करणारा किंवा एक आत्मा किंवा मन म्हणून माझे अस्तित्व संशयातीतपणे सिद्ध होते, तसे माझ्या शरीराचे अस्तित्व संशयातीतपणे सिद्ध होत नाही. मला शरीर आहे असे प्रत्यक्षज्ञान मला आहे, हे खरे आहे; पण तो भास असू शकेल. मला शरीर नसणे शक्य आहे.

ह्यापासून देकार्त असा निष्कर्ष काढतो, की मन आणि शरीर ही दोन भिन्न द्रव्ये आहेत. द्रव्य म्हणजे ज्याचे एक विशिष्ट स्वरूप असते असे अस्तित्व. जाणीव हे जसे मनाच्या स्वरूपाचे सार किंवा सत्त्वअसते त्याप्रमाणे विस्तार हे शरीराच्या स्वरूपाचे सार असते.

‘सारʼ ही संकल्पना अ‍ॅरिस्टॉटलची आहे. एखाद्या विशिष्ट प्रकारच्या वस्तूचे सार म्हणजे जे धर्म अंगी असल्यामुळे वस्तू त्या विशिष्ट प्रकारची वस्तू आहे असे ठरते, ते धर्म; उदा., तीन रेषांनी बंदिस्त असणे, हे त्रिकोणाचे सार आहे. ह्यापासून देकार्त असा निष्कर्ष काढतो, की (ईश्वर वगळला तर) विश्वात दोन भिन्न स्वरूपाची द्रव्ये आहेत. जाणीव हे ज्यांच्या स्वरूपाचे सार आहे, अशी मने आणि विस्तार हे ज्यांच्या स्वरूपाचे सार आहे, असे जडद्रव्य.

शरीर हे जडद्रव्यात मोडते. ही परस्परांहून पूर्णपणे भिन्न प्रकारची अशी द्रव्ये आहेत आणि कोणतेही निर्मित द्रव्य ह्या दोहोंतील एका प्रकारचे असते. ही दोन द्रव्ये पूर्णपणे भिन्न प्रकारची आहेत. ह्यापासून असे निष्पन्न होते, की एका प्रकारच्या द्रव्याच्या अंगी दुसऱ्‍या प्रकारच्या द्रव्याचा सारभूत धर्म असू शकत नाही.

उदा., मनाच्या ठिकाणी विस्तार इ. जडद्रव्याचा धर्म असू शकत नाही किंवा जडद्रव्याच्या ठिकाणी जाणीव हा धर्म असू शकत नाही. ज्याच्या ठिकाणी जाणीव आहे असे द्रव्य, ज्याच्या ठिकाणी विस्तार आहे अशा द्रव्याहून, भिन्न असणे अनिवार्य असते;म्हणजे ही दोन द्रव्ये अनिवार्यतेने भिन्न असलेली द्रव्ये असतात. आता माणसाला शरीर असते आणि मन असते.

‘मला दुःख झाले आहेʼ आणि ‘मी उंच आहेʼ ही दोन्ही विधाने माझ्याविषयी सत्य असणे शक्य आहे. पण ज्याला दुःख झाले असते तो मी आणि जो उंच आहे तो मी, हे पूर्ण वेगवेगळे मी असतात. तेव्हा माणूस हे एक द्रव्य नसते; मन आणि शरीर (जडद्रव्य) यांची ती युती असते.

मन आणि जडद्रव्य अशी दोनच भिन्न प्रकारची द्रव्ये आहेत, असे देकार्त ज्याप्रमाणे मानतो त्याप्रमाणे वस्तूंच्या ठिकाणी जे सर्व वेगवेगळे धर्म आढळतात,ते जाणीव आणि विस्तार ह्या दोन सारधर्मांचे प्रकार असतात, असेही तो मानतो. भावना, इच्छा, संवेदन इ. जाणिवेचे वेगवेगळे प्रकार आहेत तसेच गती, स्थिती इ. विस्ताराचे प्रकार आहेत. ज्याच्या ठिकाणी विस्तार आहे त्यालाच गती असू शकते.

देकार्तने आपल्या मनाचे संशयातीत अस्तित्व सिद्ध केले; पण बाह्य जगाचे, जडवस्तूंचे अस्तित्व सिद्ध करायचे उरले होते. हे तो ईश्वराचे अस्तित्व प्रथम सिद्ध करून त्याच्या साहाय्याने करतो. ईश्वराचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी देकार्तने योजिलेले युक्तिवाद असे :

(१) माझ्या मनात ईश्वराची, म्हणजे परिपूर्ण अशा अस्तित्वाची, कल्पना आहे. ही गोष्ट नाकारता येणार नाही; कारण मी अपूर्ण आहे, हे मला माहीत आहे आणि परिपूर्ण अशा अस्तित्वाची कल्पना असल्याशिवाय मी अपूर्ण आहे, हे ज्ञान मला होणार नाही. आता जे काही अस्तित्वात आहे, ते अस्तित्वात असण्यासाठी पुरेसे कारण असले पाहिजे. म्हणजे परिणामाच्या ठिकाणी जेवढी सत्ता असते निदान तेवढी सत्ता कारणांच्या ठिकाणी असली पाहिजे. कल्पनांना जेव्हा आपण हे तत्त्व लावतो तेव्हा त्याचे स्वरूप असे राहिल : कल्पना ही मनात असते, मनाचा तो एक विकार असतो.

पण कल्पनेला विषय असतो, ती कशाची तरी कल्पना असते. तेव्हा कल्पनेचे जे पुरेसे कारण असेल, त्याच्या ठिकाणी त्या कल्पनेत मनोविकार म्हणून जेवढी सत्ता किंवा पूर्णता असेल तेवढी तर असली पाहिजेच; पण शिवाय अमूक एका वस्तूची ती कल्पना आहे, ह्या तिच्या विशेषात जेवढी पूर्णता असेल, तेवढी तरी पूर्णता त्या कारणाच्या ठिकाणी असली पाहिजे. आता परिपूर्ण अशा अस्तित्वाच्या कल्पनेचे अपूर्ण माणूस हा कारण असू शकणार नाही. परिपूर्ण अस्तित्वच ह्या कल्पनेचे कारण असू शकेल. तेव्हा परिपूर्ण असे अस्तित्व किंवा ईश्वर आहे.

(२) दुसरा युक्तिवाद असा : मी आहे; पण मी माझ्या अस्तित्वाचे कारण नाही. कारण विचार करणारे द्रव्य आहे असे माझे स्वरूप आहे आणि असे द्रव्य निर्माण करण्याइतकी पूर्णता माझ्या अंगी असती, तर मी आहे त्यापेक्षा मला अधिक पूर्ण बनविले असते. माझ्या अस्तित्वाला कारणच नाही. अनंत कालापासून मी अस्तित्वात आहे, असेही म्हणता येत नाही. कारण द्रव्याच्या निर्मितीलाच कारण लागते असे नाही; द्रव्याचे अस्तित्व टिकवून धरायलाही कारण लागते. तसेच केवळ माझे आईबाप हे माझ्या अस्तित्वाचे कारण असू शकत नाही; कारण तेही अपूर्ण आहेत. तेव्हा परिपूर्ण असा पदार्थ म्हणजे ईश्वर, हे माझ्या अस्तित्वाचे कारण असले पाहिजे.

(३) परिपूर्ण अशा पदार्थाची मला कल्पना आहे. परिपूर्ण पदार्थ म्हणजे ज्याच्या अंगी सर्व पूर्णत्वे–सर्व गुण–आहेत असा पदार्थ. आता अस्तित्व हे एक पूर्णत्व आहे. परिपूर्ण पदार्थाच्या अंगी जर अस्तित्व नसेल, तर ती एक उणीव ठरेल; तो पदार्थ परिपूर्ण असणार नाही. तेव्हा परिपूर्ण पदार्थाला अनिवार्यतेने अस्तित्व असते. तेव्हा ईश्वर आहे.

देकार्तची ईश्वराविषयीची संकल्पना दुहेरी आहे. एकतर ईश्वर हा परिपूर्ण असा पदार्थ आहे. शिवाय ईश्वर आत्मकारण आहे. ईश्वराचे अस्तित्व केवळ त्याच्या स्वतःपासून निष्पन्न होते आणि इतर सर्व द्रव्यांचे अस्तित्व ईश्वरापासून निष्पन्न होते. बाह्य जगाच्या अस्तित्वाचे प्रमाण देकार्त ईश्वराच्या परिपूर्णतेवर आधारतो. आपल्या मनात वेदने, संवेदने इ. मनोविकार, मनाच्या स्थिती असतात. त्यांना अनुरूप असे बाह्य जडपदार्थ अस्तित्वात असणार, हा विश्वास दृढपणे बाळगण्याची आपली स्वाभाविक प्रवृत्ती असते.

पण असे बाह्य पदार्थ जर खरोखर अस्तित्वात नसतील, तर ही आपली स्वाभाविक प्रवृत्ती आपली फसवणूक करते असे होईल आणि आपल्या मनाची घडण ईश्वराने केली असल्यामुळे ईश्वर ह्या फसवणुकीला जबाबदार ठरेल. पण असे असणे अशक्य आहे. तेव्हा आपल्या वेदनांशी अनुरूप असे बाह्य पदार्थ अस्तित्वातअसतात असे जे आपण स्वाभाविकपणे मानतो, ते सत्य असले पाहिजे. म्हणजे बाह्य पदार्थांना अस्तित्वअसले पाहिजे.

देकार्तच्या सिद्धांताप्रमाणे विस्तार हा जडवस्तूचा सारधर्म आहे. पण आपण केवळ अवकाश घेतला, तर त्याचाही विस्तार हा धर्म असतो. म्हणजेच जेथे जेथे विस्तार आहे तेथे तेथे अवकाश आहे व तेथे तेथे जडद्रव्यही आहे. ह्याचा अर्थ असा होतो, की सबंध अवकाशात जडद्रव्य ओतप्रोत व सातत्याने भरलेले असते; रिक्त पोकळी असे काही नसते. ह्यामुळे एक जडवस्तू दुसरीपासून वेगळी करता येत नाही. कारण अशा दोन जडवस्तू आपण कल्पिल्या, तर त्यांना सांधणारे जडद्रव्य त्या दोहोंमध्ये सातत्याने असते.

जडद्रव्याच्या स्वरूपाविषयीच्या ह्या संकल्पनेमुळे देकार्तपुढे अनेक अडचणी निर्माण झाल्या, पण तरीही देकार्तचे सिद्धांत विज्ञानाच्या प्रगतीला उपकारक ठरले. विस्तार हा जडद्रव्याचा सारधर्म असल्यामुळे आणि जडद्रव्याचे इतर धर्म म्हणजे गती, स्थिती इ. ह्या सारधर्मांचे प्रकार असल्यामुळे जडद्रव्याचे स्वरूप, त्याला घडणाऱ्‍या घटना ह्यांचे वर्णन केवळ गणिताच्या–भूमितीच्या–संकल्पना वापरून करता येते. जडवस्तूंचे जेव्हा आपण संवेदन करतो, तेव्हा रंग, स्वाद इ. जे गुण त्यांच्या ठिकाणी आपल्याला आढळतात, ते त्यांचे सारधर्म नसतात किंवा सारधर्मांचे प्रकार नसतात. आपल्या बुद्धीला जडद्रव्याचा सारधर्म म्हणून ज्या धर्माचे–विस्ताराचे–आकलन होते त्याच्यापासून निगमनाने त्याचे इतर सर्व धर्म निष्पन्न करून घेतले पाहिजेत.

देकार्तच्या मताप्रमाणे माणूस म्हणजे आत्मा किंवा मन आणि शरीर ह्यांची युती असते, हे आपण पाहिले आहेच. प्राण्यांना आत्मा नसतो, जाणीव नसते. त्यांची शरीरे म्हणजे जडद्रव्ये असल्यामुळे ती केवळ यंत्रासारखी असतात. त्यांच्या सर्व शारीरिक क्रिया, हालचाली केवळ भौतिकीच्या नियमांना अनुसरून होत असतात, असे तो मानीत असे.

म्हणजे जीवशास्त्र हे केवळ भौतिकीवर आधारलेले असते, ह्या मताचा तो पुरस्कर्ता होता. पण माणसाच्या बाबतीत मात्र त्याचा आत्मा आणि त्याचे शरीर परस्परांवर कार्ये करतात, माणसाची इच्छाशक्ती त्याच्या शारीरिक कृतींना दिशा देते आणि बाह्य पदार्थ इंद्रियांवर कार्ये करून मनात वेदने निर्माण करतात, असे तो मानीत असे. पण आत्मा आणि शरीर ही जर पूर्णपणे भिन्न प्रकारची द्रव्ये असतील, तर त्यांच्यामध्ये हा परस्परसंबंध कसा काय शक्य होता, हा एक कूटप्रश्नच आहे.

देकार्तला आधुनिक तत्त्वज्ञानाचा जनक म्हणणे सार्थ ठरावे इतका त्याचा प्रभाव त्याच्या नंतरच्या तत्त्वज्ञानावर पडला आहे. प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या जाणिवेचे, आंतरिक अनुभवांचे साक्षात ज्ञान असते; पण ह्यांव्यतिरिक्त ज्या पदार्थांचे ज्ञान आपल्याला असते असे आपण व्यवहारात मानतो–उदा., बाह्य पदार्थांचे–त्यांचे ज्ञान आपल्याला कसे शक्य होते, हा देकार्तने उपस्थित केलेला प्रश्नच त्याच्या नंतरच्या तत्त्वज्ञानाचा मध्यवर्ती प्रश्न ठरला आहे.

लॉक, बर्क्ली, ह्यूम ह्या ⇨ अनुभववादीतत्त्ववेत्त्यांनी ह्या प्रश्नाचे उत्तर द्यायचा प्रयत्न केला आहे. देकार्तने अशा रीतीने तत्त्वज्ञानाला ज्ञानशास्त्रीय वळण दिले. त्याचप्रमाणे शरीर व मन यांचा परस्परसंबंध नेमका काय आहे, ह्या देकार्तने उपस्थित केलेल्या दुसऱ्‍या प्रश्नाचा ऊहापोह तत्त्वज्ञानात आजही चालू आहे.

वैश्लेषिक भूमितीची निर्मिती हे देकार्तचे गणितातील सर्वांत महत्त्वाचे कार्य होय. बीजगणितामध्ये a, b, c; x, y, z ही अक्षरे वापरण्याची सुरुवात देकार्तनेच केली. त्यापूर्वी बीजगणितातील समस्या शब्दांमध्येच मांडल्या जात असत. वर्ग, घन वगैरे शब्दांऐवजी शिरांक लिहिण्याची पद्धत त्याने रूढ केली. त्यामुळे x, x2, x3 हे एकाच प्रकारच्या मानाचे आहेत ही संकल्पना स्पष्ट झाली. बीजगणित वभूमिती यांची सांगड घालताना बीजगणितातील पायाभूत कृत्ये (बेरीज, वजाबाकी, गुणाकार इ.) भूमितीत कशी करावयाची हे त्यानेच दाखवून दिले. बीजगणिताचे मूलभूत प्रमेय त्याने अंतःप्रज्ञ विगमनाने सिद्ध करून दाखविले. समीकरणांच्या उपपत्तीत त्याने नवी भर घातली. समीकरणाच्या धन व ऋण निर्वाहांची (समीकरण सोडवून मिळणाऱ्‍या उत्तरांची) संख्या ठरविणारा नियम त्याच्याच नावाने प्रसिद्ध आहे. चतुर्थ घाताचे समीकरण सोडविण्याची एक पद्धत त्याने शोधून काढली.

प्रकाशकीमध्ये भिंगांचा अभ्यास तसेच परावर्तन व प्रणमन (एका माध्यमातून दुसऱ्‍या माध्यमात जाताना प्रकाशकिरणाच्या दिशेत होणारा बदल) यांच्या नियमांचे गणितीय विश्लेषण यांविषयीचे देकार्तचे संशोधन मौलिक स्वरूपाचे होते.

Meteores या त्याच्या ग्रंथामध्ये इंद्रधनुष्याचे गणितीय विश्लेषण दिलेले आढळते. त्याने शरीरक्रिया विज्ञानातही बरेच संशोधन आणि लेखन केलेले होते. शरीरक्रियाविज्ञानाचा अभ्यास त्याने आपल्या तत्त्वज्ञानाचा एक अंगभूत भाग म्हणून केला. शरीरक्रियाविज्ञानातील त्याच्या विचारांचा प्रभाव सतराव्या शतकातील रिजिअससारख्या प्रख्यात शास्त्रज्ञावरही पडलेला होता.विज्ञानाच्या सर्व शाखांमध्ये गणितीय पद्धतींचा वापर करण्यावर देकार्तचा विशेष भर होता.


लेखक - स. ज. ओक/ मे. पुं. रेगे

संदर्भ : 1. Anscombe, G. E. M.; Trans. Geach, P. T. Descartes : Philosophical Writing, Edinburgh, 1954.

2. Smith. N. K. New Studies in the Philosophy of Descartes, London, 1952.

3. Smith, N. K. Studies in the Cartesian Philosophy, London, 1902.

४. देकार्तरने; अनु. देशपांडे, दि. य. चिंतने–देकार्त, मुंबई, १९७४.

स्त्रोत -मराठी विश्वकोश

 

अंतिम सुधारित : 12/5/2019



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate