অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

शार्ल एमील पीकार

शार्ल एमील पीकार

शार्ल एमील पीकार : (२४ जूलै १८५६ – १२ डिंसेबर १९४१). फ्रेंच गणितज्ञ. गणितीय विश्लेषण, बैजिक भूमिती  आणि अवकल समीकरणे या विषयांतील कार्याकरिता विशेष प्रसिध्द. त्यांनी मांडलेल्या सिध्दांतांमुळे बैजिक भूमितीतील संशोधनात महत्त्वपूर्ण प्रगती झाली. त्यांचा  जन्म पॅरिस येथे झाला. पॅरिस येथील एकोल नॉर्मल सुपिरिअर या संस्थेतून डॉक्टरेट पदवी मिळविल्यावर आणि तेथेच १८७७-७८ मध्ये साहाय्यक म्हणून काम केल्यानंतर १८७९ मध्ये तूलूझ विद्यापीठात प्राध्यापकपदावर त्यांची नेमणूक झाली.१८८१ – ९८ या काळात पॅरिस विद्यापीठात (सॉंरबॉंन येथील ) व एकोल नॉर्मल सुपिरीअरमध्ये विविध पदांवर काम केल्यानंतर १८९८ मध्ये ते पॅरिस विद्यापीठात प्राध्यापक झाले. १८८९ मध्ये अँकॅडेमी ऑफ सायन्सेसचे सदस्य म्हणून त्यांची निवड झाली आणि १९१७ पासून ते मृत्यूपावेतो त्यांनी अँकॅडेमीच्या गणितीय शास्त्र विभागाचे कायम सचिव म्हणून काम केले. उत्तम शिक्षक म्हणून त्यांची अतिशय ख्याती होती.

पीकार यांनी १८७८ मध्ये अवकल समीकरणांचे समाकल काढण्याच्या उपसादन पध्दतीचा  अभ्यास केला आणि पुढे त्यांनी व त्यांच्या नंतरच्या गणितज्ञांनी या पध्दतीचा सदसत् चलांच्या समीकरणांसाठी, समाकल समीकरणांसाठी  व इतर अनेक प्रकारच्या समीकरणांसाठी विस्तार केला. एव्हरीस्त गाल्वा यांच्या बैजिक समीकरण सिध्दांताशी  सदृश असा एकघाती अवकल समीकरणांसंबंधीचा सिद्धांत पीकार यांनी मांडला. अशा समीकरणाकरिता रुपांतरण गट त्यांनी मिळविला व हा गट पीकार गट म्हणूनच ओळखला जातो.फुशीयन (एल्. फुक्स यांच्या नावाने ओळखण्यात येणाऱ्या) व आबेलीयन (एन्. एच्. आबेल यांच्या नावाने ओळखण्यात येणाऱ्या) फलनांचा आणि त्यांच्याशी संबंधित असलेल्या असंतत (खंडित) व संतत रुपांतरण गटांविषयीचे सिध्दांत यांचा अभ्यास करुन पीकार यांनी त्यांच्या नावाने ओळखण्यात येणाऱ्या व बैजिक भूमितीत मूलभूत महत्त्वाच्या ठरलेल्या बैजिक समुच्चयाचा शोध लावला. १८७९ मध्ये त्यांनी सदसत् चलांचे फलन एखाद्या अपवादात्मक मूल्याखेरीज  प्रत्येक सांत मूल्य धारण करु शकते, हे महत्त्वाचे प्रमेय मांडले. त्यांच्याच नावाने ओळखण्यात येणाऱ्या या प्रमेयामुळे नियमित वैश्लेषिक फलनांचे वर्गीकरण करण्यास व इतर संबंधित संशोधनास चालना मिळाली.

बैजिक पृष्ठभागांशी संबंधित असलेल्या समाकलांविषयी व आनुषंगिक संस्थितिवैज्ञानिक प्रश्नांच्या त्यांनी केलेल्या अभ्यासामुळे बैजिक भूमितीच्या एका महत्त्वपूर्ण शाखेचा उदय झाला. या शाखेचा पुढे संस्थितिविज्ञानात व फलन सिध्दांतात विविध प्रकारे उपयोग झाला.इ. स. १९२४ मध्ये पीकार यांची फ्रेंच अँकॅडेमीचे सदस्य म्हणून निवड झाली. १९३२ मध्ये त्यांना ग्रँड क्रॉस ऑफ द लिजन ऑफ ऑनर हा सन्मान मिळाला. स्वीडिश अँकॅडेमी ऑफ सायन्सेसने त्यांना १९३७ मध्ये मिट्टाग-लफ्लर सुवर्णपदक दिले. परदेशातील पाच विद्यापीठांनी त्यांना सन्माननीय डॉक्टरेट पदव्या दिल्या. ते अनेक शैक्षणिक संस्थांचे आणि संघटनांचे सदस्य होते. त्यांनी लिहिलेल्या ग्रंथांपैकी Trait d’ analyse (१८९१–९६), Theorie des fonctions algebriques de deux variables independantes ( जी. सिमार्त यांच्या समवेत, १८९७–१९०६), Equations fonctionelles (१९२९) आणि Quelques applications analytiques de la theorie des courbes et des surfaces algebriques (१९३१) हे महत्वाचे गणले जातात. त्यांनी विज्ञानाचा इतिहास व तत्वज्ञान या विषयी La science moderne et son etat actuel (१९०५) हा ग्रंथ लिहीला. ते पॅरिस येथे मृत्यू पावले.

 

लेखक - वि. ल. सूर्यवंशी

स्त्रोत - मराठी विश्वकोश

 

अंतिम सुधारित : 4/14/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate