অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

टाउसिग, फ्रँक विल्यम

टाउसिग, फ्रँक विल्यम

(२८ डिसेंबर १८५९–११ नोव्हेंबर १९४०). सुविख्यात अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ. जन्म सेंट लूइस, मिसूरी येथे. हार्व्हर्ड विद्यापीठातून पदवी (१८७९). पुढे वर्षभर यूरोपमध्ये भ्रमंती. बर्लिन येथे काही काळ रोमन विधी व अर्थशास्त्र ह्यांचे अध्ययन. हार्व्हर्डला परतून ‘हार्व्हर्ड लॉ स्कूल’ मध्ये नाव घातले. हार्व्हर्ड विद्यापीठाचे अध्यक्ष एलियट यांचा तो सचिव होता. १८८३ मध्ये अर्थशास्त्रात डॉक्टरेट व १८८६ मध्ये कायद्याची पदवी. हार्व्हर्डमध्येच प्रदीर्घकाळ अर्थशास्त्राचा प्राध्यापक (१८९२–१९३५). टाउसिंग ‘हार्व्हर्ड ग्रॅज्युएट स्कूल ऑफ बिझिनेस अँडमिनिस्ट्रेशन’ या संस्थेचा एक शिल्पकार होता. क्वार्टर्ली जर्नल ऑफ इकॉनॉमिक्स या त्रैमासिकाचा बराच काळ तो संपादक (१८९६–१९३७) होता.

‘अमेरिकन इकॉनॉमिक असोसिएशन’चा अध्यक्ष (१९०४–०५); अमेरिकन सरकारने नव्याने स्थापिलेल्या जकात आयोगाचा पहिला अध्यक्ष; अमेरिकेचे अध्यक्ष वुड्रो विल्सन यांचा व्यापारनीतिविषयक सल्लागार आणि किंमत निर्धारण समितीचा सदस्य (१९१७–१९). १९१९ मध्ये पॅरिस येथे शांतता परिषदेच्या वेळी वुड्रो विल्सनचा आर्थिक व विश्वासू सल्लागार म्हणून काही महिने वास्तव्य. जॉन बेट्स क्लार्क, अर्व्हिंग फिशर, फ्रँक ए. फेटर ह्यांसारख्या नवसनातनवादी संप्रदायाच्या अर्थशास्त्रज्ञांमधील एक म्हणून जरी टाउसिगची गणना होत असली, तरी त्याची विचारसरणी सनातनवादाशीच अधिक मिळतीजुळती होती.

अनुप्रयुक्त अर्थशास्त्र सिद्धांतांच्या क्षेत्रामध्ये तो अग्रणी समजला जातो. प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमिक्स (१९११) या ग्रंथामुळे टाउसिगचा पुढील कित्येक पिढ्यांमधील बुद्धिवंतांवर व मुलकी खात्यातील अनेक नामवंत अर्थशास्त्रज्ञांवर प्रभाव पडला आणि तो अद्यापही कित्येक क्षेत्रांमध्ये (उदा., आंतरराष्ट्रीय व्यापार, जकात वगैरे) जाणवत असल्याचे आढळून येते. क्वार्टर्ली जर्नल ऑफ इकॉनॉमिक्स या त्रैमासिकाच्या प्रागतिक व सहिष्णू संपादकीय धोरणामुळे त्याने अमेरिकन अर्थशास्त्रीय विचारांना विशेष चालना दिली. टाउसिगचे आवडीचे अभ्यासक्षेत्र म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापार व व्यापारनीती, इतिहास व व्यवहार हे होय. जॅकब व्हायनरच्या मते या क्षेत्रामधील टाउसिगचे लेखन म्हणजे इंग्रज सनातनवादाच्या विश्लेषणाचे सविस्तर पुनःप्रतिपादनच होय. त्याचे कार्य पुढील प्रकारे सांगता येईल :

(१) सनातन अर्थशास्त्रज्ञांच्या विखुरलेल्या व असंकलित लेखनसामग्रीचे संश्लेषण करून त्यामधून एकत्रित आणि समन्वित केलेला व्यापारसिद्धांत;

(२) सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांच्या तुलनात्मक परिव्ययसिद्धांताचे त्याने तयार केलेले सुधारित स्वरूप;

(३) अधातुक चलनमानाखालील आंतरराज्यीय कर्जे व आंतरराष्ट्रीय व्यापार ह्यांचे विश्लेषण आणि

(४) अमेरिकेच्या औद्योगिक विकासाच्या संदर्भात त्याने केलेला आंतरराष्ट्रीय व्यापार सिद्धांताचा उपयोग.

टाउसिगने आंतरराष्ट्रीय देवघेवींच्या ताळेबंदांसंबंधी अनेक लेख लिहिले; त्यासाठी त्याने विविध देशांचा अभ्यास करून त्यांवरील निष्कर्ष आपल्या इंटरनॅशनल ट्रेड या ग्रंथात वापरले आहेत. जकातींचा इतिहास व वाणिज्यनीती यांवर टाउसिगने अनेक लेख आणि द टॅरिफ हिस्टरी ऑफ द युनायटेड स्टेट्स (१८८८) व सम अ‍ॅस्पेक्ट्स ऑफ द टॅरिफ क्वेश्चन (१९१५) असे दोन महत्त्वाचे ग्रंथ लिहिले. दुसऱ्या ग्रंथात साखर, लोखंड व पोलाद, रेशीम, कापूस आणि लोकर यांसारख्या अमेरिकन उद्योगांवर स्वतंत्र प्रकरणे असून अमेरिकेच्या आर्थिक इतिहासात हा ग्रंथ फार मोलाचा मानला जातो. टाउसिगच्या अध्यक्षतेखाली जकात आयोगाचे कार्य उत्कृष्ट रीतीने चालले. आयोगाने स्थायी मूल्य व महत्त्व असलेले अनेक अहवाल प्रसिद्ध केले. या अहवालांमुळे अमेरिकेच्या आगामी काळातील जकातनीतीला उदारतेचा पाया लाभला.

अर्थशास्त्रीय सिद्धांतांमध्ये टाउसिगने घातलेली मोलाची भर म्हणजे त्याचे वेजिस अँड कॅपिटल (१८९६) आणि प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमिक्स (१९११) हे ग्रंथ. उत्पन्न वितरण सिद्धांताची त्याने केलेली मांडणी सर्वत्र मान्यता पावली. प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमिक्स या ग्रंथाचे अनेक भाषांत अनुवाद झाले. वेजिस अँड कॅपिटल या त्याच्या ग्रंथात त्याने जुना वेतननिधी सिद्धांत बदलून अधिक लवचिक केला. शुंपेटर या प्रख्यात अर्थशास्त्रज्ञाने टाउसिगला ‘अमेरिकन मार्शल’ म्हणून गौरविले आहे. प्रोटेक्शन टू यंग इंटस्ट्रीज अ‍ॅज अप्लाइड इन द युनायटेड स्टेट्स : ए स्टडी इन इकॉनॉमिक हिस्टरी (१८८३); फ्री ट्रेड, द टॅरिफ अँड रेसिप्रॉसिटी (१९२०); अमेरिकन बिझिनेस लीडर्स : ए स्टडी इन सोशल ओरिजिन्स अँड सोशल स्टॅटिफिकेशन (१९३२, सहलेखक) हे टाउसिगचे इतर उल्लेखनीय ग्रंथ होत. तो केंब्रिज (मॅसॅचूसेट्स) येथे निधन पावला.

 

लेखक - वि. रा. गद्रे

स्त्रोत - मराठी विश्वकोश

 

अंतिम सुधारित : 4/15/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate