অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मेनाशेम बेगीन

मेनाशेम बेगीन

मेनाशेम बेगीन : (१६ ऑगस्ट १९१३ - ९ मार्च १९९२). इझ्राएलचा पंतप्रधान (१९७७-८२) व शांततेच्या नोबेल पारितोषिकाचा सहमानकरी. त्याचा जन्म ब्रेस्ट (पोलंड) येथे सामान्य कुटुंबात झाला. वडिलांचे नाव झीव्हडोव्ह व आईचे हसिया. ब्रेस्ट येथे सुरुवातीचे शिक्षण घेऊन त्याने मिझ्राशी हिब्रू विद्यालयातून (वॉर्सा विद्यापीठ) कायद्याची पदवी घेतली. तत्पूर्वीच विद्यार्थीदशेत पोलंडमधील बेतार झाय्‌निस्ट युवक चळवळीत तो सहभागी झाला होता (१९२९). पुढे त्याने ज्यू विद्यार्थी संरक्षण दलाची स्थापना करण्यात पुढाकार घेतला (१९३२). याच सुमारास त्याने अ‍ॅलीझ आर्नल्ड या युवतीशी विवाह केला. त्यांना एक मुलगा व दोन मुली आहेत. बेतार दलात असताना त्याने विविध नियतकालिकांतून आपल्या चळवळीच्या प्रचार-प्रसारार्थ विपुल लेखन केले. चेकोस्लोव्हाकियातील बेतार गटाचा मुख्य सेनापती म्हणून त्याची नियुक्ती झाली (१९३६). ज्यू स्वातंत्र्य चळवळीतील त्याच्या या कारवायांमुळे त्यास पोलिश शासनाने अटक केली आणि नंतर बंधनागारात ठेवले (१९४०-४१). तेथून सुटल्यानंतर तो एस्राएलमधील इर्ग्यून श्बाई (झ्व्हाई) ल्यूमी या सशस्त्र सेनेचा मुख्य सुत्रधार व सेनापती झाला (१९४२).

दुसऱ्या महायुद्धाच्या अखेरच्या दिवसांत त्याने ब्रिटिशांना गनिमीयुद्धतंत्राचा अवलंब करून हैराण केले. तेव्हा त्याला पकडण्यासाठी ब्रिटिशांनी मोठे बक्षीस जाहीर केले. त्याने हेरत (स्वातंत्र्य) ही संघटना एस्राएलमध्ये स्थापना केली (१९४८). त्यानंतर लवकरच एस्राएलला स्वातंत्र्य मिळाले (१९४८). त्या वेळी इर्ग्यूनचे रूपांतर एझ्राएली सैन्यात झाले. त्यातील काही निवृत्त सेनाधिकाऱ्यांनी राजकीय पक्ष स्थापन केला. ह्या पक्षाचे नाव ‘झाय्‌निस्ट पक्ष’ असे होते; पण नंतर तो पक्ष एका उजव्या उदारमतवादी पक्षात समाविष्ट करण्यात आला आणि त्या पक्षाचे नाव लीकूड असे रूढ झाले. त्या पक्षातर्फे बेगीन एस्राएलच्या संसदेवर (सेनेट) निवडून आला आणि बिनखात्याचा मंत्री म्हणून त्याची नियुक्ती झाली (१९६७-७०). पुढे एस्राएलमधील मजूर पक्षाचा पराभव होऊन त्याचा लीकूड पक्ष वरचढ ठरला. तेव्हा संयुक्त मंत्रिमंडळाचे नेतृत्व त्याच्याकडे आले व तो पंतप्रधान झाला (१७ एप्रिल १९७७). पंतप्रधान झाल्यानंतर त्याने देशातील प्रतिगामी व पुरोगामी असे परस्पर विरोधी गट एकत्र आणून देशाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचा चंग बांधला.

मध्यपूर्वेत सतत धुमसत असलेला अरब-इझ्राएल संघर्ष संपुष्टात आणण्यासाठी त्याने ईजिप्तशी मैत्रीचे व सलोख्याचे संबंध प्रस्थापित केले. परिणामतः अमेरिकेच्या मध्यस्थीने ईजिप्त-इस्राएलमध्ये कॅंप डेव्हिड येथे शांतता तह झाला (१९७८). या त्याच्या कार्याबद्दल ईजिप्तचे अध्यक्ष अन्वर सादतबरोबर त्यास शांततेचे नोबेल पारितोषिक देऊन त्याचा गौरव करण्यात आला (१९७८). या तहामुळे इझ्राएलचे संबंध इतर अरब राष्ट्रांशी जास्तच बिघडले. आपल्या देशाची संरक्षणव्यवस्था भरभक्कम करून अमेरिकेशी मैत्रीचे संबंध जोडणे व अरब राष्ट्रांवर सतत दबाव ठेवणे, हे त्याच्या धोरणाचे प्रमुख सूत्र होते. परिणामतः बेरूतमधील पॅलेस्टनी मुक्तिसेनेचे केंद्र निकामी करण्यासाठी इझ्राएलने जून १९८२ मध्ये लेबानानवर हल्ले सुरू केले. तेथील परिस्थिती आंतरराष्ट्रीय चिंतेची बाब ठरली आहे. एक तडफदार लेखक, वकील आणि मुत्सद्दी म्हणून जागतिक राजकारणात त्याचा नावलौकिक आहे. त्याच्या मार्गदर्शनाखाली इझ्राएलची सर्व क्षेत्रांत प्रगती होत आहे. त्याचे स्फुटलेखन विपुल असून द रिव्होल्ट (१९४९) व द व्हाइट नाइट्‌स (१९७७) ही पुस्तके प्रसिद्ध आहेत.

 

लेखक - रुक्साना शेख

स्त्रोत - मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 5/11/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate