(१४ फेब्रुवारी १८६४ – ७ फेब्रुवारी १९४४). अमेरिकन समाजशास्त्र. जन्म हरव्हीव्हिले, पेनसिल्व्हेनिया येथे. मिशिगन विद्यापीठातून तत्त्वज्ञानाची पदवी (1887). त्यानंतर वार्ताहराचा व्यवसाय पतकरला, त्यामुळे शहरांमधील विविध स्तरांतील लोकजीवनाशी त्यांचा जवळून संपर्क घडला. अमेरिकन विचारवंत जॉन ड्यूई यांनी पत्रकार फ्रँकलीन फोर्ड यांच्याशी पार्क यांचा परिचय करून दिला. फोर्ड व पार्क यांनी द थॉट न्यूज नावाचे एक नवे वृत्तपत्र काढायचे ठरवले. पण हे वृत्तपत्र पुढे निघाले नाही. मिशिगन येथील एका वकिलाच्या क्लारा काहिल या मुलीशी विवाह (१८९४). वृत्तव्यवसायातील अनुभवांनी पार्क यांना मानवी संबंधाचे व वर्तनांचे अधिक सखोल अध्ययन करण्यास प्रवृत्त केले. त्या दृष्टीने हार्व्हर्ड येथे मानसशास्त्र व तत्त्वज्ञान या विषयांचा अभ्यास करून त्यांनी एम्.ए. पदवी मिळविली(१८९९). पुढे जर्मनीत त्यांनी सु. चार-पाच वर्षे वास्तव्य केले. तेथेच समाजशास्त्रज्ञ गेओर्ख झिमेल यांच्यापाशी समाजशास्त्राचा अभ्यास केला व विख्यात जर्मन विचारवंत व्हिल्हेल्म व्हिंडेलबांट यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी. संपादिली (१९०४); त्यांच्या प्रबंधाचा विषय होता ‘क्राउड अँड पब्लिक’ (इं.शी). पुढे निग्रो नेते बुकर टी. वॉशिंग्टन यांच्या प्रेरणेने अमेरिकेत टस्कीगी येथे राहून त्यांनी अमेरिकन निग्रोंच्या जीवनाचे सखोल अध्ययन केले. शिकागो विद्यापीठात समाजशास्त्राचे प्राध्यापक व संशोधक म्हणून १९१४ पासून सेवानिवृत्तीपर्यंत (१९२९) त्यांनी काम पाहिले.
१९३६ पासून नॅशव्हिल, टेनेसी येथील ‘फिस्क विद्यापीठ’ या निग्रोंच्या संस्थेत ते प्राध्यापक व संशोधक होते. तेथेच त्यांचे निधन झाले. अमेरिकेतील अनुभववादी विचारसरणीच्या समाजशास्त्रज्ञांमध्ये अग्रणी म्हणून पार्क यांचा निर्देश केला जातो. या दृष्टीने, समाजशास्त्राच्या विद्यापीठीय अध्ययनासाठी अर्नेस्ट डब्ल्यू, वर्जेस यांच्या साहाय्याने त्यांनी लिहिलेले इंट्रोडक्शन टू द सायन्स ऑफ सोशॉलॉजी (१९२१) हे पाठ्यपुस्तक उल्लेखनीय आहे. समाजशास्त्रातील विविध संकल्पनांचे, विशेषतः समूहजीवनासंबंधित संकल्पनांचे, अनेक ऐतिहासिक, तात्त्विक तसेच शास्त्रीय तपशीलांच्या आधाराने चिकित्सक विश्लेषण त्यात केले आहे. स्पर्धा, संघर्ष, समायोजन आणि समावेशन या समूहांतर्गत चार प्रक्रियांचे पार्कनी केलेले चिकित्सक विवेचन महत्त्वाचे आहे. परिस्थितिविज्ञानाचे निकष लावून प्रथमच मानवसमूह आणि त्यांचे सामाजिक वर्तन यांचा अन्वयार्थ लावण्याचा प्रयत्न पार्कनी केला. त्यामुळे पार्क व बर्जेस मानवी परिस्थितिविज्ञानाचे प्रणेते ठरले. पार्क व त्यांचे अनेक विद्यार्थी यांनी शहरांमधील गुन्हेगार, वेश्या, भटके लोक त्याचप्रमाणे विविध अल्पसंख्य वांशिक गट यांच्या सामाजिक पाहण्या केल्या. त्यामुळे शहरांतील प्रत्यक्ष बकाल वस्तीत जाऊन केलेल्या क्षेत्रीय संशोधनास अमेरिकेत चालना मिळाली. त्यांची इतर उल्लेखनीय पुस्तके ओल्ड वर्ल्ड ट्रेट्स ट्रान्सप्लांटेड, (१९२१; हर्बर्ट ए. मिलर यांच्यासवेत) व द इमिग्रंट प्रेस अँड इट्स कंट्रोल (१९२२) ही होत. पार्क यांचे विविध प्रकारचे स्फुट व इतर लेखन त्यांच्या मृत्यूनंतर तीन खंडांत प्रसिद्ध झाले आहे. ते एव्हरेट टी. ह्यूझ, चार्ल्स एस्. जॉन्सन आणि त्यांच्या इतर शिष्यांनी संकलित व संपादित केलेले असून विषयाच्या अनुरोधाने पुढीलप्रमाणे प्रसिद्ध झाले आहे : रेस अँड कल्चर (खंड १ ला, १९५०) ह्यूमन कम्युनिटीज (खंड २ रा, १९५२) व सोसायटी (खंड ३ रा, १९५४).
लेखक - नरेश परळीकर
स्त्रोत - मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 6/17/2020
औद्योगिक समाज व त्यातील औद्योगिक संघटनांचे स्वरूप ...
मानवी समाजाचा आणि मानवा-मानवांत होणाऱ्या सामाजिक आ...
ज्ञानाचे समाजशास्त्र या विषयक माहिती.
अमेरिकन समाजशास्त्र. जन्म हरव्हीव्हिले, पेनसिल्व्ह...