অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

विल्यम ग्रेअम सम्नर

विल्यम ग्रेअम सम्नर

३० ऑक्टोबर १८४०-१२ एप्रिल १९१०. अमेरिकन समाजशास्त्रज्ञ. जन्म न्यू जर्सीमधील पॅटर्सन येथे. त्यांचे आई-वडील दोघेही इंगज होते आणि त्यांच्या कुटुंबाला बऱ्यापैकी सामाजिक पार्श्वभूमी होती. पुढे हे कुटुंब अमेरिकेतील कनेक्टिकट येथे स्थलांतरित झाले. इथेच सरकारी शाळेमधून शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी येल विदयापीठातून पदवी प्राप्त केली (१८६३). पुढे त्यांनी गटिंगेन (१८६४) येथे प्राचीन भाषा, इतिहास तसेच ऑक्सफर्ड (१८६६) येथे धर्मशास्त्र आणि तत्त्वज्ञान या विषयांचा अभ्यास केला. सम्नर यांच्यावर इंगज विचारवंत हर्बर्ट स्पेन्सर यांच्या विचारांचा प्रभाव होता. त्यांना धर्माधिकाराची दीक्षा देण्यात आली (१८६९); पण राज्यशास्त्र, अर्थशास्त्र या विषयांशी असणाऱ्या संबंधांमुळे त्यांनी मॉरिसटाउन हा पाद्रींचा प्रदेश सोडला आणि ते येल विदयापीठात राज्यशास्त्र व समाजशास्त्र विषयाचे प्राध्यापक म्हणून रूजू झाले (१८७२). सम्नर यांचा मूळ पिंड हा शिक्षकाचा होता. पुढे अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील समाजशास्त्राचे पहिले आणि प्रभावी शिक्षक म्हणून त्यांनी ख्याती मिळविली.

सम्नर यांचे गाजलेले पहिले पुस्तक फोकवेज १९०७ साली प्रसिद्घ झाले. त्यात त्यांनी समाजशास्त्रामधील महत्त्वाच्या अशा लोकरीती (फोकवेज) आणि सदाचार संकेत किंवा लोकनीती (मोअर्स) या दोन संकल्पनांची मांडणी केली. त्यांच्या मते, ‘समाजमान्य असे वागणुकीचे किंवा वर्तनाचे प्रकार म्हणजे लोकरीती होय’. हे वर्तनप्रकार दैनंदिन जीवनात रूढ झालेले असतात. संभाषण, भोजन, अभिवादन, पोशाख इ. वर्तनप्रकार व पद्धती लोकरीती या प्रकारांत मोडतात. समाजाच्या दृष्टीने लोकरीतींना सामाजिक नियंत्रणाचे साधन म्हणून महत्त्व आहे; तर सदाचार संकेत हे परंपरेनुसार व्यक्तींवर झालेल्या संस्कारांचे परिणाम असतात.

समाजात अशाही काही लोकरीती असतात की, त्यांच्या पालनाबाबत समाज अधिक जागरूक आणि दक्ष असतो. त्यांचे पालन झालेच पाहिजे, असे समाजाचे नैतिक बंधन असते. अशा लोकरीतींना सदाचार संकेत म्हणतात. म्हणजेच लोकरीतींमधून सदाचार संकेत निर्माण होतात.सम्नरच्यामते, आपल्या अस्तित्वाचे सातत्य राखणे,हा प्रत्येक समाजापुढील मूलभूत प्रश्र्न आहे. लोकरीती व सदाचार संकेतामुळे समूहाचे संरक्षण होते. त्यांच्यात एकता वाढून सुरक्षितता लाभते. समूहातील लोक आपल्या समूहाशी एकनिष्ठ राहतात; कारण त्यांची अशी धारणा असते की, आपल्या समूहातील लोकरीती व सदाचार संकेत या इतर समूहांपेक्षा श्रेष्ठ आहेत. या दृष्टिकोनास सम्नर ‘समूह केंद्रीतता’ (एथ्नोसेंट्रिझम) असे म्हणतात.

सैद्धांतिक दृष्टया सम्नर यांचा दृष्टिकोन नेहमीच क्रमविकासवादी (इव्हलूशनिस्ट) राहिला आहे. निरनिराळ्या समूहांमध्ये सतत संघर्ष आणि स्पर्धा सुरू असते, हे त्यांनी गृहीत धरले. लोकरीती आणि सदाचार संकेत, या सामाजिक बाबींचे स्पष्टीकरण देताना त्यांनी त्या केवळ त्या त्या समूहांच्या अस्तित्वासाठी प्रचलित झालेल्या असतात, असे म्हटले आहे. हा विचार दोन कारणांसाठी टीकेस पात्र ठरला. एक तर त्याने स्वीकारलेले गृहीतक फार एकांगी आहे; कारण समूहाचे संबंध संघर्षाबरोबरच सहकार्यावरही अवलंबून असतात. दुसरा आक्षेप असा की, सम्नरने काढलेले निष्कर्ष हे वस्तुस्थितीशी जुळणारे नाहीत; कारण काही समूहांतील सदाचार संकेत हे त्याच्या अस्तित्वालाच मारक ठरणारे असतात.एकूणच समाजशास्त्राच्या विकासामधील सम्नर यांचे योगदान महत्त्वाचे मानले जाते. त्यांचे इतर लेखन एकत्रित स्वरूपात द सायन्स ऑफ सोसायटी (भाग १ ते ४) या नावाने १९२७ साली प्रसिद्ध झाले.एंजलवुड (न्यूजर्सी) येथे त्यांचे निधन झाले.

लेखक: किरण केंद्रे

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 4/18/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate