অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सर जेम्स ऊट्रम

सर जेम्स ऊट्रम

(२९ जानेवारी १८३० - ११ मार्च १८६३). हिंदुस्थानातील ब्रिटिश लष्कराचा एक सेनापती व मुत्सद्दी. बटर्ली (डर्बिशर) येथील एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मला. १८१९ मध्ये तो एक सामान्य शिपाई म्हणून हिंदुस्थानात आला. मुंबईला ब्रिटिश पायदळात असताना त्यास बढती मिळाली. १८२५ मध्ये खानदेशातील भिल्ल पलटणीतील साहाय्यक सैन्यदलात त्याने अनेक सुधारणा केल्या. १८३५ ते १८३८ पर्यंत गुजरातमधील संस्थानिकांचे उठाव मोडण्याचे काम त्याने केले. इंग्रज-अफगाण युद्धात त्याने लॉर्ड कीनचा साहाय्यक म्हणून उत्कृष्ट कामगिरी बजावली. १८३९ ते १८४२ च्या दरमान सिंधचा राजकीय आयुक्त म्हणून त्याने काम केले. सिंधच्या अमीरांचे इंग्रजांशी १८४३ मध्ये युद्ध सुरू होताच, हैदराबादच्या ब्रिटिश वकिलातीवर हल्ला झाला, त्यावेळी त्याने दाखविलेल्या शौर्याबद्दल हिदुस्थानचा वीरपुरुष अशा अर्थाची पदवी त्यास बहाल करण्यात आली. त्याने रेसिडेंट म्हणून बडोदे (१८४७) व लखनौ (१८५४) येथे काम केले. १८५६ मध्ये औध (अवध) खालसा झाल्यावर तो त्या विभागाचा पहिला आयुक्त झाला.

भारतीय सैनिकांच्या १८५७ च्या उठावाच्या वेळी तो इराणमध्ये होता. त्याला बोलाविण्यात आले आणि बंगाली सैन्यविभागाचा सेनापती करण्यात येऊन कलकत्ता ते कानपूर या प्रदेशाच्या रक्षणाची जबाबदारी त्याच्यावर टाकण्यात आली. ऊट्रमने या प्रदेशाचे संरक्षण केले व लखनौचा ताबा मिळविण्यासाठी मदत केली. उठावाच्या वेळी उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल ब्रिटिश पार्लमेंटने त्यास बॅरन हा बहुमान बहाल केला. १८६० मध्ये तो इंग्‍लंडला परत गेला व पुढे फ्रान्समध्ये गेला. तेथे असतानाच पो या ठिकाणी तो मरण पावला.

लेखक : य.ना.देवधर

स्त्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/11/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate