অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

अ‍ॅटलास पर्वत

अ‍ॅटलास पर्वत

अ‍ॅटलास पर्वत

वायव्य व उत्तर आफ्रिकेतील, मोरोक्को, उत्तर अल्जीरिया व ट्युनिशिया यांतून गेलेली, भूमध्य समुद्रकिनाऱ्याला जवळजवळ समांतर असलेली सु. २,४०० किमी. लांबीची वलीपर्वतश्रेणी. अल्जीरियात तिची रुंदी सु. ४०० किमी. आहे. ती नैर्ऋत्य मोरोक्कोच्या अटलांटिक किनाऱ्यापासून ईशान्य ट्युनिशियाच्या केप बॉन द्वीपकल्पापर्यंत पसरलेली आहे. यूरोपातील आल्प्सच्या उत्थानाशी ती समकालीन असून अटलांटिकमधील कानेरी बेटे व स्पेनमधील कॉर्डिलेरा पेनिवेटिका व सिसिली आणि इटलीतील अ‍ॅपेनाइन्स यांच्याशी तिचा संबंध पोचतो.

जुरासिक कालखंडाच्या शेवटी सुरुवात होऊन क्रिटेशस व मध्यनूतन कालखंडांपर्यंतच्या हालचालींत या श्रेणीची उत्पत्ती झाली असावी. यात वालुकाश्म, चुनखडक, बेसाल्ट, संगमरवर, डायोराइट वगैरे खडक आढळतात. भूमध्य समुद्र व सहारा यांमध्ये भूरचना व वायुमान या दृष्टींनी आडवी आलेली ही पर्वतश्रेणी उत्तुंग पर्वतराजी, उंच पठारे, तुटक गटपर्वत यांनी युक्त असून तिचे सर्वोच्च शिखर जेबेल टुब्कल (४,१६५ मी.) मोरोक्कोत आहे. हाय अ‍ॅटलास किंवा ग्रेट अ‍ॅटलास ही सर्वांत उंच व सलग रांग मोरोक्कोच्या

नैर्ऋत्येकडील केप गीअरपासून अल्जीरियाच्या सीमेपर्यंत सु. ६५० किमी. नैर्ऋत्यईशान्य पसरली आहे. तिची सरासरी उंची ३,३५० मी. आहे. या रांगेतील काही शिखरे हिमाच्छादित असून येथे पूर्वी हिमानीक्रिया झालेली स्पष्ट दिसून येते. याला लागूनच उत्तरेस माराकेशचे सुपीक मैदान आहे. मध्य अ‍ॅटलासची कमी उंचीची रांग ईशान्येकडे गेलेली असून तिचे सर्वोच्च शिखर जेबेल व नासर ३,२९० मी. उंच आहे.

हा अ‍ॅटलासच्या नैर्ऋत्येस अँटी अ‍ॅटलास ही रांग इफ्‍नी प्रदेशातून अटलांटिकपर्यंत जाते. ती सूस या सुपीक प्रदेशाच्या पूर्वेकडील जेबेल सीर्वा या २,३०४ मी. उंचीच्या ज्वालामुखी शिखराने हाय अ‍ॅटलासला जोडलेली आहे. अल्जीरियामध्ये अ‍ॅटलासचे किनाऱ्यावरील टेल अ‍ॅटलास, सहाराच्या सीमेवरील अ‍ॅटलास व त्यांच्या दरम्यानची उंच पठारे असे तीन स्पष्ट भाग पडतात. टेल अ‍ॅटलासच्या दोन समांतर पर्वतराजी असून त्यांच्या दरम्यान अरुंद दऱ्या व द्रोणी आहेत.

अनेक रांगांनी बनलेल्या या श्रेणीत रांगारांगांमध्ये अल्जीरियाची अनेक सुपीक, सखल, किनारी मैदाने आहेत. तेथेच अल्जीरियाची मुख्य शहरे व शेतीचा प्रदेश आहे. सु. १२५ सेंमी. हिवाळी पावसामुळे तेथे द्राक्षे, ऑलिव्ह, संत्री, मोसंबी इ. भूमध्य सागरी फळांचे भरपूर पीक येते. टेल अ‍ॅटलासच्या दक्षिणेकडील सरासरी ९०० मी. उंचीच्या निमओसाड पठारांवर अनेक उथळ सरोवरे (प्लाया) आहेत. या पठारांवर पश्चिमेस एस्पार्टो गवत व लोकर यांचे मुख्य उत्पादन असून पूर्वेस अधिक आर्द्र भागात गहू होतो.

पठारांच्या दक्षिणेची सहारा अ‍ॅटलास ही मोरोक्कोपासून ट्युनिशियापर्यंत गेलेली डोंगरांची तुटक रांग आहे. यातील जेबेल चेलिया (२,३३० मी.) हे अल्जीरियातील सर्वोच्च शिखर आहे. ट्युनिशियामध्ये टेल अ‍ॅटलासची रांग बीझर्ट बंदरापर्यंत जाते. मेजर्दा खोऱ्याच्या दक्षिणेस सहारा अ‍ॅटलास म्हणजे तुटक तुटक गटपर्वत असून ते केप बॉन द्वीपकल्पापर्यंत जातात. जेबेल चंबी (१,५४४ मी.) हा त्यांतील सर्वांत उंच होय. अ‍ॅटलासच्या किनारी रांगांवर भरपूर पाऊस पडत असल्यामुळे त्यांवर ओक, अलेप्पो, पाइन, सीडार, थुया यांची अरण्ये आहेत. बुचाच्या झाडांचे प्रमुख उत्पन्न आहे.

अ‍ॅटलासवरून अटलांटिकमध्ये व भूमध्य समुद्रात बारमहा वाहणारे पुष्कळ प्रवाह जातात. ऊम अर रबीआ, सेनू, तेन्सिफ्त, सूस व मूलूया या मोरोक्कोतील, चेलिफ ही अल्जीरियातील व मेजर्दा ही अल्जीरिया आणि ट्युनिशियामधील अशा प्रमुख नद्या होत. हाय अ‍ॅटलास व सहारा अ‍ॅटलास यांवरून दक्षिणेकडे वाहणाऱ्या प्रवाहांचे पाणी काही मरूद्यानांस मिळते.

पुढे ते प्रवाह वाळवंटात लुप्त होतात. अ‍ॅटलासमध्ये खनिजसंपत्ती बरीच आहे. अल्जीरिया-ट्युनिशिया सीमेवर व मोरोक्कोमध्ये लोखंड, मोरोक्कोमध्ये मँगॅनीज, शिसे, मॉलिब्डिनम, कोबाल्ट, कोळसा, जस्त, तांबे, अँटिमनी व पारा सापडतात. येथील संगमरवर रोमन लोकांनी वापरला होता. अल्जीरियात फॉस्फेट, तेल व नैसर्गिक वायू आहेत.

मोरोक्को व अ‍ॅटलासमध्ये तालवेम्त, तेस्त व तिच्का या प्रमुख खिंडी आहेत. त्यांतून दक्षिणोत्तर रस्ते गेलेले आहेत. अल्जीरियातील दक्षिणोत्तर लोहमार्गांनी ओरान-कॉलाँबेशार, अल्जिअर्स-जेल्फा आणि कॉन्स्टँटीन-बिस्क्रा जोडलेली आहेत. सडकाही बऱ्याच आहेत. अ‍ॅटलासच्या दुर्गम भागतील बर्बर लोकांशी १९३० पर्यंत फ्रेंचांना झगडावे लागले. फ्रेंचांच्या आक्रमणाला त्यांनी सतत विरोध केला.

हे लोक मानी, स्वतंत्र वृत्तीचे व कडवे आहेत. अ‍ॅटलासच्या डोंगराळ व पठारी प्रदेशात भटक्या जमातीचे लोक आढळतात. १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात या डोंगराळ प्रदेशाचे बरेचसे समन्वेषण व शास्त्रीय पाहणी झाली. अलीकडे गिर्यारोहक व हौशी प्रवासी यांचे लक्ष या पर्वतश्रेणीने वेधून घेतले आहे.


कुमठेकर, ज. ब.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 6/21/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate