অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

आल्प्स

आल्प्स

दक्षिण मध्य यूरोपातील पर्वतसंहती. सु. ४४० उ. ते ४८० उ. व ६० पू. ते १८० पू. या पर्वतसंहतीने एकूण सु. २,०७,२०० चौ.किमी. क्षेत्र व्यापले असून सर्वात उंच शिखर माँ ब्लाँ (माँट ब्लांक) ४,८१० मी. उंच आहे. केल्टिक ‘आल्ब’किंवा ‘आल्म’ या उंच किंवा धवल या अर्थाच्या शब्दावरून आल्प हा शब्द आला असावा. त्या प्रदेशातील लोक मात्र आल्प म्हणजे उंच पर्वतीय प्रदेशातील कुरणे असे समजतात. आल्प्सचे भौगोलिक स्थान व यूरोप खंडातील मानवी जीवनावर आल्प्सचा झालेला परिणाम यांमुळे आल्प्सला मोठे महत्व प्राप्त झालेले आहे. उलट्या चंद्रकोरीच्या आकाराच्या आल्प्सच्या रांगा फ्रान्स व इटली यांच्या दरम्यान भूमध्य समुद्रापासून सुरू होतात. त्या प्रथम उत्तरेकडे, मग ईशान्येकडे, नंतर पूर्वेकडे व शेवटी आग्नेयीकडे वळून यूगोस्लाव्हियाच्या एड्रिअटिक किनाऱ्यापर्यंत जातात. याचा सर्वात उत्तरेकडील भाग बव्हेरियात आहे. एका बाजूला इटलीचे पो नदीचे खोरे व दुसऱ्या बाजूला फ्रान्स, जर्मनी तसेच डॅन्यूब नदीचे खोरे यांच्यामध्ये आल्प्स पर्वत उभा आहे. स्वित्झर्लंड व ऑस्ट्रिया यांचा बराच भाग आल्प्समुळेच डोंगराळ झालेला आहे. यूरोपातील कॉकेशसच्या खालोखाल सर्वात उंच पर्वतश्रेणी म्हणून आल्प्सची गणना होते. तथापि अनेक खिंडीमुळे हा कॉकेशसइतका एकाकी वा हिमालयाइतका दुर्लंघ्य नाही. उंचीचा परिणाम म्हणजे २,४०० ते २,९०० मी. उंचीच्या वरील पर्वतउतार व पर्वतशिखरे सदैव बर्फाच्छादित असतात. जवळजवळ १,२०० हिमनद्या या पर्वतश्रेणीतून वाहतात. अनेक शृंगे, प्रशिखा, हिमगहरे, ‘यू’ आकाराच्या व लोंबत्या दऱ्या इ. हिमानी क्रियेमुळे तयार झालेल्या भूविशेषांमुळे आल्प्स पर्वतप्रदेशाला हिमालयाप्रमाणे भव्योदात्त स्वरूप प्राप्त झाले आहे.

आल्प्स पर्वत

आल्प्सचा उंच प्रदेश सु. १२५ ते १३८ किमी. रुंदीचा पट्टा असून त्यात फिन्स्टर आर्हॉर्न, माँटे रोझा व माँट ब्लांक इ. उंच शिखरे आहेत. जेथे पर्वताची रुंदी २०० ते २५० किमी. पर्यंत आहे, तेथे ४,००० मी. पेक्षा उंच शिखरे आढळत नाहीत.. पूर्वेकडील आल्प्स फक्त कारावांकेन जवळच २,४०० मी. पेक्षा जास्त उंच आढळतो.

आल्प्स पर्वतावर समांतर रांगा वलीकरणाने व प्रणोदविभंगाने बनल्या असून त्यामुळेच त्यांच्यामध्ये मोठमोठ्या दऱ्या निर्माण झाल्या आहेत. विदारण व क्षरण यांमुळे बराच अंतर्भाग उघडा पडल्यामुळे ही घड्यांची रचना जास्त स्पष्ट होते. सामान्यत: आल्प्स पर्वताचे तीन भाग पाडले जातात : (१) पश्चिम आल्प्स (२) मध्य आल्प्स व (३) पूर्व आल्प्स. १) पश्चिम आल्प्स समुद्रानजीकचा कमी उंचीचा मॅरिटाइम आल्प्स (कॉले दे तेंदेपासून कॉले दे आर्जेतेअरापर्यंत); लिग्यूरियनआल्प्स-मॅरिटाइम आल्प्सच्या इटलीच्या वायव्य किनाऱ्यावरील विस्तार; कॉतिअन आल्प्स-कॉले दे आर्जेतेअरापासून माँ सनी खिंडीपर्यंत; त्याच्या पश्चिमेचा डोफीने आल्प्स; कॉतिअनपासून दूरांस दरीने विभागलेला ग्रेयन आल्प्स आणि सव्हॉय आल्प्स असे याचे विभाग आहेत. पश्चिम आल्प्समध्ये पूंता आर्जेतेअरा (३,२९६ मी.) , साक्कारेल्लो (२,२०२ मी.), मौंट व्हीझो (३,८४२ मी.), माँट ब्लांक (४,८१० मी.), मॅटरहॉर्न (४,५०५ मी.), वाइसहॉर्न (४,५११ मी.), डांब्लांश (४,३६४ मी.) इ. उत्तुंग शिखरे आहेत. माँट ब्लांक हे सर्वोच्च शिखर फ्रान्समधील सव्हॉय आल्प्समध्ये आहे.

मध्य आल्प्स

फ्रान्स व इटली यांच्या सीमेवरील पेनाइन आल्प्स, त्याच्या उत्तरेस पश्चिमेकडून पूर्वेकडे क्रमाने बर्नीज आल्प्स, लिपाँटाइन आल्प्स, रीशन आल्प्स व इतर अनेक रांगा मध्य आल्प्स विभागात येतात. त्यात आल्बुला, सिल्व्रेता, रॅटिकॉन इत्यादींचा समावेश आहे. पेनाइनमध्ये माँटे रोझा (४,६३८ मी.) व इतर भागांत युंगफ्राऊ (४,१६१ मी.), मोंटे लेओने (३,५६१ मी.), पित्स बर्नीना (४,०५२ मी.), फिन्स्टर आर् हॉर्न (४,२७५ मी.) इ. शिखरे आहेत.

 

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate