অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

माँ ब्लां

माँ ब्लां

माँ ब्लां

फ्रान्स-इटली व स्वित्झर्लंड यांच्या सीमेवरील आल्प्स पर्वतश्रेणींतील उंच डोंगररांग आणि आप्ल्समधील सर्वोच्‍च शिखर (४,८१० मी.) जवळजवळ वर्षभर येथील बराचसा भाग हिमाच्छादित असल्याने याला ‘माँ ब्लां’ (शुभ्रगिरी) हे नाव देण्यात आले. याचा निम्म्यापेक्षा जास्त भाग फ्रान्समध्ये असून बहुतेक उंच शिखरे याच भागात आहेत.

पूर्वीपासून अपशकुनी म्हणून समजल्या जाणाऱ्या या पहाडी प्रदेशाला अठराव्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत ‘माँतान्यू मोदी’ (शापित पर्वत) हे नाव रूढ होते. सँ फ्रांस्वा दे सेलेस याच्या १६०३ च्या कागदपत्रात मात्र माँ ब्लां या नावाचा उल्लेख आल्याचे दिसून येते.

लिटल सेंट बर्नार्ड खिंडीपासून उत्तरेस सु. ४८ किमी. पसरलेली ही ग्रॅनाइटी व शिस्ट खडकांची डोंगररांग सु. १६ किमी. रूंद आहे. दक्षिणेस ग्रेयन आल्प्स, पश्चिमेस सव्हॉय आल्प्स आणि शामॉनी खोरे, पूर्वेस कूरमायर खोरे व ईशान्येस पेनाइन आल्प्स यांनी हा प्रदेश वेढलेला आहे. याचा फ्रान्सकडील बराचसा भाग हिमनद्यांनी व्यापलेला असून या भागात माँ ब्लां, माँ मोदी, ग्रांद झॉरास, माँ दॉलँ इ. उंच शिखरे आहेत.

माँ ब्लांचा सु . १०० किमी. प्रदेश हिमनद्यांनी व्यापलेला असून या हिमनद्या बऱ्याच वेळा सस. पासून सु. १,४९४ मी. पर्यंत खाली येतात. मेअर द ग्लास ही या प्रदेशातील प्रमुख हिमनदी १९३० मध्ये १,२५० मी. पर्यंत खाली आली होती. सतराव्या शतकारंभी हिमनद्यांमुळे शामॉनी खोऱ्यातील शेतजमिनींचे खूपच नुकसान झाले.

या शतकात येथे येणाऱ्या प्रवाशांना व संशोधकांना येथील सृष्टीसौंदर्याचे व हिमनद्यांचे आकर्षण होते. १७४१ मध्ये ब्रिटिश अभ्यासक रिचर्ड पोकॉक व विल्यम विन्‌डॅम यांनी हिमनद्यांचा अभ्यास केला.

शेलीसारख्या इंग्लिश कवींनीही आपल्या काव्यात माँ ब्लांच्या सौंदर्याचे वर्णन केलेले आढळते. पुढे पी. मार्टेल (१७४२) ए. दल्यूक (१७७०) व त्यानंतर एच्‌.सोस्यूर यांनी या प्रदेशाचा अभ्यास करून माँ ब्लां हा पश्चिम यूरोपातील सर्वांत उंच डोंगर असल्याचे दाखवून दिले. यातूनच येथील माँ ब्लां शिखर सर करण्याची जिज्ञासा निर्माण झाली. १७८६ मध्ये शामॉनी (फ्रान्स) येथील एम्. पॅकार्ड व जे. बॅलमत यांनी हे शिखर प्रथम सर केले. त्यानंतर सोस्यूर व इतर अनेकांनी वेगवेगळ्या मार्गांनी ते जिंकले. या शिखरावर १७८६ ते १८५४ या काळात एकूण ६१ चढाया झाल्या.

गिर्यारोहण व बर्फावरील खेळ (स्कीईंग, स्केटिंग इ.) यांसाठी हिवाळ्यात अनेक देशी-विदेशी पर्यटक येथे येतात. येथील आकाशस्थ रज्‍जुमार्ग हे पर्यटकांचे मुख्य आकर्षण असते. माँ ब्ला परिसरातील वाढत्या पर्यटन व्यवसायामुळे येथे अनेक सुविधा उपलब्ध झाल्या असून शामॉनी हे प्रमुख पर्यटनकेंद्र बनले आहे.

या प्रदेशातील बदलत्या हवामानामुळे मात्र अनेक ठिकाणी बर्फाचे कडे कोसळून हानी होण्याचा संभव असतो. सुप्रसिद्ध भारतीय अणुसंशोधक डॉ. होमी भाभा यांचे विमान याच परिसरात नष्ट झाले (१९६६).

या डोंगररांगेतून अत्यंत परिश्रमाणे बोगदा काढून फ्रान्स व इटली यांदरम्यानचा मोटार वाहतुकीचा जवळचा भुयारी मार्ग काढण्यात आला आहे. या बोगद्याची लांबी ११ किमी. असून तो १९६२ मध्ये पूर्ण करण्यात आला.


देशपांडे, चं. धुं.; चौंडे, मा. ल.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/18/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate