অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पगान

पगान

पगान : ब्रह्मदेशाची जुनी राजधानी आणि प्रसिद्ध तीर्थक्षेत्र. हे म्यिंजान जिल्ह्यात पकोक्कू व मंडालेच्या नैर्ऋत्येस अनुक्रमे सु. ३२ व १४५ किमी. वर पोपा शिखराजवळ, इरावती नदीच्या डाव्या काठावर वसले आहे. लोकसंख्या ३,००० (१९७०). याची स्थापना इ. स. ८४७ मध्ये झाली. अनव्रहत या ब्रह्मी राजाच्या कारकीर्दीत हे उदयास येऊन त्याच्या राजधानीचे ठिकाण म्हणून याची भरभराट झाली (१०५० से १२८७). पगान वाहतुकीचे, वास्तुकलेचे व बौद्धधर्म प्रसाराचे महत्त्वाचे केंद्र होते. याचे मोठ्या व सुपीक प्रदेशावर आणि प्रोम, ताउनड्विंजी, थाटोन, तगाउन या शहरांवर तसेच शान व आराकान राच्यांवर देखली नियंत्रण होते. याचा भारत, श्रीलंका व आग्नेय आशियातील इतर प्रदेशांशी समुद्रमार्गे महत्त्वाचा व्यापार चालत असे.

हे प्राचीन नगर तटबंदीयुक्त होते. तटबंदीच्या आत विविध प्रासाद, शासकीय व धार्मिक वास्तु होत्या. या वास्तूंचा ग्रंथालये आणि प्रवचनगृहांसाठी उपोग केला जातो. राजधानी असूनाही हे आग्नेय आशियातील महान पुरातत्त्वविद्याविषयक केंद्रांपैकी एक म्हणून अत्यंत मह्त्त्वाचे मानले जाई. येथील ऐतिहासिक वास्तूंमध्ये बुद्धाचे पुतळे पुष्कळ आहेत. याच्या सु. १३ किमी. परिसरात अनेक आद्या पॅगोड्यांपकी ५,००० पॅगोडे व समाध्या अद्यापि भव्य, परंतु भग्न स्वरूपात उभ्या आहेत. श्वेझिगॉन पॅगोड्याची सुरुवात अनव्रहताने केली व क्यानसिद्धाने तो पूर्ण केला (१०४४-१११२). श्वेझिगॉन पॅगोडा म्हणजे पुढील काळात बांधल्या गेलेल्या अनेक पॅगोड्यांचा आदर्श नमुना ठरला. श्वेझिगॉन हा प्रचंड व वेदिकायुक्त पिरॅमिड असून त्याचा तळभाग चौरसाकृती व ऊर्ध्वभाग गोलाकार आहे. त्याचे सिखर घंटाकृती स्तूपासारखे असून त्यास जिने, द्वारे व अलंकृत कळस यांची जोड दिलेली आहे. हा पॅगोडा अद्यापही फार पवित्र मानला जातो. त्याच्या भव्य, छत्राकार, सोनेरी व रत्नजडित कळसामुळे तो ख्यातनाम ठरला आहे.

श्वेझिगॉनप्रमाणेच आनंद पॅगोडाही पगानमधील एक भव्योत्कृष्ट स्मारक आहे. आनंद पॅगोडामध्ये अनेक सज्जे असून मध्यभागी बुद्धाचे चार भव्य पुतळे आहेत. येथील भग्न परंतु भव्य पॅगोड्यांवर भारतीय वास्तु शैलीचा प्रभाव प्रकर्षाने जाणवतो. यांशिवाय भारतातील बोधगया बुद्धमंदिराची प्रतिकृती म्हणून उभारलेले महाबोधी मंदिर (बारावे शतक) हेही पूज्य मंदिरांपैकी एक मानतात. मॉन राजाने १०५९ साली बांधलेले मनूहा मंदिर हे अनेक मोठ्या मंदिरांपैकी एक असून प्रेक्षणीय आहे. कूब्लाईखानाच्या स्वारीमुळे (१२८७) पगानचा अस्त झाला. त्यानंतर मात्र यास त्याचे पूर्वीचे महत्त्व पुन्हा कघीही लाभले नाही. हे लाख काम उद्योगाचे केंद्र आहे. पगान तीर्थक्षेत्री दर्शनार्थ बौद्ध लोकांची वर्षभर ये – जा असते.

 

लेखक: य. रा. कांबळे

स्त्रोत - मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/4/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate