অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

काँगो नदी (झाईरे नदी)

काँगो नदी (झाईरे नदी)

विषुववृत्त दोनदा ओलांडणारी आफ्रिकेतील प्रचंड नदी. आफ्रिकेत ही लांबीला (सु. 4,371 किमी.) नाईलच्या खालोखाल व समुद्रात वाहून नेण्याच्या एकूण पाण्याबाबत जगात फक्त अ‍ॅमेझॉनच्या खालोखाल आहे. ती अटलांटिक महासागरात दर सेकंदाला सु. 40,000 घ. मी. पाणी आणून टाकते. तिच्या खोऱ्यात मुख्यत: कॉंगो लोकशाही गणतंत्र (किन्शासा) ऊर्फ झाईरे व कॉंगो प्रजासत्ताक (ब्रॅझाव्हिल) यांचा बहुतेक सर्व प्रदेश व त्याच बरोबर झॅंबिया, अंगोला, कॅमेरून, मध्य आफ्रिका प्रजासत्ताक, रूआंडा, बुरूंडी व टांझानिया यांचाही काही प्रदेश येतो.

विषुववृत्ताच्या दोन्ही बाजूंकडून 100 ते 200 सेंमी. पावसाच्या प्रदेशातून मोठमोठ्या उपनद्या आणि शेकडो प्रवाह यांतून निरनिराळ्या ऋतूंत येणाऱ्या पुरांचे पाणी कॉंगोला मिळत असल्यामुळे, ती नेहमी पाण्याने भरपूर भरलेली असते व मुखाकडील भागात तिच्या पातळीत फारसा फरक कधीच पडत नाही. कॉंगोच्या खोऱ्यात कटांगा भागात तांबे, कोबाल्ट, मॅंगेनीज, जस्त, कथील, शिसे, सोने, युरेनियम इ. खनिजे सापडतात. अरण्यात रबर, सागवान, एबनी, महॉगनी इ. वृक्षप्रकार आढळतात व खोऱ्यात केळी, कापूस, कॉफी, भुईमूग, मका इ. पिके येतात.

पहिला टप्पा

उममाजवळील मुसोफीपासून स्टॅन्ली फॉल्सपर्यंतच्या भागात कॉंगोला लूआलाबा असे नाव आहे. 1,400 मी. उंचीवर उगम पावून ती वेगाने 1,200 मी. उंचीवर येऊन आता लावगडीखाली असलेल्या प्राचीन सरोवराच्या तळावरून पठाराच्या कडेपर्यंत जाते. तेथे तिने कोरलेल्या झिलॉ निदरीतून ती 72 किमी. त 457 मी. खाली येते.

येथील डेलकॉम्युन फॉल्स येथे मोठ्या प्रमाणावर वीज उत्पन्न केली जाते. कोरड्या ऋतूत पाणीपुरवठा व्हावा म्हणून येथे 66 मी. उंचीचे धरण बांधून 101 चौ. किमी. चा तलाव निर्माण केला आहे. बुकामापासून पुढे 650 किमी. ती नौकासुलभ आहे.

या सखल प्रदेशातील अनेक सरोवरे प्रवाहांनी लूआलाबाला जोडलेली आहेत. त्यांतील सर्वांत मोठ्या उपेंबा सरोवराला लूफीरा नदी मिळते. ती लिकासी (झादोव्हिल)च्या दक्षिणेस उगम पावते व कॉर्नेट फॉल्स येथे तिच्यावर वीज उत्पन्न करतात. त्यासाठी 410 चौ. किमी. चा जलाशय तयार केलेला आहे. ती मग 30 मी. खाली येऊन बीया पर्वतातून खोल निदरीतून जाऊन उपेंबाला व पुढे लूआलाबाला मिळते. यानंतर पपायरस व तरंगणाऱ्या वनस्पतींची चकदळे यांमुळे नौकानयन कठीण झाले आहे.

अंकोरीजवळ कॉंगोला पूर्वेकडून आलेली लुबुआ नदी मिळते. लुबुआ ही झॅंबियात मालाव व टांगानिका सरोवरांच्या दरम्यान चांबेशी नावाने उगम पावते. बॅंग्लीउलू सरोवराजवळून कॉंगो-झॅंबिया सरहद्दीवर आल्यावर ती लूआपूला नावाने उत्तराभिमुख होते. या दोन देशांची सरहद्द म्हणून ती 483 किमी. वाहते. जॉन्स्टन फॉल्स नंतर म्वेरू सरोवरापर्यंत तिच्यातून लहान बोटी जाऊ शकतात. या सरोवरातही पपायरस व पाणवनस्पतींचा वाहतुकीला अडथळा होतो. नंतर लुबुआ नावाने प्रपातांवरून जाताना किआंबीच्या आधी 50 किमी. तिच्यावर भोवतीच्या खाणप्रदेशांसाठी वीज उत्पादन केले जाते. चांबेशी-लूआपूला-लुबुआ-लूआलाबा हासुद्धा कॉंगोचा उगम प्रवाह मानला जातो; या दृष्टीने कॉंगोची लांबी सु. 4,700 किमी. होते.

काबालोजवळ लूआलाबाला टांगानिका सरोवरातून आलेली लूकूगा नदी मिळते. पूर्वेकडून येणाऱ्या इतर नद्या म्हणजे लुआमा, एलिला, उलिंडी व मायको या होत. कॉंगोलानंतर लूआलाबा 120 किमी. कासोंगो व कीबोंबो यांदरम्यान नदी नौकासुलभ आहे. पुन्हाप्रपात-द्रुतवाह पार केल्यावर किंडू-पोर्ट एंपेन पॉत्यॅंर्व्हिलपर्यंत 308 किमी. नौका जाऊ शकतात. नंतर विषुववृत्त ओलांडून 97 किमी. अंतरात स्टॅन्ली फॉल्सच्या सात प्रपांतावरून पश्चिमेकडे मोठे वळण घेऊन नदी 60 मी. खाली येते.

दुसरा टप्पा

किसांगानी (स्टॅन्लीव्हिल) नंतर कॉंगो नावाने नदी संथ वाहू लागते व सुम. 1,610 किमी. प्रपात-द्रुतवाहादिकांचा अडथळा न येता 6 ते 14 किमी. रुंदीच्या पात्रातून वाहत जाते. या भागात पात्रात सु. 4,000 लहान मोठी बेटे तयार झालेली आहेत. ईसांगी येते कॉंगो तिच्या खोऱ्याच्या मध्यभागात येते.

हा भाग म्हणजे हजारो वर्षांपूर्वीचा एक उथळ सरोवराचा तळ होय. या 1,300 किमी. व्यासाच्या द्रोणीप्रदेशाच्या पृष्ठावरील गाळाच्या थरांखाली आर्कियन स्फटिकी खडक आहेत. लूआलाबा ही पूर्वी नाईल नदीला किंवा हिंदी महासागराला मिळत असावी. परंतु खचदरी ज्यांमुळे निर्माण झाली, त्या जमिनीच्या हालचालींमुळे ती या द्रोणीप्रदेशाकडे वळली.

येथील सरोवराचे पाणीही पूर्वी चॅड सरोवरास व नंतर कॅमेरूनमधून गिनीच्या आखाताकडे जात असे. जमिनीच्या हालचालींमुळे लूअँडाचा उंच प्रदेश, कॅमेरून पर्वत आणि ऊबांगीशारी कटक निर्माण झाले. त्यामुळे कॉंगो सरोवराचे पाणी वाढून ते क्रिस्टल पर्वतातून खोल निदरी खोदून कॉंगोच्या हल्लीच्या मुखाकडे वाहू लागले. या प्राचीन सरोवराचे अवशेष म्हणजे लिओपोल्ड-2 व लूंबा सरोवर आणि अनेक दलदलीचे प्रदेश होत.

नदीने आणलेल्या गाळामुळे व डबरामुळे तिचे पात्र वारंवार बदलते व फेब्रुवारी, जुलै व ऑगस्ट महिन्यांत पाणी कमी असेल, तेव्हा निदान 2 मी. पर्यंत खोलीचा मार्ग नौकांसाठी उपलब्ध ठेवण्याकरिता वारंवार गाळ उपसावा लागतो. विषुववृत्तीय घनदाट अरण्यांतून पश्चिमेकडे वाहताना कॉंगोला लोमामी, आरू‌वीमी, ईतिंबीरी व मॉंग्गॅला या उपनद्या मिळतात. मग कॉंगो दक्षिणेकडे वळते व तिला लूलॉंग्गा आणि रूकी नद्या मिळतात.

एम्बांडाका (‌कोकिलातव्हिल) येथे पुन्हा विषुववृत्त ओलांडल्यावर कॉंगोला तिची सर्वांत मोठी उपनदी ऊबांगी हरेबू येथे मिळते. तीसुद्धा कॉंगो खोऱ्याच्या अगदी पूर्व सीमेपासून पश्चिमेकडे व शेवटी दक्षिणेकडे वाहत येऊन भरपूर पाण्याचा पुरवठा करते. तिलाही कॉंगो (किन्शासा) व मध्य आफ्रिका प्रजासत्ताक राज्यांतून अनेक उपनद्या येऊन मिळतात.

कॉंगो-ऊबागी संगमाजवळ 14 किमी. रुंदीचा त्रिभुज प्रदेश तयार झाला आहे. या भागात पुराचे पाणी काठावरून 8-10 किमी. आतपर्यंत पसरते. लूकोलेला येथे कॅमेरूनमधून आलेली सॅंग्गा नदी कॉंगो (ब्रॅझा.)

मधून येऊन कॉंगोला मिळते. बोलोबोजवळ कॉंगो (ब्रॅझा.) मधील आलीमा नदी मिळते व येथून पुढे कॉंगो फक्त 2 किमी. रूंदीच्या पात्रातून वालुकाश्माच्या उंच उंच दरडींमधून 200 किमी. वाहते. क्वामाउथ येथे तिला कटांगातून व अंगोलातून शेकडो प्रवाहांचे पाणी घेऊन आलेली कासाई नदी मिळते. यानंतर एकदम दरडी कमी होऊन कॉंगो स्टॅन्लीपूल या 276 ‌मी. उंचीवरील उथळ सरोवरात रूपांतर पावते.

हे सरोवर सु. 35 किमी. लांब व 23 किमी. रूंद असून त्यात नौकानयनासाठी बामू बेटाच्या दोहोबाजूंनी खोल मार्ग आहेत. सरोवराच्या उत्तर किनाऱ्यावर कॉंगो प्रजासत्ताकाची राजधानी ब्रॅझाव्हिल ही आहे, तर दक्षिण किनाऱ्यावर झाईरेची (कॉंगो लोकशाही गणतंत्राची) राजधानी किन्शासा (लिओपोल्डव्हिल) आहे.

तिसरा टप्पा

किन्शासा ते माताडी यांच्या दरम्यान लिव्हिंस्टन फॉल्स या 32 प्रपातांच्या मालिकेवरून कॉंगो क्रिस्टल पर्वतातून वाट काढून 338 किमी. अंतरात 275 मी. पासून समुद्रसपाटीला येते. माताडी हे अटलांटिकवरील कॉंगोच्या खाडीच्या शिरोभागी आहे. माताडीच्या वरच्या बाजूस 40 ‌किमी. इंगा फॉल्स हे जगातील सर्वांत जास्त सुप्त जलशक्तीचे ठिकाण आहे. क्रिस्टल पर्वतातून उत्तरेकडून व दक्षिणेकडून येणाऱ्या नद्या धबधब्यांवरून येऊन कॉंगोला मिळतात. त्यांपैकी इंकीसीवरील सॅंग्गा फॉल्स येथे ब्रॅझाव्हिल व किन्शासा यांसाठी वीज निर्मिती केली जाते.

किन्शासा येथे 29 किमी. रुंद असलेले पात्र पुढे फक्त 500 मी. रुंद होते. माताडी येथे खाडीच्या सुरुवातीला कॉंगोची खोली 30 मी. आहे. फेटिश रॉक येथे नदी एकदम सु. 18 किमी. रुंद होते; परंतु बोमा येथे येईपर्यंत इतका गाळ साठतो, की 2 मी. खोलीचा जलमार्ग प्रयासाने मोकळा ठेवावा लागतो. येथे भरतीचे पाणी फक्त 0.3 मी. चढते. खाडीमुखाजवळ बानाना हे बंदर आहे. येथे भरती सु. 2 मी. येते. मुखाजवळील दक्षिणेकडील पॉइंट पेद्रो व उत्तरेकडील पॉइंट बानाना यामंध्ये नदी 10 किमी. रुंद व काही ठिकाणी 440 मी. खोल आहे.

समुद्रतळावर कॉंगोने 3 ते 13 किमी. रुंद, 1,500 मी. खोल व समुद्रात 160 किमी. पर्यंत आत जाणारी खोल घळई खोदून काढलेली आहे. माताडी हे मध्य आफ्रिकेचे एक मोठे बंदर आहे. खाडीच्या सुरुवातीस नदीचा प्रवाह फक्त ताशी 6 किमी. पर्यंतच असतो; परंतु बऱ्याच ठिकाणी प्रवाह खळबळीचा आहे. त्यांपैकी सैतान कढई-डेव्हिस कॉल्ड्रन – येथे वेगाने फिरणारे अनेक लहानमोठे भोवरे आहेत. त्यामुळे पूर्वी नदीमुखातून वर जाणे दुष्कर झाले होते; आता मोठ्या आगबोटी त्यांस न जुमानता मार्ग काढतात.

कॉंगोतून समुद्रात इतके पाणी जाते, की किनाऱ्यापासून समुद्रात 80 किमी. पर्यंत तिचे पृष्ठभागावरील गढूळ पाणी दिसून येते आणि समुद्रात 480 किमी. पर्यंतही तिचे हिरवट रंगाचे पाणी वेगळे ओळखू येते.

वाहतूक

कॉंगो व तिच्या उपनद्या मिळून किवू, टांगानिका व म्वेरू सरोवरांशिवाय सु. 12,900 किमी. जलमार्ग उपलब्ध आहे. तो या प्रदेशातील वाहतुकीस फारच उपयुक्त आहे. माताडी-किन्शासा, किसांगानी-पॉंत्यॅर्व्हिल व किंडू-पोर्ट एंपेन-कॉंगोलो हे लोहमार्ग लिव्हिंग्स्टन फॉल्स, स्टॅन्ली फॉल्स, गेट्‌स ऑफ हेल इ. प्रपात व द्रुतवाह टाळून जाण्यासाठी बांधले आहेत.

लूंबूबाशी-पोर्ट फ्रांस्वा हा लोहमार्गही कटांगातील खनिजे कासाई नदीमार्गे किन्शासाला पोहोचविण्यास उपयुक्त आहे. लूंबूंबाशी ते अंगोलातील बेंग्वेला व लोबितो बंदरापर्यंत जाणारा लोहमार्गही यासाठी उपयुक्त पडतो. लूकूगा नदीच्या काठाकाठाने काबालो ते टांगानिका सरोवरावरील अ‍ॅल्बर्टव्हिलपर्यंत जाणारा लोहमार्ग त्या भागाला उपयोगी पडतो. तथापि कॉंगो खोऱ्यातील खनिजसंपत्ती, जंगलसंपत्ती व कृषिउत्पादन आणि इतर उत्पादने यांच्या वाहतुकीला जलमार्गच अधिक उपयोगी पडतात.

जलशक्ती

कॉंगो खोऱ्याचा बराच भाग 300 मी. पेक्षा उंच असल्यामुळे व तेथे सु. 100 ते 200 सेंमी. पाऊस पडत असल्यामुळे ‌जलविद्युत्‌ उत्पादनाला हा प्रदेश फारच सोयीचा आहे. एकूण सुप्तशक्तीचा फारच थोडा भाग सध्या उपयोगात आणलेला आहे.

वनस्पती

विषुववृत्ताच्या उत्तरेस व ‌दक्षिणेस 40 पर्यंत विषुववृत्तीय वर्षावने आढळतात. ऊबांगीच्या उत्तरेस व कासाईच्या दक्षिणेस नद्यांकाठी अरण्ये असली, तरी बहुतेक प्रदेश सॅव्हाना गवताळ प्रदेशाचा आहे. मुळांवर गाठी असलेले वनस्पतिप्रकार पुष्कळ आहेत व खोऱ्याच्या कडेला कोरड्या भागात बाभळीच्या जातीच्या वनस्पती आहेत. 1,500 ‌मी. उंचीवर बांबू व इतर वनस्पती आहेत. शेतीसाठी कॅसावा, मका वगैरे पिके पोर्तुगीजांनी दक्षिण अमेरिकेतून आणली तर ऊस, लिंबू जातीची फळे वगैरे पौर्वात्य देशांतून आणलेली आहेत.

प्राणी

कॉंगो खोऱ्यातील प्राणिजीवन अत्यंत समृद्ध आहे. हत्ती व बिबळ्या, हे अरण्ये व सॅव्हाना दोन्ही भागांत आहेत, तर सिंह व झेब्रा हे गवताळ प्रदेशातच आहेत. गोरिला बांबूच्या प्रदेशात आढळतो, तर चिंपॅंझी व इतर अनेकविध प्राणी अरण्यांत आहेत. साप, पक्षी कीटक हे विपुल आहेत. गेंडा, ओकापी हे आता दुर्मिळ होत आहेत. कॉंगो व तिच्या उपनद्या यांत सु. 1,000 जातीचे मासे आढळले आहेत. सुसरी व हिप्पोही भरपूर आहेत.

समन्वेषण

काउं द्योगू याने 1482 मध्ये कॉंगोचे मुख शोधून काढले त्यानंतर 1486 मध्ये बार्थलोम्यू डीयझ हा माताडीपर्यंत आत गेला होता. ‘मोठे पाणी’ या अर्थाच्या झादी या तद्देशीय नावाचे अपभ्रष्ट रूप झाईरे हे नाव नदीला दिले गेले. 1591 मध्ये लोपेझ याने कॉंगोच्या डाव्या तीरावरील आपल्या प्रवासाचे वर्णन प्रसिद्ध केले. 1816 मध्ये ब्रिटिश कॅ. टकी हा ईसांगीलापर्यंत गेला परंतु आजारी पडून तो आपल्या सहकाऱ्यांसह मृत्यू पावला. डेव्हिड लिव्हिंग्स्टन याने 1860 पूर्वीच कासाई व कॉंगो यांचे उगमप्रवाह शोधले होते. 1868 मध्ये त्याने चांबेशी नदी व बॅंग्वीउलू सरोवर शोधले.

1871 मध्ये तो लूआबावरील न्यांग्वे येथे पोहोचला. कॅमरनही येथपर्यंत पोहोचला होता. लूआलाबाला नाईल समजून तिचा उगमप्रवाह शोधीत असता 1873 मध्ये लिव्हिंग्स्टन मृत्यू पावला. त्याच्याच वृत्तांतावरून इतरांनी लूआलाबाही कॉंगोची मूळ नदी असावी, असे ठरविले होते. 1876 साली स्टॅन्ली झांजिबारहून न्यांग्वे येथे आला व त्याने तेथून ईसांगीलापर्यंत सु. 2,570 किमी.

प्रवास 999 दिवस झगडून कॉंगोतून पुरा केला. त्याने पुढे 1887-89 मध्ये आरूवीमी व इतुरी नद्याही शोधल्या. ग्रेनफेल, मॅरिनेल, स्टेअर्स, डेलकॉम्युन, बिया, फ्रांखा यांनीही या काळात या भागात समन्वेषण केले. येथील खनिज संपत्तीचा शोध लागल्यावर पुष्कळच तपशीलवार पाहणी होऊन नकाशेही तयार झाले. यूरोपीयांच्या या समन्वेषणाआधी हा प्रदेश अज्ञातच होता; येथील आदिवासींची माहिती बाह्य जगाला नव्हती.


कुमठेकर, ज. ब.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 3/27/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate