अटलांटिक महासागराचा दक्षिण व मध्य अमेरिकेजवळील फाटा. क्षेत्रफळ सु. २७,१९,००० चौ. किमी. याच्या पश्चिमेस मेक्सिकोचे यूकातान द्वीपकल्प, ब्रिटिश हॉंडुरस, ग्वातेमाला, हॉंडुरस व निकाराग्वा; दक्षिणेस कोस्टा रीका, पनामा, कोलंबिया व व्हेनेझुएला; पूर्वेस त्रिनिदाद व टोबॅगो, बाबेर्र्डोस, ग्वादेलूप इ. वेस्ट इंडीजपैकी लेसर ऍंटिलीस बेटे आणि उत्तरेस प्वेर्त रीको, डोमीनिकन गणराज्य, हैती, जमेका, क्यूबा इ. ग्रेटर ऍंटिलीस बेटे आहेत. याचे दक्षिणोत्तर अंतर ६१० ते १,५७४ किमी. असून जास्तीत जास्त पूर्वपश्चिम अंतर ३,३३४ किमी. आहे.
एका प्रवाळभिंतीमुळे कॅरिबियन समुद्र अटलांटिकपासून विभागला गेला आहे. या प्रवाळभिंतीचे अनेक फाटे असून त्यांवर वेस्ट इंडीजची निरनिराळी असंख्य बेटे पसरली आहेत. यूकातान खाडीने कॅरिबियन समुद्र मेक्सिकोच्या आखाताशी संलग्न असून पनामा कालव्याने पश्चिमेकडे पॅसिफिकशी आणि ऍनेगाडा, मार्तीनीक, सेंट लुसीया या खाडीमार्गांनी पूर्वेस अटलांटिकशी जोडलेला आहे. कॅरिबियनमध्ये पसरलेल्या एका रूंद, जलमग्न पठारप्रदेशामुळे कॅरिबियनचे पूर्व व पश्चिम भाग पडले आहेत. पठारप्रदेशाच्या उंच भागावर मस्कीटो, रोझॅलिंड, पेद्रो बॅंक,
जमेका इ. बेटे बसली आहेत. पश्र्चिम भाग लहान असून केमॅन समुद्र म्हणूनही तो ओळखला जातो; त्यामधीलच बार्लेट ही ८,४४२ मी. खोल द्रोणी कॅरिबियनमधील सर्वांत खोल भाग आहे. कॅरिबियनची सरासरी खोली २,५६० मी. असली, तरी त्यामधील बऱ्याच ठिकाणी ४,५०० मी. हून जास्त खोली आढळते.
उष्ण कटिबंधातील, निसर्ग-सौंदर्याने नटलेल्या व कमी क्षारतेच्या कॅरिबियन समुद्रावरच प्रथम कोलंबसचे आगमन झाले. तेथे राहणाऱ्या `कॅरिब' जमातीवरून समुद्रास व त्या प्रदेशास कॅरिबियन नाव पडले. १५१३ मध्ये बॅल्भोआ या समन्वेषकाने अटलांटिक व पॅसिफिकमधील संयोगभूमीचे अंतर कमी असल्याचा शोध लावला आणि पॅसिफिक-अटलांटिकमधील देवाण-घेवाण मध्य अमेरिकेतील देशांतून होऊ लागली.
प्रथम या भागात स्पॅनिश वसाहती होत्या; परंतु थोडयाच अवधीत ब्रिटिश, फ्रेंच, डच, डॅनिश इत्यादींनीही आपापल्या वसाहती येथे स्थापल्या; साखर, कॉफी, कोको, केळी, अननस व इतर फळे, मसाल्याचे पदार्थ, खनिज संपत्ती इत्यादींमुळे येथे सत्तास्पर्धा निर्माण झाली, त्यातच बाहेरून आणलेल्या निग्रो, भारतीय, चिनी मजुरांमुळे कॅरिबियन भोवतीच्या प्रदेशांमध्ये मिश्र संस्कृती तयार झाली. १९१४ मध्ये पनामा कालवा पूर्ण झाला आणि कॅरिबियनचे महत्त्व खूपच वाढले. पनामा कालव्यामुळे अमेरिकेची पूर्वपश्चिम टोके दळणवळणाच्या दृष्टीने जवळ आली .
मध्य अमेरिकेतील देश स्वतंत्र झाले असले, तरी ते छोटे, मागासलेले आहेत; दक्षिण अमेरिकेतील व्हेनेझुएला, कोलंबिया यांचीही गणना मागासलेल्या राष्ट्रांतच होते. कॅरिबियन समुद्रातील ऍंटिग्बा, बार्बेडोस, बर्म्युडा, केमॅन, डोमिनिका, ग्रेनेडा, जमेका, मॉंटेसेरात, सेंट क्रिस्तोफ-नोव्हिसऍंगिला, सेंट लुसीया, सेंट व्हिन्सेंट, त्रिनिदाद व टोबॅगो, व्वर्जिन ही बेटे ब्रिटिश राष्ट्रकुलात मोडतात; मार्तीनीक हे फ्रेंच , नेदर्लंड्स ऍंटिलीस हे डच, तर प्वेर्त रीको व व्हर्जिन ही अमेरिकेच्या आधिपत्याखाली असून डोमिनिकन गणराज्य, हैती व क्यूबा ही पूर्णतया स्वतंत्र बेटे आहेत.
काही काळ जय झाला असला, तरी कॅरिबियन समुद्रावरील अमेरिकेसारख्या प्रबळ राष्ट्राचे वर्चस्व झुगारून देणे बहुधा कोणालाच शक्य होणार नाही आणि अमेरिकेसही ते परवडणार नाही. कॅरिबियन समुद्र आणि पनामा कालवा यांना अमेरिकेच्या दळणवळण क्षेत्रात महत्त्वाचे स्थान असल्यामुळे कॅरिबियनवर अप्रत्यक्षतः अमेरिकेचे वर्चस्व राहणार यात शंका नाही.
शाह, र. रू.
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 10/7/2020
अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील जुन्या विद्यापीठा...
ला ग्वायरा : व्हेनेझुएलामधील एक प्रमुख सागरी बंदर ...
अमेरिकन मानवशास्त्रज्ञ. जन्म न्यूयॉर्क येथे.
आंतरराष्ट्रीय कीर्तीचे अमेरिकन समाजशास्त्रज्ञ.