অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

निग्रो नदी

निग्रो नदी

निग्रो नदी

(स्पॅनिश रीओ नेग्रो). (१) जगप्रसिद्ध अ‍ॅमेझॉन नदीची एक महत्त्वाची उपनदी. लांबी सु. २,२४० किमी. ही कोलंबिया देशात उगम पावून ग्वाइनीआ नावाने पूर्वेकडे व्हेनेझुएलाच्या सीमेपर्यंत जाते. तेथे दक्षिणेकडे वळून कोलंबिया-व्हेनेझुएला सीमेवरून जाऊन सान कार्लोस येथे ओरिनोको नदीच्या कासीक्यारे फाट्याला मिळते.

नंतर रीओ नेग्रो नावाने कूक्की येथे ब्राझील देशात शिरून ऑमेझोनस प्रांतातून आग्नेयीकडे वाहत जाऊन, मानाऊसच्या दक्षिणेस सु. १७·६ किमी. वर अ‍ॅमेझॉनला मिळते.

हिला डावीकडून रीओ ब्रँकू आणि उजवीकडून ईसाना व वाउपेस या उपनद्या मिळतात. मानाऊसच्या वर तिच्या पात्राची रुंदी ३२ किमी. होते, परंतु संगमाजवळ मात्र ते खोल आणि फक्त २·४ किमी. रुंद आहे. तिच्या पात्रात अनेक बेटे आहेत. ब्राझीलमध्ये रीओ नेग्रोची लांबी सु. १,३५० किमी. आहे. ती संगमापासून वर सु. ८०० किमी. वाउपेसपर्यंत नौसुलभ आहे. विषुववृत्तीय वर्षावनांतून वहात येत असल्यामुळे तिच्या काठी लोकवस्ती थोडीच आहे; परंतु ती या निबिड अरण्यमय भागातील रबर, लाकूड, ब्राझीलनट, कोकोबिया इ. मालाच्या वाहतुकीचा एक महत्त्वाचा जलमार्ग आहे.

तिच्या काठी वाउपेस, बार्सीलुश, सान कार्लोस, मानाऊस इ. महत्त्वाची व्यापारी ठाणी आहेत. काठाच्या दलदलीत कुजलेल्या सेंद्रिय द्रव्यांमुळे तिचे पाणी स्वच्छ, परंतु काळेभोर दिसत असल्याने तिला निग्रो हे नाव मिळाले आहे. प्रभावी खननक्षमतेमुळे रीओ नेग्रो ओरिनोकोच्या वरच्या प्रवाहाचे अपहरण करीत आहे.

(२) ब्राझील देशाच्या दक्षिणेकडील डोंगरात, बाझेजवळ उगम पावून यूरग्वायमधून वाहत जाणारी नदी, लांबी ८०० किमी. ही सोर्यानो येथे यूरग्वाय नदीला जेथे मिळते, तेथे बरीच बेटे निर्माण झाली आहेत. हिच्यावर पासो दे लोस टेरोस येथे धरण बांधून ताक्कारेंबोडूरास्नो प्रांतसीमेवर रीओ नेग्रो हा मोठा जलाशय निर्माण केला असून, त्यावर रींग्कोन देल बोनेट हे मोठे जलविद्युत् निर्मितिकेंद्र आहे. याशिवाय या नदीवर रींग्कोन दे बेगॉर्न येथेही मोठा जलाशय निर्माण केला आहे. ही नदी मुखापासून फक्त ७२ किमी. नौसुलभ असून हिच्यावर सान ग्रेगोर्ये, पासो दे लोस टोरोस, मेर्सेडेस, सोर्यानो ही महत्त्वाची ठाणी आहेत.

(३) अर्जेंटिनातील नेऊकेन व लीमाय या अँडीज पर्वतात उगम पावणाऱ्या नद्या मिळून झालेली नदी. लांबी नेऊकेनसह ७०० किमी. ही उत्तर पॅटागोनियातून वाहत जाऊन, व्ह्येड्मा व कार्मेन दे पॅटोगोनेस यांच्या आग्नेयीस अटलांटिकला मिळते. ही मुखापासून ४०० किमी. नौसुलभ असून हिच्यावर जलविद्युत् निर्माण केली जाते. हिचा जलसिंचनास उपयोग करून धान्य, फळे, द्राक्षे इत्यादींचे पीक काढतात. या नद्यांशिवाय अर्जेंटिनाचा पूर्व चाको प्रदेश, बोलव्हिया, ग्वातेमाला, हाँडुरस, निकाराग्वा येथेही रीओ नेग्रो नावाच्या नद्या आहेत.

 

कुमठेकर, ज. ब., तावडे, मो. द.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 12/7/2019



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate