नीपर : (प्राचीन बरिस्थनीझ). यूरोपातील व्होल्गा व डॅन्यूब यांखालोखाल तिसऱ्या क्रमांकाची व यूरोपीय रशियातील दुसऱ्या क्रमांकाची नदी. लांबी २,२०० किमी. जलवाहनक्षेत्र ५,०४,००० चौ. किमी. ही व्ह्याझमाच्या वायव्येस ७४ किमी. वर, व्हाल्दाई हिल्सच्या दक्षिण उतारावर स. स. पासून २,२२० मी. उंचीवर उगम पावून प्रथम दक्षिणेकडे दरॉगबूशपर्यंत वाहत जाते आणि तेथून ती पश्चिमेकडे ऑर्शपर्यंत वाहत गेल्यानंतर दक्षिणेकडे वळून बेलोरशिया राज्यातून युक्रेनमधील कीव्हपर्यंत येते. कीव्हपासून ती आग्नेयीकडे नेप्रोपट्रॉफ्स्कपर्यंत येते. येथून ती दक्षिण नैर्ऋत्येकडे वाहत जाऊन खेरसॉनजवळ येते. तेथे त्रिभुज प्रदेश निर्माण झालेला असल्याने, तिचे अनेक प्रवाह होतात व ते नीपर नदीमुखखाडीला मिळतात. यांपैकी काही प्रवाह जलवाहतुकीसाठी खोल करण्यात आले आहेत. या खाडीद्वारे ती काळ्या समुद्रास मिळते. हिच्या प्रवाहमार्गाच्या उगमापासून कीव्हपर्यंत वरची नीपर, कीव्ह ते झापरॉझे-मध्य नीपर, झापरॉझे ते मुखापर्यंत खालची नीपर असे तीन भाग पडतात.
नीपर नदीखोऱ्यातील हवामान सौम्य, दमट व उबदार आहे. वार्षिक सरासरी तपमान नीपरच्या वरच्या भागात ५° से., मधल्या भागात (कीव्हजवळ) ७° से., तर खालच्या भागात १०° से. असते. ईशान्य भागात हिवाळा दीर्घकाळ असून, जानेवारीतील सरासरी तपमान –९° से. असते; तर दक्षिण भागात हिवाळा अल्पकाळ असून जानेवारीतील सरासरी तपमान –३° से. असते. उत्तरेकडून दक्षिणेकडे अवक्षेपणाचे प्रमाण कमी होत जाते. वरची नीपर भागात अवक्षेपण वार्षिक सरासरी सु. ७१ सेंमी. असते, तर सर्व नदीखोऱ्यात सु. ६८•६ सेंमी. असून हे अवक्षेपण ६०–७० टक्के उन्हाळ्यात व पावसाळ्यात पावसाच्या रूपाने होते. नीपरला उजवीकडून बिरेझीन, प्रिपेट, त्येत्यिऱ्यिफ, इंगुलेट्स आणि डावीकडून सॉझ, द्यिस्ना, प्स्यॉल, व्हॉर्स्क्ला, समारा या प्रमुख उपनद्या मिळतात. ही वार्षिक सरासरी दर सेकंदाला १,६२० घ. मी. पाण्याचे जलवाहन करते. ही नदी जलवाहतुकीस उपयुक्त असल्यानेच हिला युक्रेनची व्होल्गा म्हणतात. ऑर्शपर्यंत नियमित नौवहन चालते, तर पाणी भरपूर असल्यास दरॉगबूशपर्यंतही नौवहन चालते. दरॉगबूश, स्मोलेन्स्क, ऑर्श, मोगिलेव्ह, ऱ्येचित्स, लॉइअफ, कीव्ह, चिर्कासी, क्रेमिन्चुक, नेप्रोपट्रॉफ्स्क, झापरॉझे, निकोपॉल, खेरसॉन ही नीपरवरील महत्त्वाची बंदरे आहेत. १९७० पर्यंत कीव्ह, क्रेमिन्चुक, झापरॉझे, नेप्रोपट्रॉफ्स्क, कॅखॉफ्क या ठिकाणी हिच्यावर धरणे झाली असून त्यांपासून विद्युत्निर्मिती केली जाते.
या विद्युत्निर्मिती केंद्रांची क्षमता २०,००,००० किवॉ. पेक्षा जास्त असून येथून दरवर्षी ८,००,००,००,००० किवॉ. तास विद्युत्निर्मिती होते. यांपासून डॉनबॅस, क्रिव्हाइ रोग या औद्योगिक क्षेत्रांस पाणीपुरवठा, द. युक्रेनचा ओसाड प्रदेश आणि क्रिमियातील उत्तर भागाल जलसिंचन इ. प्रश्न सुटले आहेत. मासेमारीच्या दृष्टीनेही ही नदी महत्त्वाची असून सु. ६६ प्रकारचे मासे हिच्यामध्ये सापडतात. त्यांमध्ये पाइक, रोच, मांजरमासा, गोल्ड फिश, कॉर्प इ. मासे व्यापारीदृष्ट्या महत्त्वाचे आहेत. हिच्या खोऱ्यात बटाटे, कापूस, फ्लॅक्स (अळशी, जवस इ.), गहू, बीट इत्यादींचे उत्पादन होते.प्राचीन काळापासून हिच्या खोऱ्यात लोकवस्ती दाट आहे. नीपरविषयी प्रथम ऐतिहासिक उल्लेख ग्रीक इतिहासकार हीरॉडोटसने केला, नंतर प्लिनी व स्ट्रेबो यांनी हिच्याविषयी माहिती दिली. टॉलेमीने प्रथम ही नदी नकाशावर दाखविली.नीपरवर अद्यापही अनेक जलसिंचन व नौवहनविषयक योजना संकल्पित आहेत.
लेखक - यार्दी, ह. व्यं.
स्त्रोत - मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 4/22/2020
गोमल. सिंधूची एक उपनदी. लांबी सु. २४० किमी.
कृष्णा नदीला दक्षिण भारताची गंगा म्हटले जाते.
दुष्काळी भागातील शेती शाश्वत व किफायतशीर करावयाची...
मोठ्या भूप्रदेशावरून वाहत जाणारा निसर्गोत्पन्न जलप...