অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

बाल्टिक समुद्र

बाल्टिक समुद्र

बाल्टिक समुद्र

उत्तर यूरोपातील अटलांटिक महासागराचा महत्त्वाचा फाटा. या अंतर्गत समुद्राचा विस्तार ५४° ते ६६° उ. अक्षांश आणि ९° ते ३०° पू. रेखांश

बाल्टिक समुद्र

यांदरम्यान साधारणपणे नैर्ऋत्य–ईशान्य दिशेत आहे. या समुद्रामुळे स्कँडिनेव्हियन द्वीपकल्प यूरोपच्या उत्तर किनाऱ्यापासून अलग झालेले आहे. नैर्ऋत्येस कील शहरापासून ईशान्येस हापारांडापर्यंतची समुद्राची लांबी सु. १,७०० किमी. असून कमाल रुंदी सु. ६५० किमी., क्षेत्रफळ ४,१४,४०० चौ. किमी., सरासरी खोली ५५ मी., कमाल खोली ६९० मी. (स्कॅगरॅक खोलवा)असून उपसागर, आखाते मिळून किनाऱ्याची लांबी ८,००० किमी. आहे. याच्या सभोवती फिनलंड, रशिया, पोलंड, पूर्व जर्मनी, पश्चिम जर्मनी, डेन्मार्क व स्वीडन हे देश आहेत. फिनलड व बॉथनिया ही आखाते म्हणजे बाल्टिकच्या दोन प्रमुख शाखा आहेत.

रीगा व डॅन्झिग ही आखातेही या समुद्राशीच संलग्न असून ती बरीच लहान आहेत. सामान्यपणे स्कागेन (डेन्मार्क) ते स्वीडिश किनारा ही बाल्टिक व उत्तर समुद्र यांमधील सरहद्द समजली जाते. स्कॅगरॅक, कॅटेगॅट या अनुक्रमे उत्तर व बाल्टिक समुद्रांच्या शाखांमधून बाल्टिक समुद्रातून उत्तर समुद्रात जाता येते.

यात डेन्मार्क व स्कँडिनेव्हियन द्वीपकल्प यांदरम्यान ग्रेट बेल्ट, लिट्ल बेल्ट व उरसुंद या अरुंद सामुद्रधुन्या आहेत. कील, आयडर, गॉथ या कालव्यांनीदेखील बाल्टिक समुद्र उत्तर समुद्राशी जोडलेला आहे, तर मिडलँड कालव्यामुळे बाल्टिक समुद्र रुर व ऱ्हाईन प्रदेशांशी आणि बर्लिन शहराशी जोडला आहे. झीलंड, फ्यून, ओलांद, लॉलान, गॉटलंड, अलांद ही या समुद्रातील महत्त्वाची बेटे आहेत.

येर या स्वीडिश शास्त्रज्ञाच्या अभ्यासाने बाल्टिक समुद्राच्या उत्पत्तीवर प्रकाश पडला आहे. प्लाइस्टोसीन काळात इ. स. पू. १२,००० च्या सुमारास जर्मन-पोलंड किनाऱ्यापर्यंतच्या सर्व उत्तर यूरोपभर हिमकवच पसरले होते. त्या सुमारास हे स्कँडिनेव्हियन हिमकवच आकुंचन पावू लागले व बाल्टिक बर्फ-सरोवर निर्माण झाले. सध्याच्या व्हेटर्न व व्हेनर्न या सरोवरांच्या आसपास या बर्फ-सरोवराला बाहेरचा मार्ग मिळून ते उत्तर समुद्राला जोडले गेले. इ. स. पू. ७,७०० पर्यंत सागरी भाग वर उचलला गेल्यावर तो बाहेर पडण्याचा मार्ग रुंदावला.

उत्तर समुद्रातील अधिक घनता असलेले पाणी बाल्टिक सरोवरात आल्याने ते खारट झाले. याच सुमारास आणखी बर्फ वितळून पश्चिमेकडील सध्याच्या स्कॅगरॅक समुद्रापासून पूर्वेकडे लॅडोगा सरोवरादरम्यान योलदिआ समुद्राची निर्मिती झाली. काही शतकांनंतर जमिनीचे ऊर्ध्वगमन सुरू झाले. उत्तर समुद्राला जोडणारा तो मार्ग अरुंद झाला व बाल्टिकचे रूपांतर अँन्सिलस सरोवरात झाले. इ. स. पू. ४,५०० च्या दरम्यान भू-हालचालींमुळे द. स्वीडन पाण्यावर आले.

उरसुंद, ग्रेट बेल्ट व लिट्ल बेल्ट या सामुद्रधुन्यांमार्गे बाल्टिकचा खुल्या उत्तर समुद्राशी संबंध आला. अँन्सिलस सरोवर समुद्राचा भाग झाला. लिटोरिना समुद्र या नावाने ते आता ओळखले जाऊ लागले. त्याच्या उत्तरेकडील जमिनीचे पुन्हा ऊर्ध्वगमन झाल्याने त्याचा विस्तार कमी झाला. त्याच लिटोरिना समुद्राला बाल्टिक समुद्र असे नाव पडले आहे. अजूनही या समुद्रकिनाऱ्यावरील जमिनीचे ऊर्ध्वगमन थांबलेले नाही.

हिमयुगानंतरच्या काळात जर्मनीत मोडणाऱ्या बाल्टिक समुद्राच्या तटाशी स्थित्यांतरे झालेली नाहीत. बाल्टिक समुद्राच्या तोंडाशी बेटांचे जेथे आधिक्य आहे, तेथील समुद्रतट खडकाळ आढळतो. श्लेस्विगनॉर्डपासून पूर्वेकडे ल्यूबेकच्या उपसागरापर्यंतच्या तटवर्ती भागात भूभागाच्या अधोगमनामुळे खाचा निर्माण झालेल्या आढळतात.

बाल्टिकमध्ये स्वीडन व फिनलंडच्या किनाऱ्यालगत बेटे असून किनारा खडकाळ, वेडावाकडा आहे, तर द. किनारा सरळ असून तेथे वाळूचे दांडे व मचूळ पाण्याची खारकच्छे आढळतात. सागरमग्न खंडभूमी म्हणजे उथळ जलविभाग असून त्यातूनच डॅनिश द्वीपसमूहाची निर्मिती झालेली आढळते. बाल्टिक समुद्राची कमाल खोली (६९०मी.) पश्चिमेस नॉर्वेजियन खंदकात स्कॅगरॅक खोलव्यात आढळते. 

हा समुद्र पश्चिमी वाऱ्यांच्या टापूत येत असल्याने ते वारे पाण्याला पूर्वेकडे प्रवाहित करतात. तसेच अनेक लहानमोठ्या नद्या या समुद्रात गोड्या पाण्याची भर घालतात. स्पेथमन याने १९१२ मध्ये केलेल्या अंदाजाप्रमाणे बाल्टिक समुद्राच्या गोड्या पाण्याचा जलवाहन प्रदेश सु. १६,५७,००० चौ. किमी. आहे. ओडर, व्हिश्चला, नेमन, डाउगोव्हा, डाल, नीव्हा या बाल्टिकला मिळणाऱ्या प्रमुख नद्या आहेत. नद्या आणि पाऊस यांमुळे या समुद्राला जितके पाणी मिळते, त्यापेक्षा कमी पाण्याची वाफ होते. भरपूर पाणीपुरवठा व मर्यादित बाष्पीभवन यांमुळे सामान्यपणे तेथील पाण्याची क्षारता कमी आहे.

पश्चिम बाल्टिकमध्ये क्षारता सर्वांत जास्त (जलपृष्ठावर १०%० व तळाशी १५%०) असून बॉथनिया आखाताच्या शिरोभागी ती बरीच कमी (५%०) झालेली आढळते. वसंत व ग्रीष्म ऋतूंत अतिरिक्त गोडे पाणी सागरपृष्ठावरून बाल्टिक प्रवाहाच्या रूपाने कॅटेगॅट व स्कॅगरॅक समुद्रांमार्गे उत्तर समुद्रात जाते, तर खारे पाणी सागरपृष्ठाखालून बाल्टिक समुद्राकडे येते. येथील समुद्रप्रवाह सामान्यपणे घड्याळाच्या काट्यांच्या विरुद्ध दिशेने वाहतात. या समुद्रात वादळे मोठ्या प्रमाणावर उदभवतात. 

या समुद्राचा हवामानावर होणारा परिणाम अत्यल्प असतो. समुद्रकिनाऱ्या शेजारी पृष्ठभागावरील गोडे पाणी हिवाळ्यात गोठते. वसंत ऋतूत त्याच भागात उष्णतामानातील वाढीमुळे बर्फ वितळू लागते; परंतु शेजारच्या भूभागावरील तपमानात जितकी वाढ होते, त्यामानाने ही वाढ कमीच असते. या समुद्राच्या उत्तर आणि दक्षिण भागांतील हिवाळ्याच्या तपमानांत मोठाच फरक असतो. उन्हाळ्यात मात्र त्यांतील फरक जवळजवळ नाहीसा होतो. 

हेल्‌सिंकी , क्रोनस्टॅट, लेनिनग्राड, रीगा, कालीनिनग्राड, डॅन्झिग (गदान्यस्क), श्टेटीन, स्ट्रालसुंड, कील, कोपनहेगन, यतेबॉर्य, माल्म, कार्ल्सक्रूना व स्टॉकहोम ही या समुद्रकिनाऱ्यावरील प्रमुख बंदरे आहेत.

बाल्टिक समुद्र उथळ व तुलनेने गोड्या पाण्याचा असल्यामुळे त्यातील पाणी लवकर गोठते. वर्षातील तीन ते पाच महिने समुद्राचा बराचसा भाग, विशेषत: नैऋत्य भाग, गोठलेला असतो. क्वचितच संपूर्ण समुद्र गोठलेला आढळतो (उदा.,१६५८ व १८०९); त्यामुळे वरीलपैकी काही बंदरे हिवाळ्यात गोठलेली आढळतात. तथापि बर्फफोडी बोटींच्या साहाय्याने ती वाहतुकीस खुली केली जातात. दुसऱ्या महायुद्धात लेनिनग्राडला पडलेल्या प्रसिद्ध वेढ्याच्या वेळी गोठलेल्या समुद्रावरून वाहनांद्वारे रसद पोहोचविण्याचा प्रयत्न झाला होता.

समुद्राचा उथळपणा व अरुंदपणा, वादळांमुळे वाऱ्यांत अचानक होणारे बदल हे या समुद्रातील जलवाहतुकीत येणारे प्रमुख अडथळे आहेत. किनारी देशांतून लाकूड व लाकडापासून तयार केलेल्या विविध वस्तू, मासे, फर, धान्य, चरबी, तैलस्फटिक यांची निर्यात केली जाते. फिनलंडमधील मऊ लाकूड म्हणजे तर त्या देशाचे ‘हिरवे सोने’च मानले जाते. तैलस्फटिक उत्पादनासाठी प्राचीन काळापासून हा किनारी प्रदेश प्रसिद्ध आहे.

मासेमारीसाठी बाल्टिक समुद्र महत्त्वाचा असून कॉड, पर्च, अँकोव्ही, सामन, हेरिंग, बाल्टिक स्प्रॅट इ. जातींचे मासे पकडले जातात. बाल्टिक सील हा येथील प्रमुख सस्तन प्राणी आहे. अनेक देशांच्या सीमा या सागराला येऊन भिडतात. रशियाच्या सागरी वाहतुकीच्या मर्यादित मार्गांपैकी काही येथून जातात. पूर्व जर्मनी व पोलंड या साम्यवादी देशांना बाहेरच्या जगाशी सागरी संबंध ठेवायला हाच जवळचा मार्ग आहे. त्यामुळे याचे स्थान मोक्याचे ठरले आहे.

 

संदर्भ : Holmes, Arthur, Principles of Physical Geology, Nelson (Lancs.),1968.

चौधरी, वसंत

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate