म्यानमारमधील एक प्रमुख नदी. म्यानमारमधील शान पठाराच्या पश्चिम कडेवर, यामेदिनच्या ईशान्येस सितांगचा उगम होतो. उगमापासून दक्षिणेस सु. ४२० किमी. वाहत जाऊन अंदमान समुद्रातील मार्ताबानच्या आखाताला ती मिळते.
पश्चिमेकडील अरण्यमय पेगूयोमा पर्वत आणि पूर्वेकडील शानचे पठार यांदरम्यान सितांगचे रुंद खोरे आहे. पेगू , तौंग्गू , यामेदिन व प्यिन्मॅना ही सितांगच्या खोऱ्यातील प्रमुख नगरे आहेत. या नदीचा मुखापासून ४० किमी. लांबीचा प्रवाह वर्षभर, तर ९० किमी. चा प्रवाह तीन महिन्यांसाठी जलवाहतुकीस उपयुक्त ठरतो.
प्रामुख्याने निर्यातीसाठीच्या सागाच्या लाकडाचे ओंडके वाहून नेण्यासाठी या नदीचा विशेष उपयोग होतो. खालच्या टप्प्यात कालव्याद्वारे सितांग नदी पेगू नदीला जोडली आहे. पुरातन काळात इरावतीचे खालचे खोरे याच नदीच्या खोऱ्यातून वाहत असावे व प्लाइस्टोसीन कालखंडातील भू हालचालींमुळे इरावतीचे खोरे पश्चिमेकडे सरकले असावे, असे भूशास्त्रावरुन अनुमान निघते. सितांगचे खोरे सुपीक असून तेथील तांदळाचे उत्पादन महत्त्वाचे आहे. दुसऱ्या महायुद्घकाळात १९४२ च्या सुरुवातीस आणि मे १९४५ मध्ये सितांगच्या खोऱ्यात घनघोर युद्घ झाले होते.
चौधरी, वसंत
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 1/22/2020
तुंगभद्रा : द. भारतातील एक प्रमुख नदी आणि कर्नाटक ...