অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

कोलंबो

कोलंबो

कोलंबो

श्रीलंकेची (सीलोन) राजधानी, उत्कृष्ट कृत्रिम बंदर व गजबजलेले व्यापारी केंद्र. लोकसंख्या ५,६२,१६०(१९७१); उपनगरांसह ७,६३,०६४ (१९६३). हे पश्चिम किनाऱ्यावर केलानी नदीमुखाशी वसले आहे. येथील हवामान उष्ण व दमट असून कमाल व किमान तपमानात फरक थोडा आहे. येथे पाऊस सरासरी २३० सेंमी. पडतो. डिसेंबर ते फेब्रुवारी हवा आल्हाददायक असते. येथे नाना धर्मांचे लोक असून बौद्ध धर्मीय जास्त आहेत.

सिंहली भाषा प्रमुख आहे, तथापि तमिळ व इंग्रजीही बोलली जाते.

कोलंबो इ.स. पू. ५४३ च्या सुमारास वसले. त्याचा प्राचीन इतिहास ज्ञात नाही. मध्ययुगात अरबी व चिनी व्यापारी तेथे येत. १५१७ मध्ये पोर्तुगीजांनी ते नव्याने वसविले व त्यास कोलंबसच्या स्मरणार्थ कोलंबो नाव दिले. ते फार काळ त्यांच्याकडे राहिले नाही. तेथे१६५६ मध्ये डच आले व डचांकडून १७९६ मध्ये ते ब्रिटिशांनी घेतले. इंग्लंड व ऑस्ट्रेलिया यांना मध्यवर्ती असल्याने कोलंबोची झपाट्याने वाढ झाली. दुसऱ्या महायुद्धात जपानविरुद्ध हे महत्त्वाचे केंद्र होते. १९४८ साली सीलोनच्या स्वातंत्र्यानंतर ते राजधानीचे ठिकाण बनले.

शहराचे बंदर, फोर्ट, पेट्टा व सिनॅमनबाग हे प्रमुख विभाग असून फोर्टमध्ये संसदभवन, क्वीन्स हाउस (राष्ट्रपतिभवन) व कचेऱ्या; पेट्टात व्यापार व सिनॅमनबाग श्रीमंत वस्तीसाठी प्रसिद्ध आहे. कोलंबोच्या ६२ चौ. किमी. विस्तारात ट्राम, दुमजली बसगाड्या, टॅक्सी व रिक्शा प्रवाशांची वाहतूक करतात.

१२ किमी. आग्नेयीस कोलंबोचा आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. देशातील चहा, रबर, मसाल्याचे व नारळाचे पदार्थ यांची निर्यात आणि तांदूळ, तेल, यंत्रसामग्री ह्यांची आयात प्रामुख्याने येथून होते. अनेक लघुउद्योगधंदे येथे असून वेलावटी भागात कापड गिरण्या आहेत.१९४२ साली येथे सीलोन विद्यापीठ स्थापन झाले. १९५९ मध्ये विद्योदय आणि विद्यालंकार ह्या बौद्ध विद्यालयांनाही विद्यापीठीय दर्जा देण्यात आला.

कोलंबोच्या उत्तर भागातील कॅथलिक चर्च जुने, विटांचे असून घुमट भव्य व उंच आहे. केलानी नदीवरील कालिनाचे बौद्ध मंदिर, निजलेल्या स्थितीतील प्रचंड बुद्धमूर्ती भिंतींवरील रंगीत चित्रांमुळे प्रेक्षणीय वाटते, तथापि पेट्टातील मलीकगुंडा अधिक रम्य व साधे आहे. ह्या भागातील हिंदू मंदिरे उल्लेखनीय आहेत.

सिनॅमनबागेजवळील व्हिक्टोरिया बाग, नगरभवन, वस्तुसंगहालय आणि प्राणिसंग्रहालय प्रसिद्ध आहेत. प्राणिसंग्रहालय आशियातील एक उत्तम संग्रहालय मानले जाते. बंदरालगतचे दीपगृह जुने व घड्याळयुक्त आहे. कोलंबोचे आणखी एक रम्य स्थान म्हणजे मौंट लाव्हिनिया हे दक्षिणेस ११ किमी. वर थोडया उंचवट्याचे समुद्रात घुसलेले खडकाचे टोक होय. हे सहल व पोहण्याकरिता ख्यातनाम आहे.

एक टुमदार, बहुरंगी, पाश्चात्त्य पद्धतीचे आधुनिक शहर, हिंदी महासागरामधील जाण्यायेण्याच्या टप्प्यावरील स्थानक आणि हिंदी महासागरातील श्रीलंकेच्या स्थानामुळे कोलंबोला मिळालेले राजकीय महत्त्व यांमुळे कोलंबोस प्रवाशांची वर्दळ असते.

 

देशपांडे, सु.र.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate